भारतातील पहिले उपकरण
आपल्याला बसल्या जागेवरून जेवढी कामे करता येतील तेवढी हवीच असतात. त्यात वीज बिल, टेलिफोन बिल, पाण्याचे बिल, रेल्वे तिकीट, एसटीचे तिकीट आदी सर्व कामे आजकाल आपण मोबाइलद्वारे करीत असतो. त्याची आपल्याला आता सवयच झाली आहे.  
पूर्वी टीव्हीचा रिमोट नव्हता तेव्हा टीव्हीजवळ जाऊन आपल्याला चॅनेलची बटने खाली-वर करावी लागत होती. आता तर मोबाइलवरून घरातील, कार्यालयातील दिवे, पंखे सुरू अथवा बंद करता येतील, असे एक युनिट बाजारात उपलब्ध झाले. हे भारतातील पहिलेच अशा प्रकारचे युनिट असावे, असा दावा हे उपकरण अस्तित्वात आणणाऱ्यांनी केला आहे.
‘होमनेट कॉर्पोरेशन ब्लू स्विच’ या नावाचे हे उपकरण असून तुमच्या मोबाइलवर एका अ‍ॅप्लिकेशनद्वारे ते लोड केल्यानंतर तुम्ही बसल्या जागेवरूनच तुमची सर्व कामे करू शकता. आपल्या मोबाइलच्या ‘ब्लू टुथची रेंज’ जिथपर्यंत आहे, त्या रेंजमध्ये कुठूनही तुम्ही हे उपकरण वापरू शकता, असे या उपकरणाचे निर्माते शेखर ढापरे यांनी सांगितले. या उपरकरणाद्वारे तुम्ही घरातील कोणतीही चार उपकरणे म्हणजे दोन पंखे –  दोन टय़ुब, तीन टय़ुब, एक फॅन सुरू अगर बंद करू शकता. मोबाइलच्या ब्लू टुथद्वारे अ‍ॅप्लिकेशन कनेक्ट झाल्यावर  हे उपकरण  सुरू होते.  या उपकरणाला चार उपकरणांप्रमाणे चार वायर्स आहेत. त्या उपकरणांच्या बटणांमध्ये टाकातात. आणखी एक वायर या उपकरणाची मेन वायर आहे. जर तुम्ही मोबाइल बरोबर घेऊन बाहेर निघून गेलात, त्याच वेळी घरी असलेल्यांना पंखा अथवा लाइट नको असल्यास ते उपकरणाला जोडलेले मेन स्वीच बंद करू शकता, असे ढापरे यांनी सांगितले.
या उपकरणाच्या व कंपनीच्या नावाविषयी बोलताना ढापरे म्हणाले, हे उपकरण मोबाइलच्या ‘ब्लू टुथ’वरून सुरू होते म्हणून त्या ब्लू टुथचा लोगो असे मिळून ‘ब्लू स्विच’ असे या उपकरणाचे नाव ठेवले आहे.
तसेच घर, दुकानातील अथवा कार्यालयातील उपकरणे सुरू अथवा बंद करायची असल्यामुळे त्या उपकरणाच्या कंपनीचे नावसुद्धा आम्ही ‘होमनेट’ असे ठेवल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या या युनिटची किंमत ६९९०/- रुपये असून ती आम्ही मार्केटिंगसाठी पाच हजार रुपयांना विकत आहोत.
युनिटच्या वाढत्या मागणीनुसार ही किंमतही कमी होऊ शकेल, असे ढापरे यांनी सांगितले.