एअरटेलने फोरजी सेवा पूर्णपणे सुरू केली असून आता घराघरात फोरजी पोहचवण्यासाठी कंपनी प्रयत्नशील आहे. कंपनीतर्फे आता फोरजी वायफाय सेवा घरांमध्ये पुरविली जाणार आहे. यासाठी कंपनीने काही आकर्षक प्लान्सही बाजारात आणले आहेत.

ब्रॉडब्रँड सेवा पुरविणारी देशातील पहिली खासगी कंपनी म्हणून ओळख असलेल्या एअरटेलने आता ही सेवा आणखी लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. एअरटेलच्या सध्याच्या ग्राहकांना सध्या भरत असलेल्या पैशांमध्येच अधिक वेगवान इंटरनेट सेवा किंवा अतिरिक्त डेटा मर्यादा पुरविली जाणार आहे. तर नवीन ग्राहकांसाठी ५९९ रुपयांमध्ये चार एमबीपीएस वेगासह आठ जीबी डेटा उपलब्ध करून दिला जाणार आहे. याशिवाय अधिक वेग आणि अधिक डेटासाठी असेच आकर्षक प्लॅन्स कंपनीने बाजारात आणले आहेत. सध्या बाजारात असलेल्या इतर स्पर्धकांच्या तुलनेत एअरटेल ग्राहकांना सांगत असलेला वेग पूर्णपणे देते, असा विश्वास महाराष्ट्र, मुंबई, गोवा आणि गुजरातचे हब सीईओ अशोक गणपत्ये यांनी सांगितले. यामुळे ग्राहकांना इंटरनेट वापराचा चांगला अनुभव घेता येतो. कंपनीने फोरजी सेवा बाजारात आणली असून ती आता ग्राहकांना त्यांच्या घरापर्यंत पोहचवण्याचा कंपनीचा मानस आहे. यासाठी होम वायफाय संकल्पना बाजारात आणली असल्याचेही गणपत्ये म्हणाले. इमारतींमध्ये तसेच घरांमध्ये सध्या वायरीचे जाळे नको असते. अशावेळी चांगली इंटरनेट सेवा उपलब्ध करून देण्यासाठी फोरजी वायफायसारखा पर्याय उपयुक्त ठरू शकतो असेही त्यांनी स्पष्ट केले.

कंपनीने वायफाय या उत्पादनाच्या माध्यमातून फोरजी वायफाय सेवा सुरू केली आहे. या उत्पादनात किंवा मोबाइल नेटवर्कमध्ये जर फोरजी नेटवर्क मिळाले नाही तर थ्रीजी नेटवर्क मिळते ते मिळाले नाही तर टूजी नेटवर्क मिळते. तसेच या होम वायफायमध्ये होणार काय? या प्रश्नाला उत्तर देताना गणपत्ये म्हणाले की, ज्यांच्या घरात फोरजी नेटवर्क जोडणी उपलब्ध आहे अशांच्या घरातच हे उपकरण दिले जाणार आहे. वायफाय किंवा इतर उत्पादने आपण सोबत घेऊन फिरतो त्यामुळे कुठे कोणते नेटवर्क उपलब्ध असेल हे आपण सांगू शकत नाही. यामुळे त्यामध्ये उपलब्ध नेटवर्क पकडण्याची क्षमता देण्यात आलेली आहे. मात्र या वायफाय उपकरणामध्ये तशी सुविधा देण्याची आवश्यकता नसल्याचे गणपत्ये यांनी स्पष्ट केले. हे वायफाय उपकरण २५०० मध्ये उपलब्ध असून आपण एकावेळी ३२ विविध उपकरणे याच्याशी जोडू शकतो. या सुविधेमुळे अधिकाधिक ग्राहक एअरटेलच्या फोरजी सेवेचा आनंद घेऊ शकतात, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

– प्रतिनिधी