दसरा-दिवाळी आले की बाजार अगदी फुलून जातो. सणासुदीला खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल असल्याने बाजाराला नवी झळाळी येतेच; पण त्याबरोबरच सवलती, आकर्षक ऑफर्स, मोफत वस्तू यांचाही जोरदार मारा होतो. हीच परिस्थिती अलीकडे भरभराटीला आलेल्या भारतातील ऑनलाइन बाजारात दिसून येते. मोबाइल, टॅब्लेट किंवा अन्य गॅझेट्स खरेदी करण्यासाठी दुकानात जाण्यापेक्षा ते ऑनलाइन ऑर्डर करणाऱ्यांची संख्या वाढत चालल्याने अशा संकेतस्थळांवरही ग्राहकांना आकर्षक ऑफर्स देण्याची चढाओढ सुरू झाली आहे. अशाच प्रमुख संकेतस्थळांनी सध्या देऊ केलेल्या काही ऑफर्स..
अ‍ॅमेझॉनचा ‘दिवाळी वीक’
ऑनलाइन शॉपिंग संकेतस्थळांमध्ये सर्वात आघाडीवर असलेल्या अ‍ॅमेझॉनने १० ते १६ ऑक्टोबर या कालावधीत ‘दिवाळी धमाका वीक’ आयोजित केला आहे. या अंतर्गत विविध उत्पादनांवर २० टक्क्यांपासून ७१ टक्क्यांपर्यंतच्या सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. याशिवाय ‘लाइटनिंग डील्स’, हॅपी हवर या वर्गाअंतर्गतही अ‍ॅमेझॉनकडून विविध ऑफर्स जाहीर करण्यात आल्या आहेत. अ‍ॅमेझॉनच्या ‘डेली डील्स’ मध्यरात्रीपासून सुरू असतात. आकर्षक सवलत असल्यास प्रोडक्ट्सची विक्री काही तासांतच संपते. अ‍ॅमेझॉनच्या अँड्रॉइड अ‍ॅपवरूनही तुम्ही ऑनलाइन खरेदी करू शकता. अ‍ॅमेझॉनने आपल्या अँड्राइडवर आधारित अ‍ॅपस्टोअरवरून मोफत अ‍ॅप्स देण्याचेही जाहीर केले आहे. विशेषत: स्केचबुक प्रो, स्वाइप कीबोर्ड, थ्रीज, शेडय़ुल प्लॅनर प्रो असे अनेक उपयुक्त अ‍ॅप्स या अ‍ॅप्लिकेशनवरून मोफत पुरवण्यात येत आहेत.

फ्लिपकार्टचा द बिग बिलियन सेल
फ्लिपकार्टने अद्याप आपल्या संकेतस्थळावर दिवाळी धमाका ऑफर्स सुरू केलेल्या नाहीत. पण कंपनीने ‘द बिग बिलियन डे’ नावाखाली ६ ऑक्टोबरपासून विविध ऑफर्स देण्याचे संकेत दिले आहेत. फ्लिपकार्टचा मुख्य भर ‘फ्लॅश सेल’वर असेल असे दिसते. त्याअंतर्गत विविध उत्पादनांवर मर्यादित काळाकरिता मोठय़ा सवलती जाहीर केल्या जातील. त्यामुळे फ्लिपकार्टच्या या सवलतींचा फायदा घ्यायचा असल्यास तुम्ही फ्लिपकार्टचे अँड्रॉइड अ‍ॅप डाऊनलाऊड करता येईल. त्या अ‍ॅपवरून तुम्ही लगेचच ऑर्डर बुक करू शकाल. मात्र त्यासाठी तुम्हाला तुमचे क्रेडिट कार्ड व डेबिट कार्ड आधीच नोंदवून ठेवावे लागेल. अर्थात ‘कॅश ऑन डिलिव्हरी’चा पर्यायही तुम्हाला उपलब्ध असेलच.

स्नॅपडीलची दिवाळी जोरात
स्नॅपडीलने दिवाळीसाठी जय्यत तयारी केली आहे. कंपनीने आपल्या संकेतस्थळावरून काही विशिष्ट उत्पादनांवर ‘एकावर एक मोफत’ ऑफर जाहीर केली आहे. तसेच कंपनीने ४० हजार रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या इलेक्ट्रॉनिक उत्पादनांवर सवलतीच्या किमतीखेरीज तीन हजार रुपयांची सवलत जाहीर करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे २० हजार आणि १० हजार रुपयांच्या खरेदीवर अनुक्रमे १७५० व ७५० रुपयांची सवलत देण्यात येत आहे. कंपनीच्या ‘बाय वन गेट वन’ ऑफरअंतर्गत किचनपासून फर्निचपर्यंतच्या सर्व वर्गात एका वस्तूच्या खरेदीवर दुसरी वस्तू मोफत देण्यात येत आहे. याशिवाय जोल्ला स्मार्टफोन, कार्बन स्पार्कला व्ही, स्पाइस फायर वन असे काही स्मार्टफोन केवळ स्नॅपडीलवरच उपलब्ध आहेत. स्नॅपडीलकडून काही महत्त्वाच्या शहरांत दुसऱ्या दिवशी डिलिव्हरी देण्यात येत आहे.

‘ई बे’ची आघाडी
दिवाळीच्या हंगामात आकर्षक सवलती देण्यात ईबेने आघाडी घेतली असून २५ सप्टेंबरपासूनच कंपनीने विविध उत्पादनांवर सवलती जाहीर केल्या आहेत. २३ ऑक्टोबपर्यंत सुरू असलेल्या या ऑफरअंतर्गत दुपारी १२ ते सायंकाळी ६ या कालावधीत ‘ईबे’वरून खरेदी करणाऱ्या पहिल्या व शेवटच्या २५० ग्राहकांना एक हजार रुपयांची ‘कॅशबॅक’ जाहीर केली आहे. याशिवाय दैनंदिन आणि साप्ताहिक सवलतीही या संकेतस्थळावर सुरू आहे. ईबेवर खरेदी करताना उत्पादनांसोबतच त्याची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांची माहितीही नीट तपासून पाहा. कारण अनेकदा एखादा उच्च श्रेणीतील स्मार्टफोन अत्यंत कमी किमतीत विकला जात असल्याने त्याची खरेदी केली जाते. मात्र, प्रत्यक्षात त्या उत्पादनांवर अधिकृत वॉरंटी नसते. त्यामुळे विक्रेत्याची माहिती काळजीपूर्वक तपासून पाहा.
कार्डावर आधारित सवलती
अनेक ऑनलाइन संकेतस्थळांनी विविध बँकांच्या डेबिट/क्रेडिट कार्डाशी करार करून त्या कार्डाच्या आधारे खरेदी करणाऱ्यांना अधिक सवलती जाहीर केल्या आहेत. आयएनजी वैश्य बँकेने या आठवडय़ात क्रेडिट, डेबिट कार्ड आणि नेटबँकिंग वापरकर्त्यांना अ‍ॅमेझॉन इंडिया या संकेतस्थळावरून दहा टक्क्यांची ‘कॅशबॅक’ जाहीर केली आहे. या ऑफरअंतर्गत जास्तीतजास्त १५०० रुपयांपर्यंतची ‘कॅशबॅक’ देण्यात येत आहे. मात्र, त्यासाठी किमान खरेदीची अट नाही. स्नॅपडीलवरही ही कॅशबॅक ऑफर उपलब्ध आहे. मात्र, त्यासाठी खरेदीची मर्यादा एक हजार रुपयांची आहे. अ‍ॅमेझॉनने ‘अमेरिकन एक्स्प्रेस’च्या ग्राहकांना दहा टक्के कॅशबॅक जाहीर केली आहे. यासाठी किमान खरेदी मर्यादा १५ हजारांची असून कमाल ‘कॅशबॅक’ पाच हजार रुपयांची आहे. ‘ईझोन’ने अ‍ॅक्सिस बँक कार्डधारकांना १५ हजार रुपयांपेक्षा अधिक खरेदीवर पाच टक्के ‘कॅशबॅक’ जाहीर केली आहे.