यापूर्वी याच सदरामध्ये आपण पॅनासॉनिक कंपनीने बाजारात आणलेले टफबुक पाहिले होते. त्यालाही बाजारपेठेने चांगला प्रतिसाद दिला. तो लक्षात घेऊनच आता कंपनीने सध्या चलती असलेल्या टॅब्लेटस्च्या क्षेत्रातही टफपॅडची मुहूर्तमेढ रोवली आहे. त्याला कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणेही तेवढेच रोचक ठरावे.
धूळ म्हणजे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा पहिला शत्रू. हे टफपॅड तुम्हाला धूळ, पाणी आदी सर्व बाबींपासू संरक्षण देते. म्हणजे त्यावर यापैकी कोणत्याही बाबींचा परिणाम होत नाही. इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे त्या नाजूक असतात, आणि त्यांना खूपच जपावे लागते. जरासा धक्का लागला तरी अनेकदा काही उपकरणांना सोसवत नाही, अशा अवस्थेत त्या वस्तू हातातून खाली पडल्या तर मग कल्याणच झाले म्हणायचे. मग तो टॅब्लेट असो किंवा मग हार्डडिस्क. या पाश्र्वभूमीवर हे टफबुक महत्त्वाचे ठरते. येणाऱ्या काळात लॅपटॉप किंवा नेटबुकचा वापर कमी होणार असून आता टॅब्लेटस्चा वापर वाढत जाणार आहे, हे गृहीत धरूनच कंपनीने आता टफपॅड बाजारात आणले आहे. एफ झेड- ए१ असा मॉडेल क्रमांक असलेले हे टफपॅड १०.१ इंचाचे असून ते अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिमवर चालते. टिकाऊपणा, धूळ आणि पाण्यापासून संरक्षण ही त्याची मूळ वैशिष्ट्ये आहेत.
यामध्ये असलेला सर्वाधिक महत्त्वाचा भाग म्हणजे त्याचा सीपीयू प्रोसेसर. एरवी हा प्रोसेसर खूपच नाजूक असतो आणि एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू हातातून खाली पडली तर त्याला धक्का पोहोचतो आणि मग संपूर्ण यंत्रणाच बंद पडते. पण आता या टफबुकसाठी एक वेगळाच प्रोसेसर विकसित करण्यात आला आहे. मोठय़ा उंचीवरून पडल्यानंतर देखील तो चांगल्या पद्धतीने काम करेल, अशीच त्याची रचना करण्यात आली आहे. शिवाय त्याच्या अंतर्गत रचनेमध्ये याचीही काळजी घेण्यात आली आहे की, हा प्रोसेसर मल्टिटास्किंगला पेलणारा असेल. त्यामुळे एकाच वेळेस मल्टिटास्किंग करू शकणारा आणि अतिशय दणकट असा प्रोसेसर याला लाभला आहे.
वेगवेगळ्या प्रकारचे असे वातावरण की, ज्यामध्ये काम करणे हे बिलकूल सोपे नसते. उदाहरणार्थ भर वाळवंटामध्ये तीव्र सूर्यप्रकाशात काम करताना अडचण येते. कारण लॅपटॉप किंवा टॅब्लेटच्या स्क्रीनवरून प्रकाश किरण परावर्तित होतात आणि त्यामुळे स्क्रीनवरचे काहीच दिसत नाही. पण अशाही अवस्थेत या टफबुकचा स्क्रीन मात्र अतिशय उत्तम काम करतो. कारण मुळात तो मॅट या प्रकारात मोडणारा आहे. त्याशिवाय कितीही सूर्यप्रकाश थेट आला तरी स्क्रीनवरच्या सर्व बाबी व्यवस्थित वाचता येतील, अशीच त्याची रचना करण्यात आली आहे. याही शिवाय महत्त्वाचे आहे ती म्हणजे या टफबुकची बॅटरी क्षमता. एकदा चार्ज केल्यानंतर ही बॅटरी दीर्घकाळ म्हणजे तब्बल १० तास चांगली कार्यरत राहू शकते,असा कंपनीचा दावा आहे. ही चांगली बॅटरी विकसित करण्यासाठीही कंपनीने खू मेहनत घेतली आहे. साहजिकच या पूर्णपणे वेगळ्या असणाऱ्या अनेक बाबींमुळेच इतर टॅब्लेटस् आणि टफपॅड यांच्या किंमतीत प्रचंड अंतर आहे. या शिवाय जीपीएस, बदलता येईल अशी बॅटरी अशा इतरही अनेक बाबी यात समाविष्ट आहेत.
भारतीय बाजारपेठेतील किंमत :रु. ७५,०००/-