स्मार्टफोन क्षेत्रातील बलाढ्य कंपनी सॅमसंगने आता आपला मोर्चा मध्यमवर्गीय ग्राहकांकडे वळवला असून, सामान्यांना परवडतील असे स्मार्टफोन बाजारात उतरवले आहेत. गॅलेक्सी ए आणि ई श्रेणीतील हे स्मार्टफोन असून, गॅलेक्सी ए श्रेणीतील ए३ आणि ए५ यांना धातूचे आवरण आहे, तर ई श्रेणीतील ई५ आणि ई७ या फोनना नेहमीप्रमाणे प्लॅस्टिकचे आवरण आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए३ आणि ए५ फोनची किंमत अनुक्रमे रुपये २०,५०० आणि २५,५०० इतकी असून, गॅलेक्सी ई५ ची किंमत रुपये १९,३०० तर ई७ ची किंमत २३,००० इतकी आहे. हे चारही फोन अण्ड्रॉईड ४.४.४ किटकॅट प्रणालीवर काम करतात. यात सॅमसंगची टचव्हिज युआय देण्यात आली आहे. ड्युअल सिमची सुविधा असलेल्या या फोनमध्ये १.२ गेगाहर्टसचा क्वाड-कोअर क्वालकॉम स्नॅपड्रेगॉन ४१० सीपीयू देण्यात आला आहे.
५४०x९६० पिक्सल रेझोल्युशनचा ४.५ इंचाचा क्यूएचडी डिस्प्ले असलेल्या गॅलेक्सी ए३ फोनचा मागील कॅमेरा ८ मेगापिक्सल तर पुढील बाजूस असलेला कॅमेरा ५ मेगापिक्सल इतका आहे. १ जीबी रॅम, १६ जीबीची अंतर्गत मेमरी जी वाढवतादेखील येऊ शकते आणि १,९०० एमएएचची बॅटरी ही या फोनची इतर वैशिष्ट्ये आहेत.
ए५ फोनमध्ये ५ इंचाचा सुपर अमोलेड डिस्प्ले असून, मागील बाजूस १३ मेगापिक्सल, तर पुढील बाजूस ५ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. ४जी एलईटी कॅट४ मॉडेम, २ जीबी रॅम, १६ जीबीची अंतर्गत मेमरी ६४ जीबीपर्यंत वाढवता येते आणि २,३०० एमएएचची बॅटरी ही या फोनची काही वैशिष्ट्ये आहेत.
इ श्रेणीतील फोनची वैशिष्ट्ये जवळजवळ अशाच प्रकारची आहेत. फक्त बाहेरील आवरण प्लॅस्टिकचे आहे. ई५ चा ५ इंचाचा सुपर अमोलेड डिस्प्ले आहे. तर ई७ ला ५.५ इंचाचा एचडी सुपर अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. १.५ जीबी रॅम, १६ जीबी अंतर्गत मेमरी (६४ जीबीपर्यंत वाढविता येते), ८ मेगापिक्सल मागील बाजूचा कॅमेरा, ५ मेगापिक्सल पुढील बाजूचा कॅमेरा आणि २४०० एमएएच ची बॅटरी ही ई५ ची अन्य वैशिष्ट्ये आहेत.
गॅलेक्सी ई७ मध्ये मागील बाजूस १३ मेगापिक्सलचा तर पुढील बाजूस ५ मेगापिक्सलचा कॅमेरा असून, २ जीबी रॅम असलेल्या या फोनची १६ जीबीची अंतर्गत मेमरी ६४ जीबीपर्यंत वाढवता येते. या फोनमध्ये २९५० ची बॅटरी देण्यात आली आहे.