यंदाच्या दिवाळीमध्ये सर्वाधिक खप हा अल्ट्राबुकचा होणे अपेक्षित आहे. म्हणूनच अनेक कंपन्यांनी आता दिवाळीपूर्वी त्यांची अल्ट्राबुक्स बाजारात आणण्यास सुरुवात केली आहे. तीव्र स्पर्धेच्या या काळात एचसीएल मी सीरिजमध्ये ३०७४ हे अल्ट्राबुक आता बाजारात आले आहे. अलीकडे बाजारात येऊन दाखल झालेल्या अल्ट्राबुक्समध्ये इंटेल कोअर आयथ्री प्रोसेसर वापरण्यात आलेले हे पहिलेच अल्ट्राबुक आहे. काळ्या- करडय़ा रंगाचे मेटॅलिक बाह्य़ावरण हे त्याचे वैशिष्टय़ आहे. कमीत कमी वजन हे सर्वच अल्ट्राबुक्सचे खास वैशिष्टय़ आहे. काहींचे वजन हे १.५ किलो तर इतरांची त्याच आसपास आहेत. या अल्ट्राबुकचे वजन १.७ किलो एवढे आहे. त्यामुळे ते कुठेही सहज नेता येण्यासारखे तर आहेच पण त्याच्या बाह्य़ावरणामुळे ते स्टाइलिशही वाटते. डब्लूएक्सजीए एलइडी बॅकलीट डिस्प्ले हे त्याचे वैशिष्टय़ असून हा डिस्प्ले १४ इंचांचा आहे. त्याचे रिझोल्युशन १३६६ (गुणिले) ७६८ असे एचडी वर्गात मोडणारे आहे. कंपनीच्या दाव्यानुसार एकदा चार्ज केलेली बॅटरी सलग सात तास वापरता येऊ शकते. अल्ट्राबुकच्या बाबतीत बोलायचे तर त्याच्या बॅटरी लाइफ बरोबरच त्याच्यासाठी वापरलेला प्रोसेसर वेगवान असावा लागतो. अल्ट्राबुक बंद केल्यानंतर पुन्हा उघडताक्षणी त्याचा स्क्रीन सुरू होणे हे महत्त्वाचे लक्षण मानले जाते. याचा प्रोसेसर हा चांगला अद्ययावत आहे. त्याचप्रमाणे त्याचे रॅमही चांगल्या क्षमतेचे असावे लागते. या अल्ट्राबुकसाठी ग्राहकांना दोनपर्याय देण्यात आले आहेत. पहिला पर्याय हा ४ जीबी रॅमचा असून तुम्हाला गरज भासली तर ते अपग्रेड करण्याची सोयदेखील कंपनीने दिली आहे. तब्बल ८ जीबी रॅमपर्यंत ते वाढविता येऊ शकते. याचबरोबर इंटेल ४००० ग्राफिक्स, हायब्रीड आणि एसएसडी स्टोरेज याच्यासोबत देण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे अलीकडे लॅपटॉप्स चोरीला जाण्याचे प्रमाण वाढल्यानंतर आता इंटेल अ‍ॅन्टिथेफ्ट तंत्रज्ञानाचा वापर अल्ट्राबुक्समध्ये करण्यास अनेकांनी सुरुवात केली आहे. एचसीएलच्या या अल्ट्राबुकमध्ये त्याची मोफत आवृत्ती देण्यात आली असून ती केवळ ९० दिवसांसाठीच्याच मुदतीसाठी आहे. 
बाजारपेठेतील किंमत रु. ५१,९९०/- पासून पुढे