आता जग खूप बदलते आहे. या बदलत्या जगामध्ये अनेक नवीन गोष्टी येत आहेत. त्यातील काही या तर केवळ स्वप्नवत वाटतील अशाच आहे. काही वर्षांपूर्वी एका विज्ञानकथेमध्ये चित्रपटच काय पण अनेक बाबी पाहाता येतील, अशा चष्म्याचे वर्णन आले होते. काही महिन्यांपूर्वी गुगल या प्रसिद्ध कंपनीने अशाच प्रकारचा चष्मा गुगलने तयार करण्यास घेतल्याचे जाहीर केले होते. केवळ तेवढेच नव्हे तर त्याचे पहिले उत्पादन जगासमोर आणलेही होते.
सध्याचा जमाना हा ‘ऑन द गो’चा आहे. म्हणजे लोकांना एक काम करत असताना वेळ वाया घालवायचा नसतो. त्यामुळे एकाच वेळेस दोन कामे करण्याला ते प्राधान्य देतात. त्याचमुळे आता येणाऱ्या अनेक नव्या यंत्रणा या देखील ‘ऑन द गो’याच प्रकारामध्ये मोडणाऱ्या आहेत. एप्सन या प्रसिद्ध कंपनीने बाजारात आणलेले नवे उपकरण हे देखील याच प्रकारामध्य मोडणारे आहे. 
हा आहे चष्मा. पण तो एरवीच्या चष्म्यापेक्षाही खूप वेगळा, अद्ययावत आणि तंत्रज्ञानाने युक्त असा आहे. त्यामुळे या चष्म्यामध्ये तुम्हाला थेट चित्रपट ही पाहणे शक्य आहे. म्हणजे हा चष्मा घालून वावरायचे.. एकाच वेळेस आपल्याला पलीकडच्या बाजूला किंवा आजूबाजूला काय चालले आहे तेही कळणार आणि त्याचवेळेस चष्म्यामध्ये एखादा चित्रपटही पाहाता येणार, अशी त्याची रचना आहे. तुमचा म्युझिक प्लेअर, टॅब्लेट किंवा मग स्मार्टफोन तुम्हाला या चष्म्याला जोडता येतो आणि तुमच्या उपकरणांवरचे सारे काही  पाहाता व ऐकता येते. म्हणजे गाणी ऐकण्यासाठीही याचा वापर केला जाऊ शकतो. एकदा बॅटरी चार्ज केल्यानंतर तो तब्बल सहा तास सलग चालतो, असा कंपनीचा दावा आहे. त्याचप्रमाणे २ डी किंवा थ्रीडी व्हिडिओ  पाहण्यासाठी यामध्य मायक्रो- प्रोजेक्शन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. 
अर्थातच त्यामुळे याच्यासाठी अँड्रॉइड २.२ ऑपरेटिंग सिस्टिमचा वापर कऱ्ण्यात आला आहे. याचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे वाय- फायचा वापर करून तुम्हाला व्हिडिओ डाऊनलोडही करता येतात आणि ते साठवताही येतात. या चष्म्यामध्येच चार जीबीच्या मायक्रोएसडी कार्डाची सोय करून देण्यात आली आहे. त्यामुळे. व्हिडिओ त्याच्यावरही सेव्ह करता येतील. सोबत अर्थातच एक हेडसेट देण्यात आला असून तो डॉल्बी मोबाईल डिटॅचेबल स्टीरीओ साऊंड हेडफोन आहे.
भारतीय बाजारपेठेतील किंमत – रु. ४२,९००/-