एकीकडे नवनव्या कंपन्यांच्या प्रवेशामुळे स्मार्टफोनची बाजारपेठ दिवसेंदिवस समृद्ध आणि स्वस्त होत असताना टॅब्लेटच्या बाजारातही आता हा ट्रेंड रुजू लागला आहे. सॅमसंग, अॅपल, सोनी, एसर अशा मोठमोठय़ा कंपन्यांसोबतच मायक्रोमॅक्स, कार्बन, लेनोव्हो या कंपन्यांच्या कमी दरातील टॅब्लेट्समुळे टॅब्लेटची मागणी वाढत आहे. त्यातच आता हेवर्ड पॅकर्ड अर्थात एचपीनेही दणक्यात प्रवेश केला आहे. कॉम्प्युटर, प्रिंटर आणि त्याच्याशी संबंधित उत्पादनांमध्ये अग्रेसर असलेल्या एचपीने अलीकडेच स्लेट ७ आणि स्लेट ६ या नावाचे दोन व्हॉइस टॅब भारतात आणले आहेत. स्क्रीनमधील एक इंच आकाराचा फरक सोडला तर दोन्ही टॅब पूर्णपणे सारखेच आहेत. मात्र मोठी स्क्रीन आणि तरीही १६९९० रुपये इतकी कमी किंमत यामुळे स्लेट ७ केवळ स्लेट ६ लाच नव्हे तर सॅमसंगचा गॅलॅक्सी टॅब ३ आणि त्या किंमतश्रेणीतील अन्य टॅब्लेटना आरामात मागे टाकू शकतो.
एचपीच्या या टॅबचं सर्वात मोठं वैशिष्टय़ त्याची किंमत आहे, असं म्हणायला हरकत नाही. ७ इंच आकाराची आयपीएस डिस्प्ले, १.२ गिगाहार्ट्झचा क्वाड कोअर प्रोसेसर, १६ जीबी इंटर्नल मेमरी, डय़ूअल सीम, व्हॉइस कॉलिंग, थ्रीजी एनेबल्ड आणि कमी वजन या वैशिष्टय़ांकडे पाहिलं तर १६९९० या किमतीमध्ये ही वैशिष्टय़े क्वचितच अन्य टॅब्लेटमध्ये सापडतील. अन्य टॅब्लेटची तुलना करताना ही गोष्ट प्रकर्षांने समोर येते.

डिस्प्ले
एचपी व्हॉइस स्लेट ७ ची स्क्रीन ७ इंच आकाराची आहे. इतक्याच आकाराची स्क्रीन असलेले सात हजार रुपयांपासून अनेक टॅब्लेट उपलब्ध आहेत. मात्र व्हॉइस टॅबची स्क्रीन अन्य टॅब्लेटच्या तुलनेत आकाराने किंचित मोठी आहे. किंबहुना या स्क्रीनकडे पाहिलं की प्रथमदर्शनी तसं जाणवतं. १६ मिलियन कलर्स असलेली आयपीएस कॅपॅसिटिव्ह टचस्क्रीन फारशी वेगळी नाही. विशेषत: सध्या स्मार्टफोन आणि टॅब्लेट्समध्ये एचडी डिस्प्लेला प्राधान्य दिले जात असताना एचपी स्लेट ७ आयपीएस स्क्रीनवरच काम चालवतो. पण तरीही हा डिस्प्ले दर्जेदार आहे. मूव्हीज किंवा व्हिडीओ साँग्स पाहताना त्यातील रंगांना हा डिस्प्ले अचूकपणे दर्शवतो. त्यामुळे एचडी स्क्रीन नसली तरी त्याची कमतरता जाणवत नाही.

डिझाइन
एचपी स्लेट ७ चा आकार सर्वसामान्य सात इंची टॅब्लेटपेक्षा किंचित मोठा आहे. स्क्रीनची वाढलेली रुंदी आणि टॅबच्या दोन्ही बाजूला असलेले स्टिरीओ स्पीकर्स यामुळे टॅबचा आकार जास्त आहे. या टॅब्लेटचा संपूर्ण लूक मेटॅलिक आहे. मात्र प्रत्यक्षात त्याची मागची केस प्लास्टिकची आहे. हे प्लास्टिक कव्हर पातळ आणि लवचिक आहे. त्यामुळे ते काढताना फार मेहनत करावी लागत नाही.
मात्र ते तुटण्याचीही भीती असते. या टॅब्लेटचे वजन ३२५ ग्रॅम आहे आणि जाडी ९.८ मिमी इतकी आहे. त्यामुळे तो हाताळणे कठीण जात नाही. या टॅब्लेटला व्हॉइस कॉलिंगची सुविधा आहे. मात्र फोनचा आकार आणि जाडी पाहता तो कानाला लावून बोलणं अतिशय त्रासदायक आणि गमतीदार दिसू शकतं. अर्थात यासाठी ब्लूटूथ किंवा हेडफोनचा वापर करणं सहज शक्य आहे.

कॅमेरा
स्लेट ७ चा मागील कॅमेरा पाच मेगापिक्सेल आणि पुढील कॅमेरा दोन मेगा पिक्सेलचा आहे. याबाबतीत एचपीने बरीच तडजोड केली आहे. विशेषत: सध्या अगदी आठ हजार रुपयांपर्यंतच्या स्मार्टफोनमध्ये पाच मेगापिक्सेल कॅमेरा मिळत असताना १७ हजार रुपयांच्या टॅब्लेटला इतक्या मेगापिक्सेलचा कॅमेरा योग्य ठरत नाही. अर्थात सॅमसंगच्या गॅलक्सी टॅबच्या (तीन मेगा पिक्सेल बॅक आणि व्हीजीए फ्रंट) तुलनेत व्हॉइस टॅब सरस आहे. दोन्ही बाजूच्या कॅमेऱ्यांतून घेतलेल्या फोटो किंवा व्हिडीओची क्वालिटी चांगली आहे. मात्र एलईडी फ्लॅश नसल्याने रात्रीच्या वेळी किंवा अंधारात या कॅमेऱ्यांचा उपयोग नाही. यामध्ये ७२० पी दर्जाच्या व्हिडीओ रेकॉर्डिगची सुविधा आहे. एकंदरीत कॅमेऱ्याच्या बाबतीत व्हॉइस टॅब काहीसा कमकुवत आहे. तरीही त्या किंमत श्रेणीतील अन्य टॅब्लेटपेक्षा तो बराच म्हणावा लागेल.

मेमरी आणि कार्य
व्हॉइस टॅबमध्ये १६ जीबी इंटर्नल मेमरी असून एक्स्टर्नल स्टोअरेज ३२ जीबीपर्यंत क्षमतेचा आहे. त्यामुळे जागा ही अडचण या टॅबमध्ये जाणवण्याची शक्यता नाही. विशेषत: याच किमतीत असलेल्या सॅमसंगच्या गॅलक्सी टॅब ३ मध्ये ८ जीबीइतकीच इंटर्नल मेमरी आहे. या टॅबमध्ये १.२ गिगाहार्ट्झचा क्वाड कोअर प्रोसेसर आहे. तो एकाच वेळी अनेक अॅप्लिकेशन समर्थपणे सक्षम ठेवतो. या टॅब्लेटमध्ये अँड्रॉइड जेली बिन ऑपरेटिंग सिस्टीम आहे. ती अपग्रेडेबल आहे की नाही, याबाबत कंपनीने अद्याप काहीही जाहीर केलेले नाही.

बॅटरी
व्हॉइस टॅबमध्ये ४१०० मिलियन अम्पी हवर्स क्षमतेची बॅटरी आहे. ही बॅटरी इनबिल्ट असल्याने ती वेगळी करता येत नाही. पूर्णपणे चार्ज केल्यानंतर ही बॅटरी अख्खा दिवस चालू शकते. मात्र व्हॉट्स अप आणि व्हॉइस कॉलिंगचा वापर जास्त असल्यास ती किमान दहा तासांपर्यंत तग धरू शकते.सध्या बाजारात सात हजार रुपयांपासून टॅब्लेट मिळत आहेत. मात्र त्यांचा दर्जा आणि कंपनीची विश्वासार्हता याबद्दल ग्राहक साशंक असतात. चांगल्या कंपन्यांचे दर्जेदार टॅब्लेट वीस हजार रुपयांपेक्षा अधिक किमतीचे आहेत. तुम्ही व्हॉइस कॉलिंग आणि कॅमेरा याबद्दल आग्रही असाल स्लेट ७ योग्य उत्तर नाही. परंतु अन्य बाबतीत एचपी व्हॉइस टॅब स्लेट ७ हा चांगला पर्याय ठरू शकतो.