इंटरनेटचा वापर ज्या प्रमाणात वाढतो आहे त्या प्रमाणात त्यासाठीचे पर्यायही वाढू लागले आहेत. यामुळे सध्या मार्केटमध्ये वायर, वायरलेस, वाय-फाय असे विविध पर्याय उपलब्ध झाले आहेत. यात पुन्हा वायरलेसला आणखी चांगली मागणी आहे. म्हणूनच इंटरनेट सुविधा पुरविणाऱ्या डोंगल कंपन्यांमध्ये तुंबळ युद्ध रंगले आहे. एअरटेलने नुकतेच वाय-फाय डोंगल बाजारात आणले आहे. यामुळे आता हळूहळू वाय-फाय डोंगल्सची तगडी स्पर्धा रंगण्याची चिन्हे आहेत.
फिरते इंटरनेट म्हणून ज्याची ओळख आहे, असे हे डोंगल. ज्याचा वापर आपण घरात बसून किंवा अगदी चालत्या लोकलगाडीमध्येही करू शकतो. यामुळे सध्या डोंगलला खूप मागणी आहे. ही मागणी लक्षात घेता बहुतांश कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरू झाल्यात आणि डोंगल आपल्याला अगदी स्वस्तात उपलब्ध होऊ लागले. यातच आता वाय-फाय डोंगलही बाजारात येऊ लागले आहेत. यामुळे आता ही स्पर्धा अधिकच रंगू लागणार आहे. या स्पध्रेमुळे ग्राहकांना मात्र त्याचा चांगलाच फायदा होणार आहे.

बाजारात उपलब्ध असलेले डोंगल
मोबाइल सेवा देणाऱ्या सर्व कंपन्यांचे डोंगल बाजारात उपलब्ध आहेत. यामुळे त्यांची स्पर्धा तगडी आहे. यामध्ये आयडिया, एअरटेल, व्होडाफोन, रिलायन्स, टाटा, एमटीएनएल, बीएसएनएल, एअरसेल या कंपन्या आघाडीवर आहेत. याशिवाय ज्या कंपन्या मोबाइल सेवेत नाहीत, अशा एमटीएस यांसारख्या कंपन्याही या सेवेत आहेत. सध्या बाजारात या सर्व कंपन्यांचे थ्रीजी डोंगल्स उपलब्ध आहेत. हे थ्रीजी डोंगल्स ६ ते २१ एमबीपीएस अशा विविध वेगांचे उपलब्ध आहेत. याउलट आपल्याला मोबाइलमधील थ्रीजी डेटा हा ४ ते ७ एमबीपीएस या वेगाने मिळतो. यामुळे मोबाइलपेक्षा केव्हाही डोंगलचा वापर करून इंटरनेट वापरणे सोपे होते. याचबरोबर मोबाइल इंटरनेटला आपल्याला रोिमगचे दर भरावे लागतात, जे आपल्याला डोंगलसाठी मोजावे लागत नाहीत. यामुळे आपल्याला आपण घेतलेल्या प्लॅननुसार थ्रीजी डोंगल देशभरात संबंधित कंपनीचे नेटवर्क उपलब्ध असेल त्या ठिकाणी वापरता येऊ शकतात.
* जानेवारी महिन्यात वोडाफोनने के हा थ्रीजी डोंगल बाजारात आणला होता. या डोंगलमधून डाऊनलोिडगसाठी आपल्याला २१.१ एमबीपीएस इतका तर अपलोिडगसाठी ५.७६ एमबीपीएस इतका वेग मिळतो. याशिवाय यामध्ये आपण ३२ जीबी स्टोअरेजही करू शकतो. यामधून आपण आपल्या संगणकावरूनच आपल्या फोनबुकमधील संपर्क क्रमांकावर एसएमएसही पाठवू शकतो. हा डोंगल सर्वच ऑपरेटिंग सिस्टिमवर सहज काम करतो.
* आयडिया सेल्युलसनेही थ्रीजी डोंगल बाजारात आणला असून यामध्येही आपल्याला २१.६ एमबीपीएस इतका डाऊनलोिडगचा वेग मिळतो. इतकाच वेग असलेले डोंगल्स रिलायन्स कम्युनिकेशन, एअरटेल, एअरसेल, टाटा डोकोमो या कंपन्यांचे आहेत. एमटीएस या इंटरनेट सेवा पुरविणाऱ्या कंपनीने ९.८ एमबीपीएस वेग असलेले डोंगल बाजारात आणले आहे.
*  बीएसएनएल आणि एमटीएनएल या सरकारी दूरसंचार कंपन्यांही डोंगल सुविधा पुरवितात. बीएसएनएलचा वेग १४.६ एमबीपीएस इतका आहे. खासगी कंपन्यांच्या तुलनेत या कंपन्यांचा वेग कमी असला तरी या कंपन्या देत असलेले डेटा प्लॅन्स हे खूप आकर्षक आणि उपयुक्तअसे आहे.
*  एअरटेलने नुकताच बाजारात वाय-फाय डोंगल आणला आहे. या डोंगलच्या मदतीने आपण एकाच वेळी तीन ते पाच विविध उपकरणे इंटरनेटशी जोडू शकतो. सामान्य डोंगलचा वापर आपण एका वेळी एकाच उपकरणावर करू शकतो. मात्र एअरटेलच्या या डोंगलचा वापर आपण वाय-फाय राऊटरसारखा करू शकतो आणि ते एका उपकरणाशी जोडल्यावर वाय-फाय सुरू केल्यानंतर पाच उपकरणे आपण याच्याशी जोडू शकतो.
*  मोबाइल कंपन्या डोंगल सेवा पुरवीत असताना आपल्याला डोंगल हे उपकरण देतात. पण याशिवाय बाजारात मायक्रोमॅक्स, हुवाई, मक्र्युरी अशा विविध कंपन्यांचे डोंगल्सही उपलब्ध आहेत. या डोंगल्सच्या माध्यमातूनही आपण वाय-फाय हब तयार करून एकाच वेळी पाच उपकरणांवर इंटरनेट जोडणी करू शकतो. याशिवाय या डोंगल्समध्ये आपल्याला माहिती साठविण्याची क्षमताही दिली जाते. जेणेकरून पेन ड्राइव्हसारखा आपण याचा वापर करू शकतो.
*  डोंगलचा विविधांगी उपयोग करून घेण्यासाठी आता बडय़ा कंपन्याही या बाजारात उतरू पाहत आहेत. गुगलने मध्यंतरी क्रोमकास्ट हे व्हिडीओ डोंगल सादर केले. टीव्हीला कनेक्ट करून या डोंगलच्या आधारे यूटय़ूब आणि इतर साइट्सवरील व्हिडीओ पाहता येणार आहेत. सध्या अमेरिकेत हे डिव्हाइस उपलब्ध असले तरी लवकरच त्याचे भारतातही आगमन होणार आहे. सध्या या उपकरणाची किंमत ३५ डॉलर ठरविण्यात आली आहे. अ‍ॅपल टीव्हीसाठी सेट टॉप बॉक्स घ्यायचा असेल तर १०० डॉलर मोजावे लागतात. तर वेबबेस्ड अ‍ॅप्लिकेशन चालविण्यासाठी आवश्यक टीव्हीची किंमत १ हजार डॉलर आहे. त्या तुलनेत क्रोमकास्ट स्वस्तच म्हणावा लागेल. अ‍ॅपल टीव्ही वगैरे इंटरनेटला कनेक्ट होणारे असले, तरी त्यांना सोबत घेऊन फिरणे शक्य नाही. क्रोमकास्ट हे केवळ डोंगल असल्याने सोबत कुठेही नेऊन वापरता येते. टीव्हीला जोडा, वायफाय कनेक्ट करा आणि सुरू करा त्याचा वापर, इतके ते सोपे आहे. क्रोमकास्ट यूटय़ूब, नेटफ्लिक्स आणि गुगल प्लेसारख्या अ‍ॅप्लिकेशनला ते सपोर्ट करते. पैसे मोजले तर अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओ आणि एचबीओ गोदेखील यावर पाहता येतात. त्यामुळे अनेक महत्त्वाच्या गोष्टी सुलभ होतात. आयफोन, आयपॅड, अण्ड्रॉइड मोबाइल किंवा टॅब क्रोमकास्टच्या साहाय्याने थेट टीव्हीशी जोडता येतो. त्यामुळे तुमच्या मोबाइल, टॅबमधील व्हिडीओ थेट टीव्हीवर पाहता येतात. यासाठी कुठल्याही विशेष रिमोटची गरज पडत नाही. क्रोमकास्ट घेतल्यावर सेट टॉप बॉक्स, इंटरनेट डोंगल यांसारख्या इतर कुठल्याही उपकरणाची गरज पडत नाही. केवळ क्रोमकास्टच्या आधारे व्हिडीओ आणि ऑडिओ टीव्हीवर थेट पाहता येतात. गुगलचा हा डोंगल सध्या भारतीय बाजारात उपलब्ध नसला तरी तो लवकरच उपलब्ध होईल, अशी अपेक्षा आहे.

डोंगल खरेदी करताना काय काळजी घ्याल?
*    आपण डोंगलचा सर्वाधिक वापर ज्या ठिकाणी करणार आहोत उदाहणार्थ घर किंवा ऑफिस त्या ठिकाणी आपण ज्या कंपनीचे डोंगल घेत आहोत त्या कंपनीचे नेटवर्क तेथे उपलब्ध आहे का हे तपासून घेणे.
*    तुमचा इंटरनेटचा वापर किती होईल याबाबतचे अंदाजपत्रक तयार करा. यामध्ये फक्त सìफगचा वेळ धरू नका. तुम्ही किती व्हिडीओज् पाहणार आहात, किती डाऊनलोिडग तसेच अपलोिडग करणार आहात याचा अंदाज बांधणे अधिक महत्त्वाचे आहे.
*    ज्या वेळेस तुम्हाला खूप काम करायचे असेल त्या वेळेस किती वेग असणे अपेक्षित आहे याचाही अंदाज काढून ठेवा.
*    सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही महिन्याला डोंगल इंटरनेटवर किती रुपये खर्च करू शकणार आहात.
हे सर्व नियोजन झाल्यावर तुम्हाला विविध कंपन्यांच्या डेटा प्लॅन्स, त्यांचा वेग याचा अभ्यास करून प्लॅन निवडणे सोपे जाईल. सामान्यत: कंपन्या सामान्य डेटा प्लॅन वापरकर्ता, मध्यम डेटा प्लॅन वापरकर्ता आणि जास्त डेटा प्लॅन वापरकर्ता अशा तीन प्रकारांत सुविधा पुरवितात. आपल्या वापरानुसार आपण प्लॅनची निवड केली म्हणजे ते अधिक सोयीचे जाते आणि आपल्या बजेटमध्येही बसते.

सध्या बाजारात इंटरनेटचा वापर मोठय़ा प्रमाणावर होत आहे. यात प्रथमच इंटरनेटचा वापर करणाऱ्यांना आकर्षति करण्यासाठी डोंगल हे माध्यम अधिक प्रभावी ठरू शकते. तसेच स्मार्टफोन ज्या प्रमाणात वाढत आहेत त्या प्रमाणात हा वापरही वाढत आहे. अशा वेळी ग्राहकांना चांगली इंटरनेट सुविधा पुरविणे हे एक आव्हान आहेच, पण एअरटेलसारख्या कंपन्यांकडे थ्रीजी, फोरजी इतकेच नव्हे तर १८०० एमएचझेडचे परवाने असल्यामुळे ही सेवा पुरविणे अधिक सोपे होईल.
– अशोक गणपती, हब सीईओ
(गुजरात, मुंबई, महाराष्ट्र आणि गोवा), एअरटेल.