भारतातील घरगुती इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांच्या विक्रीत आघाडीवर असलेल्या एलजी कंपनीकडून येत्या वर्षभरात सादर होत असलेल्या उत्पादनांची माहिती देण्यासाठी दिल्लीत नुकताच एक ‘टेक शो’ पार पडला. जगातील पहिला ५के टीव्ही, वक्राकार स्मार्टफोन, इन्व्हर्टर असलेला फ्रिज, ‘स्मार्ट’ यंत्रणेमुळे स्वत:तील बिघाड शोधणारी वॉशिंग मशीन अशा वैशिष्टय़पूर्ण उपकरणांसह सुमारे २०० उत्पादने या टेक शोमध्ये पाहायला मिळाली. यापैकी अनेक घरगुती उपकरणे भविष्यातील ग्राहकोपयोगी वस्तू आणि तंत्रज्ञानाची चुणूक दाखवणारी ठरली.
भारत हा जगातील मोठी बाजारपेठ बनला आहे, या वाक्याची परदेशी कंपन्यांनी मनाशी पक्की खुणगाठ बांधली आहे. किंबहुना भारतीय बाजाराचं महत्त्व आणि त्याची उलाढाल यांची जाणीव भारतीयांना होण्याआधीच या कंपन्यांना झाली आहे. भारताची प्रचंड लोकसंख्या, यापैकी सुमारे अध्र्या लोकसंख्येची उंचावत असलेली जीवनशैली, त्यामुळे फोफावत असलेला उपभोक्ता वर्ग या सर्वामुळे भारत आणि भारतीय ग्राहक हे जगातील मोठमोठय़ा कंपन्यांच्या रडारवर आहेत. हे चांगल्या अर्थाने घ्यायचे यासाठी की, भारतीय ग्राहकांच्या गरजा, त्यांची खर्च करण्याची ऐपत आणि कोणत्या गोष्टीवर किती खर्च करावे, याबाबतचा एक दृष्टिकोन या साऱ्यांची जाणीव आता या कंपन्यांना झाली आहे. त्यामुळेच अलीकडच्या काळात मोबाइलपासून टीव्हीपर्यंतच्या प्रत्येक कंपनीकडून भारतीय ग्राहकांसाठी खास तयार केलेली उत्पादने बाजारात आणली जात असतात. सदैव सर्वकाळ अद्ययावत होत असलेल्या तंत्रज्ञानामुळे हे शक्य होत आहे. दहा दिवसांपूर्वीच दिल्लीमध्ये पार पडलेल्या एलजी कंपनीच्या ‘टेक शो’मधूनही हीच गोष्ट अधोरेखित झाली.
एकीकडे, साठ लाखांचा ५ के टीव्ही, ७७ इंचाचा फोर के कव्‍‌र्ह्ड टीव्ही, सुपरवॉल व्हिडीओ वॉल अशी महागडी आणि केवळ अतिश्रीमंतांनाच परवडतील, अशी उत्पादने बाजारात आणतानाच एलजीने भारती ग्राहकांच्या गरजा, अपेक्षा आणि बजेट यांवर लक्ष ठेवूनही अनेक उत्पादने आणण्याची घोषणा केली आहे. भारतातील वीजसमस्या डोळ्यांसमोर ठेवून इन्व्हर्टर असलेला फ्रिज आणि एसी कंपनीने जाहीर केला आहे. मच्छर पळवणाऱ्या तंत्रज्ञानावर आधारित एसी ही अशीच एक संकल्पना. या उत्पादनांतून भारतीय ग्राहकाला आकर्षित करण्याचा एलजीचा प्रयत्न आहे.
याशिवाय एलजीने भविष्याचा वेध घेऊन आणलेली काही उपकरणेही वैशिष्टय़पूर्ण आहेत. यापैकी ‘क्लोथिंग केअर एलजी स्टायलर’ ही यंत्रणा वॉशिंग मशीनवरही मात करणारी यंत्रणा आहे. धुण्यासाठी त्रासदायक ठरणारे कोट, जीन्स किंवा जाड कपडय़ांना अजिबात पाणी न लावता स्वच्छ करणारी ही यंत्रणा एलजीच्या भविष्यकालीन उत्पादनांच्या श्रेणीतील अव्वल निर्मिती ठरू शकते. या कपाटवजा यंत्रणेत ठेवलेल्या कपडय़ांतील दरुगधी मिटवण्यासाठी गरम सुगंधित वाफेचा मारा केला जातो. त्यानंतर ‘शेकिंग हँगर’च्या मदतीने कपडय़ांवरील धूळ झटकली जाते आणि सुरकुत्याही नाहीशा केल्या जातात. शिवाय यामध्ये जंतुनाशक यंत्रणाही काम करते. त्यामुळे घातलेले कपडेही दुसऱ्या दिवशी ताजे दिसतात.
अशाच प्रकारे एलजीने ‘ट्विन वॉश’ वॉशिंग मशीनही मांडली होती. या वॉशिंगमध्ये एकाच वेळी दोन टबमध्ये कपडे धुता येतात. मुख्य टब नेहमीसारखे कपडे धुतो तर ‘मिनी वॉशर’ नाजूक किंवा कमी वजनाचे कपडे धुतो. शिवाय ‘मिनी वॉशर’ वापरात नसतो तेव्हा तो मुख्य वॉशरला कपडे धुण्यास मदत करतो. त्यामुळे कपडे धुऊन निघण्याचा वेळ कमी होतो. विशेष म्हणजे, एलजीच्या सध्याच्या कोणत्याही ‘फ्रंट लोडिंग’ मशीनसोबत हा ‘मिनी वॉशर’ जोडता येतो.
याशिवाय एलजीने गरम किंवा थंड पाणी तसेच बर्फ पुरवणारा ‘वॉटर प्युरिफायर’ आणि वायरविरहित ‘कॉर्ड झिरो’ व्हॅक्यूम क्लीनरही ‘टेकशो’मध्ये मांडला होता. ही सगळी उत्पादने आजघडीला भारतीय बाजाराला किती आवश्यक आहे, असा प्रश्न पडू शकतो. पण ग्राहकवर्गाची वाढती खरेदीक्षमता आणि उंचावणारे अर्थमान यांमुळे ही उत्पादने येत्या काळात लोकप्रिय ठरतील, यात शंका नाही.

एलजी ‘टेक शो’मधील अन्य काही उत्पादने
एलजी जी फ्लेक्स २
वक्राकार स्मार्टफोनच्या श्रेणीत गेल्या वर्षी ‘जी फ्लेक्स’च्या माध्यमातून श्रीगणेशा केल्यानंतर एलजीने यंदा ‘जी फ्लेक्स २’ची निर्मिती केली आहे. जी फ्लेक्सच्या तुलनेत काहीसा स्वस्त असला तरी ‘जी फ्लेक्स२’ अधिक वैशिष्टय़पूर्ण आहे.
स्नॅपड्रॅगन ८१० प्रोसेसर, ५.५ इंचाचा फुल एचडी डिस्प्ले, १६ जीबी इंटर्नल मेमरी, दोन जीबी रॅम, १३ एमपी बॅक व २.१ एमपी फ्रंट कॅमेरा अशी या स्मार्टफोनची काही वैशिष्टय़े आहेत.

एलजी म्युझिक फ्लो
गेल्या वर्षी आणलेल्या ‘साउंड बार’नंतर एलजीने आता ‘म्युझिक फ्लो’च्या माध्यमातून ‘आवाजा’च्या दुनियेवर राज्य करण्याचा प्रयत्न केला आहे. तुमच्या प्रत्येक उपकरणाशी नेटवर्कच्या साह्याने त्वरित जोडून गाणी ऐकण्याचा आनंद म्युझिक फ्लोच्या मदतीने घेता येतो. शिवाय स्मार्टफोनमध्ये म्युझिक फ्लोचे अ‍ॅप डाउनलोड करून त्याद्वारे ही सगळी गाणी वाजवता येतात.

एलजी स्मार्ट इन्व्हर्टर रेफ्रिजरेटर
घरातील इन्व्हर्टरशी जोडल्यानंतर पुढच्या वेळी विद्युत पुरवठा खंडित झाल्यासरशी लगेच इन्व्हर्टरकडून वीजपुरवठा घेणारा स्मार्ट रेफ्रिजरेटर खास भारतीय ग्राहकांसाठी बनवण्यात आला आहे. शिवाय यामध्ये स्मार्ट डायग्नॉस्टिक यंत्रणा बसवण्यात आली असल्याने फ्रिजमध्ये झालेला कोणताही बिघाड संगणकाच्या मदतीने तपासता येतो. २५५ ते ४९५ लिटरच्या क्षमतेचे हे फ्रिज २६५०० ते ६६१०० रुपयांच्या श्रेणीत उपलब्ध आहेत.
– आसिफ बागवान
asif.bagwan@expressindia.com