दशकभरापूर्वी तरुणाईला वेड लावणाऱ्या नि सोशल नेटवर्किंग साइटमध्ये पहिलीवहिली मानली जाणारी ‘ऑर्कुट’ ही साईट मंगळवारी जगाचा निरोप घेणार आहे. गुगलच्या या सोशल नेटवर्किंग साईटसाठी मंगळवारचा दिवस अखेरचा असून, एकेकाळी तरूणाईचा कट्टा अशी ओळख असणारी ही साईट इतिहासजमा होणार आहे. नवीन सोशल नेटवर्किंग साईटसमुळे ऑर्कुटची कमी झालेली लोकप्रियता पाहता, गुगलने ही साईट बंद करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वीच घेतला होता.
सध्या युझर्सच्या अनेक आठवणी, फोटो साईटवर अजूनही उपलब्ध आहेत. त्यामुळे जुने युझर्स त्यांचा प्रोफाईल डेटा, पोस्ट आणि फोटोंचा बॅकअप घेऊ शकतात. ऑर्कुट बुयुक्कोकटेन या ‘गुगल’मधील स्टाफ मेंबरनं ‘ऑर्कुट’ची रचना केली होती. त्याच्याच नावावरून ‘ऑर्कुट’ हे नाव या साईटला दिलं गेलं. हे उद्दिष्ट गाठण्यात ‘ऑर्कुट’ला सुरुवातीला चांगलं यश मिळालं होतं. तेव्हा सोशल नेटवर्किंगबाबत वाटणारं आकर्षण, इंटरनेट सर्रास उपलब्ध नसणं नि ‘ऑर्कुट’च्या निमित्तानं तरुणाईनं नेटसॅव्ही होणं या आता फुटकळ वाटू शकणाऱ्या गोष्टीत बरंच काही घडलं होतं. एक प्रकारची ती ‘सोशल ई क्रांती’च होती.