सध्या तरुणाईमधील लोकप्रिय असलेला ब्रॅण्ड म्हणजे आसूस. लॅपटॉप्स, नोटबुक्समध्येही हाच ब्रॅण्ड लोकप्रिय आहे. कमी किंमत आणि चांगली कार्यक्षमता यासाठी बहुसंख्य विद्यार्थी आसूसला प्राधान्य देतात. किंबहुना म्हणूनच आसूसचे अल्ट्राबुक बाजारात केव्हा येते याकडे विद्यार्थी वर्ग लक्ष ठेवून होता. आता त्यांची प्रतीक्षा संपली आहे.
आसूसने एस मालिकेमध्ये त्यांची अल्ट्राबुक्स बाजारपेठेत आणली आहेत. यात थर्ड जनरेशन इंटेल कोअर प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे त्याचा वेग आणि कार्यक्षमता दोन्हींमध्ये वाढ झाली आहे. याशिवाय यात बिल्ट इन ऑप्टिकल ड्राइव्ह देण्यात आला आहे. शिवाय इंटेलच्या कमीत कमी वीज वापरून अधिक कार्यक्षमता देणाऱ्या आयव्ही ब्रीज प्रोसेसरचाही वापर करण्यात आला आहे.
त्याचे वजन अवघे २.४ किलोग्रॅम्सचे आहे. १५.६ इंचाचा एचडी एलइडी स्क्रीन हे त्याचे वैशिष्ट्य आहे. बॅकलिट ग्लेअर डिस्प्लेमुळे  दिवसाउजेडी काम करताना त्यावर प्रतििबब दिसत नाही किंवा तो चमकत नाही आणि म्हणूनच काम करणे सोपे जाते. सोनिक मास्टर लाइट तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्यामुळे डिस्प्लेमध्ये खूपच सुधारणा झालेली दिसते.
या अल्ट्राबुकचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे हायब्रीड स्टोरेज. यात २४ जीबी एसडीडी आणि ५०० किंवा त्याचप्रमाणे ७५० जीबी एचडीडी वापरण्यात आली आहे.
१३ दिवसांचा स्टँडबाय टाइम हेही त्याचे एक महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणायला हवे. इतर अल्ट्राबुकप्रमाणेच तो अवघ्या दोन सेकंदांत स्लीप मोडमधून पुन्हा सुरू होतो.
भारतीय बाजारपेठेतील किंमत : रु. ४६,९९९/-