स्मार्टफोनच्या चलतीसोबतच या फोन्सवर चालणाऱ्या अ‍ॅप्सना जणू पूरच आला आहे. गुगल प्ले, सॅमसंग अ‍ॅप्स किंवा तत्सम अधिकृत अ‍ॅप्स स्टोअर्सच्या पलीकडेही अनेक संकेतस्थळे अ‍ॅण्ड्रॉइड प्लॅटफॉर्मसाठी अ‍ॅप्स पुरवतात. दररोज लाखोंच्या संख्येने अ‍ॅप्स डाऊनलोड आणि इन्स्टॉल केले जातात. यातील काही अतिशय लोकप्रिय ठरतात तर काही अल्पावधीतच बाद होतात. अ‍ॅप्सची लोकप्रियता ठरते ती त्याच्या उपयुक्तता किंवा मनोरंजनात्मक वैशिष्टय़ांमुळे. पण काही अ‍ॅप्स असे असतात, ज्यांना उपयुक्तता किंवा मनोरंजन या दोन्ही बाबतीत काडीचीही किंमत नसते, पण तरीही ते ‘हिट’ ठरतात. अशाच काही नकोशा पण तरीही हव्याशा अ‍ॅप्सविषयी..
मॉस्क्युटो रीपेलन्ट अ‍ॅप
डास, मच्छर यांचा त्रास सर्वत्रच जाणवत असतो. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी धूप जाळण्यापासून मॉस्क्युटो किलिंग मशीनपर्यंत सगळे उपाय वेळोवेळी आजमावले जात असतात. पण तुमचा स्मार्टफोन या कामात मदत करू शकत असेल तर.. अशक्य वाटते ना! हे खरोखरच अशक्य आहे. पण अ‍ॅण्ड्रॉइडवरील ‘मॉस्क्युटो रीपेलन्ट अ‍ॅप’ तरीही वापरकर्त्यांच्या आकर्षणाचे केंद्र आहेत. या अ‍ॅपमधून परावर्तित होणारा अतिउच्च ‘अल्ट्रा साऊंड’ मच्छरांना दूर पळवतो, असा अ‍ॅपच्या निर्मात्यांचा दावा आहे. पण बीबीसीच्या एका मासिकानुसार, या संदर्भात एका संस्थेने परीक्षण करून हे अ‍ॅप म्हणजे, ‘फुकटचा टाइमपास’ असल्याचे सिद्ध केले आहे. अर्थात तरीही मच्छर पळवणारे असे अनेक अ‍ॅप्स तुम्हाला आजही अ‍ॅण्ड्राइडच्या अ‍ॅप्स स्टोअरवर पाहायला मिळतील.
हॅलो काऊ
आपण बोलतो तसे विचित्र आवाजात बोलणारा ‘टॉकिंग टॉम’ आबालवृद्धांसाठी करमणुकीचे साधन आहे. ‘टॉकिंग टॉम’च्या लोकप्रियतेने बोलणारा पोपट, बोबडे बोल ऐकवणारे बाळ अशा अनेक अ‍ॅप्सना जन्म दिला. पण अ‍ॅपलच्या आयटय़ून्सवरील ‘हॅलो काऊ’ म्हणजे अतिरेकच! हे अ‍ॅप ओपन केल्यानंतर आपल्याला दिसते ती आपल्याकडे रोखून बघणारी एक गाय. आता या गाईला (म्हणजेच फोनच्या स्क्रीनला) स्पर्श करताच ती हंबरते. बस्स! एवढंच या अ‍ॅपच कर्तृत्व. पण आजघडीला लाखो लोकांनी डाऊनलोड केलेलं हे अ‍ॅप अजूनही लोकप्रियतेच्या शिखरावर आहे.

एक्स रे स्कॅनर अ‍ॅप
तुमचा अ‍ॅण्ड्रॉइड मोबाइलच तुम्हाला एक्सरे काढून देत असेल तर पॅथॉलॉजीच्या प्रयोगशाळा बंदच कराव्या लागतील. पण म्हटलं ना, अ‍ॅण्ड्रॉइडवर आता काहीही मिळतं. ‘एक्स रे अ‍ॅप’ हे असेच गमतीशीर अ‍ॅप आहे. हे अ‍ॅप्लिकेशन तुमच्या हाता-पायांचा किंवा बोटांचा एक्सरे दाखवतं. चकित झालात ना! पण थांबा, तसं काहीही होत नाही. या अ‍ॅपमध्ये आधीपासूनच काही एक्सरे लोड केलेले आहेत. तुम्ही जेव्हा तुमचा हात किंवा पाय मोबाइलच्या कॅमेऱ्यासमोर घेता तेव्हा ते तसं एक्सरे चित्र दाखवतं. एकूणच हा निव्वळ टाइमपास आहे. त्यामुळे या अ‍ॅपचे वापरकर्तेही खूप आहेत.

घोस्ट रडार
भूत ही संकल्पना प्रत्येकालाच धडकी भरवणारी असते. तरीही भुताखेतांबद्दलची उत्कंठा प्रत्येकालाच वाटत असते. त्यामुळे एखाद्या भकास, निर्जन प्रदेशात रात्री-अपरात्री एकटय़ाने फिरताना आसपास एखादा ‘आत्मा’ तर नाही ना, अशा शंका आपल्याला ग्रासून टाकतात. अशा वेळी ‘घोस्ट रडार’ हे अ‍ॅण्ड्रॉइड अ‍ॅप उपयोगी ठरते. तुम्ही जेथे असाल तो
परिसर ‘स्कॅन’ करून म्हणे हे अ‍ॅप्लिकेशन भूत दाखवते. आहे की नाही गंमत? तुम्ही हे अ‍ॅप ओपन केले की एकमेकांवर अनेक वर्तुळे तुम्हाला दिसतात. मग एखाद्या फोकससारखे ते या वर्तुळांमध्ये फिरते आणि भुतांची ठिकाणे दाखवते. आता मुळात भूत ही संकल्पनाच बावळटपणाची आहे. त्यात कोणत्याही सेन्सर(!) तंत्रज्ञानाशिवाय भूत शोधून देणारे हे अ‍ॅप म्हणजे भाकडकथाच म्हणावी लागेल.