वर्षअखेरीच्या सुट्टय़ांमध्ये फिरायला जायचे नियोजन सुरू झाले असेल. प्रवासाला जाताना नित्याच्या सर्वच गोष्टी सोबत घेतल्या की नाही याची खात्री आपण वारंवार करत असतो. पण प्रवासात आपल्याला उपयोगी पडणाऱ्या अ‍ॅप्सबाबतही जर आपण काळजी घेतली तर आपल्याला आयत्या वेळी येणाऱ्या अनेक अडचणींवर आपण मात करू शकतो. प्रवासाच्या विविध टप्प्यांमध्ये उपयोगी ठरणाऱ्या अ‍ॅप्सविषयी आपण जाणून घेऊ या.

ट्रिपिगेटर
7पर्यटनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने ‘इन्क्रेडिबल इंडिया’ ही मोहीम हाती घेतली होती. यामध्ये पर्यटन मंत्रालयातर्फे विविध पर्यटन केंद्रांच्या विकासापासून ते तेथे सहलींचे आयोजन करण्यापर्यंत विविध उपक्रम हाती घेतले. या सर्वाची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. काळाची गरज ओळखून केंद्र पर्यटन विभागाने नुकतेच एक मोबाइल अ‍ॅप लाँच केले आहे. या अ‍ॅपमध्ये देशातील विविध शहरांची माहिती देण्यात आली असून तेथे सहलीचे नियोजन करण्याबाबत मार्गदर्शन केले आहे. या अ‍ॅपमधील आपण आपल्याला आवडते ठिकाण आणि तेथे जाण्याचा कालावधी निवडल्यानंतर त्या कालावधीत तेथील हवामान, आपण निवडलेला कालावधी तेथे जाण्यास योग्य आहे की नाही आदी माहिती देण्यात येते. याशिवाय तेथे आपल्याला पाहण्यासारखे काय आहे, तेथे आपण किती दिवस राहू शकतो आदी माहितीही देण्यात आली आहे. पण तेथील सहल ठरविण्याची सोय या अ‍ॅपमध्ये उपलब्ध नाहीए. हे अ‍ॅप अँड्रॉइडवर मोफत उपलब्ध असून यासाठी फोनमध्ये ९.९ एमबी जागा लागते.

हॉलिडे आयक्यू
विविध पर्यटन ठिकाणांची माहिती पुरविणारे विश्वासार्ह संकेतस्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हॉलिडे आयक्यूने आपले अ‍ॅपही सुरू केले आहे. या अ‍ॅपमध्ये आपल्याला देशातील दोन हजारांहून अधिक पर्यटनस्थळांची माहिती 8उपलब्ध आहे. तसेच ५० हजारांहून जास्त हॉटेल्स, रिसॉर्ट्स, घरगुती राहण्याची सोय, जंगल कॅम्प्स आदींची माहिती यामध्ये उपलब्ध आहेत. ही सर्व ठिकाणे शोधण्यासाठी चांगल्या दर्जाचे सर्च पर्यायही देण्यात आले आहेत. हे सर्चेस हॉटेलचे दर, आधी राहून आलेल्यांनी दिलेला दर्जा आदीनुसार उपलब्ध आहेत. याशिवाय यामध्ये एक प्रवासी दुसऱ्या प्रवाशाला विविध ठिकाणेही सुचवू शकतो. हे अ‍ॅप आपल्याला स्थानिक ट्रॅव्हल एजंटशी किंवा थेट हॉटेल्सशी संपर्क साधण्याचा पर्यायही उपलब्ध करून देते.
हे अ‍ॅप अँड्रॉइड आणि आयओएसवर उपलब्ध आहे. यासाठी ११ एमबीची जागा लागते..

आयआरसीटीसी कनेक्ट
आपण राहत असलेल्या ठिकाणापासून आपण जाऊ इच्छिणाऱ्या ठिकाणापर्यंत रेल्वेने कसे जाता येईल इतकेच नव्हे तर आरक्षण किंवा आरक्षणाची उपलब्धता आदींची माहिती आपल्याला या अ‍ॅपवर उपलब्ध 6होणार आहे. हे भारतीय रेल्वेचे अधिकृत अ‍ॅप असून यामध्ये आपल्याला एका गाडीच्या आरक्षणाची उपलब्धता तसेच एकाच वेळी अनेक गाडय़ांची उपलब्धता पाहता येऊ शकते. आपण या अ‍ॅपमधून एकदा आरक्षण केले की आरक्षणात नमूद करण्यात आलेली नावे आणि त्यांचे वय अ‍ॅपमध्ये सेव्ह राहते. यामुळे भविष्यात आपण जेव्हा पुन्हा आरक्षण करतो त्या वेळेस आपल्याला पूर्वीची नावे प्रवासी यादी या पर्यायातून घेता येतात. याशिवाय या अ‍ॅपच्या माध्यमातून आपण आयआरसीटीसीचे नवीन लॉगइन तयार करू शकतो. आपण एकदा तिकीट खरेदी केल्यावर आपल्या प्रवासाच्या आधी आपल्याला अलर्ट्सही या अ‍ॅपच्या माध्यमातून मिळतात.  हे अ‍ॅप अँड्रॉइड आणि आयओएसवर उपलब्ध आहे. यासाठी ५.६ एमबीची जागा लागते.

एनटीईएस
तुम्ही प्रवास करत असलेली गाडी कुठल्या स्थानकापर्यंत पोहोचली आहे, किती मिनिटे उशिरा धावत आहे 8आदी माहितीसाठी सेंट्रल रेल्वे माहिती प्रणालीतर्फे एनटीईएस अ‍ॅप बाजारात आणले आहे. या अ‍ॅपमध्ये ट्रेन सध्या कुठे आहे, लाइव्ह स्टेशन, गाडय़ांचे वेळापत्रक, दोन स्थानकांदरम्यानच्या गाडय़ा, रद्द झालेल्या गाडय़ा, वेळा बदललेल्या गाडय़ा, मार्ग बदललेल्या गाडय़ा आदी पर्याय उपलब्ध आहेत. लाइव्ह स्टेशन या पर्यायामध्ये आपण निवडलेल्या स्थानकावर सध्या कोणत्या व किती गाडय़ा आहेत याची माहिती उपलब्ध आहे. हे अ‍ॅप अँड्रॉइड आणि आयओएसवर उपलब्ध आहे. यासाठी १.७ एमबीची जागा लागते.


एनजी पे

शॉपिंग आणि तिकीट बुकिंगसाठी बरेच अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. पण एनजी पे हे अ‍ॅप वेगळे असून या एकाच अ‍ॅपमधून आपल्याला प्रवासातील अनेक गोष्टींची पूर्तता करणे शक्य होणार आहे. या अ‍ॅपमधून आपण 9विमान, बस, रेल्वेची तिकीट खरेदी करू शकतो. इतकेच नव्हे तर यामधून आपण चित्रपटांची तिकिटेही खरेदी करू शकतो. तसेच ऑनलाइन शॉपिंगही या अ‍ॅपच्या माध्यमातून आपण करू शकतो. यामुळे एका अ‍ॅपमधून अनेक ठिकाणचे बुकिंग करणे यामुळे शक्य होणार आहे.
हे अ‍ॅप अँड्रॉइड आणि आयओएसवर उपलब्ध आहे. यासाठी ५०१ केबीची जागा लागते.

गुगल मॅप
हे अ‍ॅप केवळ भारतातच उपयुक्त आहे असे नाही, तर जगभरात तुम्ही कुठेही फिरायला गेलात तर हे अ‍ॅप तुमची साथ देऊ शकते. आपण कोणत्या रस्त्याने जात आहोत, आता आपण कोठे आहोत याची माहिती हे अ‍ॅप देतेच; याचबरोबर आपल्याला ज्या ठिकाणी जायचे आहे तेथे जाण्यासाठी किती वेळ लागेल, जाण्यासाठी कोणते रस्ते उपलब्ध आहेत आदी माहिती यामध्ये मिळते. तसेच यातील नव्या व्हर्जनमध्ये आपण ज्या ठिकाणी आहोत तेथील आसपासची माहितीही आपल्याला या अ‍ॅपमध्ये मिळते. यात खाण्याची ठिकाणे, दुकाने, हॉटेल्स आदींची माहितीही येथे मिळते. यामध्ये थ्रीडी नकाशे उपलब्ध आहेत. यामुळे रस्ता समजणे अधिक सोपे जाते. हे अ‍ॅप अँड्रॉइड आणि आयओएसवर उपलब्ध आहे. यासाठी प्रत्येक उपकरणानुसार वेगळी जागा लागते.