लक्झरी मोबाईल फोनची निर्मिती करणाऱ्या व्हर्चू कंपनीने अलीकडेच अॅस्टर नावाचा स्मार्टफोन बाजारात आणला आहे. हा फोन हाताने बनविण्यात आला असून, कलाकुसर करणाऱ्यांनी यावर आपल्या कारीगिरीची छाप सोडली आहे. या फोनच्या निर्मितीत अनेक बहुमूल्य गोष्टींचा वापर करण्यात आला आहे. आपल्या संस्थेशी अथवा व्यक्तिमत्वाशी निगडीत चिन्ह या फोनवर कोरून घेऊन फोनचे व्यक्तिगत महत्व वाढविता येते. ५.१ इंचाच्या या फोनमध्ये सॉलिड सॅफिअर क्रिस्टल स्क्रिन फूल एचडी डिस्प्ले आणि टायटॅनियम केससह देण्यात आले आहे. डॉल्बि डिजिटल प्लस व्हर्च्यूअल सराऊंण्ड साऊंण्ड आणि हसलब्लाड सर्टिफाईड इमेजिंग असलेल्या या फोनमध्ये क्लासिक कॉन्सर्ज, व्हर्चू लाईफ आणि व्हर्चू सर्टनिटी पॅकेज या व्हर्चूच्या सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. कनेक्टिव्हीटीसाठी यात क्वाड-बॅण्ड जीएसएम, ३जी आणि एलटीई ४जीची क्षमता देण्यात आली आहे. २४x७ सेवा पुरविणाऱ्या लाईफस्टाईल व्यवस्थापकाच्या चमूची सुविधा क्लासिक कॉन्सर्जद्वारे ‘अॅस्टर’ने पुरविली आहे. ही सुविधा कॉम्प्लिमेंन्टरी स्वरुपाची आहे. व्हर्चू कॉन्सर्ज सुविधा जगातून कुठूनही व्हाईस, ईमेल अथवा लाईव्ह चॅटच्या माध्यमातून वापरता येते. भारतात हा फोन रुपये ४,७५,००० इतक्या किंमतीला उपलब्ध असणार आहे. मुंबईतील ‘पोपले अॅण्ड स्विस पॅरडाईस’ आणि नवी दिल्लीतील ‘डीएलएफ एम्पोरो’ या प्रिमियम स्टोअर्समध्ये हा फोन उपलब्ध असेल.