१. मध्यंतरी गुगल ट्रेकरच्या मदतीने ताजमहलची सफर घरबसल्या होणार असे वाचनात आले. ते नेमके काय आहे. याची माहिती मिळावी. गुगल ट्रेकर कसे काम करते तेही समजावून सांगा.
– समृद्धी देसाई
उत्तर – गुगलने स्ट्रीट व्हय़ू ट्रेकर हे तंत्रज्ञान वापरून ताजमहल तसेच विविध ऐतिहासिक वास्तूंचे दर्शन होण्याची शक्यता आहे. या तंत्रज्ञानामुळे आपल्याला वास्तू आतून बाहेरून पाहता येते. त्यामुळे प्रत्यक्ष आपण त्या ठिकाणीच आहोत असा भास होतो. यापूर्वी पॅरिसचे आयफेल टॉवर, अमेरिकेतील ग्रॅण्ड कॅनयॉन व जपानमधील फुजी पर्वतासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. गुगल ईमॅप्स, द वर्ल्ड वंडर्स साइटवर हे ऑनलाइन प्रदर्शन पाहावयास मिळेल. हे तंत्रज्ञान वापरण्यासाठी एका व्यक्तीच्या पाठीवर बॅगपॅकमध्ये एक कॅमेरा ठेवलेला असतो. या कॅमेऱ्याचे वजन तब्बल अठरा किलो असते. या कॅमेऱ्यात पंधरा लेन्स लावण्यात आलेले असतात. कॅमेरा सुरू होताच ते सगळे विविध दिशांनी चित्रीकरणाला सुरुवात करतात. संगणकाच्या माध्यमातून हे चित्रीकरण असे काही जोडल्या जाते की पाहणाऱ्याला आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणी असल्याचा आभास निर्माण होतो. जणू काही आपण त्या गल्लीतून चालतोय किंवा पायऱ्या चढतोय! विशेष म्हणजे ताजच्या सर्व भागांमध्ये जाण्याची सामान्यांना परवानगी नाही मात्र, गुगल ट्रेकरला कोणतीही बंदी नाही.

२. मध्यंतरी तुमच्या पेपरमध्येच मोबाइलमधील अ‍ॅप्स माहितीचोर असल्याचे वृत्त वाचले. त्यावर काही उपाय आहेत का?
– विश्वजीत खिलारे
उत्तर – मोबाइलमधील माहिती चोर अ‍ॅप्समुळे मोबाइल सुरक्षेला धोका निर्माण झाल्याची बाब लक्षात घेऊन मोबाइल उपकरण तयार करणाऱ्या कंपन्यांनी यावर उपाय काढला आहे. सॅमसंग या कंपनीने आता आपल्या नवीन उपकरणांमध्ये ‘नॉक’ नावाचे सुरक्षा कवच असणार आहे. यामुळे सॅमसंग मोबाइल आता अधिक सुरक्षित होणार आहे. मोबाइलमध्ये डाऊनलोड करण्यात आलेल्या अ‍ॅप्समध्ये सुरक्षेच्या बाबतीत खूप अडचणी येतात. यामुळे कंपनीने मोबाइलला अधिक सुरक्षा देण्याच्या दृष्टीने हे ‘नॉक’ची निर्मिती केली आहे. ‘नॉक’मुळे तुमच्या मोबाइलमधील वैयक्तिक माहिती सुरक्षित राहतेच. याचबरोबर तुम्ही अ‍ॅप्स डाऊनलोड करीत असताना तुम्हाला ‘नॉक’द्वारे सुरक्षेविषयी सांगितले जाते. ‘नॉक’साठी सॅमसंगने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ टीम तयार करण्यात आली असून ही टीम अ‍ॅप्सला मान्यता देणार आहे. त्यानुसार तुम्ही अ‍ॅप्स डाऊनलोड करीत असताना तुम्हाला सूचना देण्यात येणार आहे. याशिवाय तुम्ही पसे भरून जर तुमच्या मोबाइलमध्ये अ‍ॅण्टी व्हायरस वापरला तरीही तुमचा मोबाइल अधिक सुरक्षित राहू शकतो.

या सदरात प्रश्न विचारण्यासाठी आम्हाला lstechit@gmail.com या मेल आयडीवर ई-मेल पाठवा.