व्हॉट्सअ‍ॅप व्हॉइस कॉलिंगची गेल्या अनेक महिन्यांपासून वाट पाहत असलेल्या वापरकर्त्यांना दोन दिवसांपूर्वी व्हॉट्सअ‍ॅपच्या व्हॉइस कॉलिंगची सुविधा उपलब्ध झाली. पण व्हॉट्सअ‍ॅपने सुरू केलेल्या ४८ तासांच्या अवधीत ज्यांनी ही सुविधा सुरू केली त्यांनाच हा आनंद सध्या उपभोगता येत आहे.
व्हॉट्सअ‍ॅपचे व्हॉइस कॉलिंग येणार येणार अशी चर्चा गेला महिनाभर चांगलीच रंगते आहे. त्याचे अनेक स्पॅम्स आणि मालवेअर्सही आले. पण शुक्रवारी आणि शनिवारी अँड्रॉइड वापरकर्त्यांना सुखद धक्का बसला. व्हॉट्सअ‍ॅपचे २.१२.५१६ हे व्हर्जन अपडेट केल्यावर व्हॉइस कॉल सुरू होईल, असा संदेश फिरू लागला. या संदेशानुसार अनेकांनी हे व्हर्जन अद्ययावत केले. व्हर्जन अद्ययावत केल्यानंतर ज्यांच्याकडे यापूर्वी व्हॉट्सअ‍ॅप कॉलिंगची सुविधा आहे त्यांनी वापरकर्त्यांला व्हॉट्सअ‍ॅप कॉल केल्यानंतर ही सुविधा सुरू होते अशी माहिती संकेतस्थळांवरून फिरत होती. व्हर्जन अद्ययावत झाले, मात्र पहिला कॉल कोण करणार, हा प्रश्न सर्वाना पडला होता. यामुळे गोंधळलेल्या अवस्थेत वापरकर्ते कुणाकडे व्हॉट्सअ‍ॅप कॉलची सुविधा आहे याचा शोध घेत राहील. हा शोध घेत असतानाच त्यांना कुणीतरी सापडले आणि त्यातील अनेकांकडे कॉलिंगची सुविधा सुरू झाली. मात्र ज्यांना शनिवापर्यंत कॉल करणारी व्यक्ती सापडली नाही त्यांना मात्र सध्या केवळ इनकमिंग कॉल्सवरच समाधान मानावे लागत आहे.
व्हॉट्सअ‍ॅपने अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी व्हॉइस कॉलिंगची सुविधा सुरू केल्याचे वृत्त ऑनलाइन जगतात तेजीत पसरले. तेथे दिलेल्या सूचनांप्रमाणे अनेकांनी अद्ययावत आवृत्तीही घेतली. पण अजून ही सुविधा त्यांना मिळू शकलेली नाही. अद्ययावत आवृत्तीबाबत माहिती देत असताना कंपनीने कोणत्याही प्रकारे या आवृत्तीत तुम्हाला व्हॉइस कॉलिंगची सुविधा उपलब्ध होईल, असा उल्लेख केला नव्हता. यामुळे अनेक वापरकर्ते गोंधळलेही. कंपनीने अद्याप अधिकृतपणे व्हॉइस कॉलिंग सुरू झाले अशी घोषणा केलेली नाही. पण कंपनीतर्फे त्याच्या चाचण्या होत असल्याची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. याच चाचण्यांचा एक भाग म्हणून भारतातही काही काळ ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. तसेच कंपनीने अ‍ॅपच्या २.१२.२ आवृत्तीपासून इनकमिंग कॉल्सची सुविधा सुरू केली आहे. यामुळे ज्या वापरकर्त्यांनी आवृत्ती अद्ययावत केली आहे त्यांना सध्या केवळ इनकमिंग कॉल्स येत आहेत. आवृत्तीचे क्रमांक हे वेगवेगळय़ा ऑपरेटिंग प्रणालीनुसार वेगवेगळे आहेत. सध्या इनकमिंग कॉल्सची सुविधा अँड्रॉइड या ऑपरेटिंग प्रणालीवरच उपलब्ध आहे.

कसा सुरू होईल व्हॉट्सअ‍ॅप कॉल?
कंपनीने कॉलिंग सेवेची अधिकृत घोषणा केल्यानंतर ही सुविधा सर्वत्र उपलब्ध होईल. यासाठी काय करावे लागेल?
* सर्वप्रथम तुमची व्हॉट्सअ‍ॅपची आवृत्ती अद्ययावत करून घेणे.
* यानंतर ज्यांच्याकडे व्हॉइस कॉलिंगची सुविधा आहे त्यांना तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅप कॉल करण्यास सांगावे.
* त्यांनी कॉल केल्यानंतर तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपच्या होम स्क्रीनचा लुक बदलतो. त्यामध्ये कॉल्स, चॅट्स आणि कॉन्टॅक्ट्स हे तीन भाग दिसतात. कॉल्समध्ये तुम्हाला तुम्ही केलेले कॉल्स, आलेले कॉल्स याचबरोबर मिसकॉल्सचीही माहिती मिळते.
* डेटा कॉल असल्यामुळे आवाज पोहोचण्यास उशीर होतो.
* हा कॉल करण्यासाठी तुमच्याकडे किमान थ्रीजी जोडणी असावी.
* कॉलसाठी इंटरनेटचे पैसे खर्च होतील.
* एका मिनिटाच्या कॉलसाठी अंदाजे 240 केबी डेटा खर्च होऊ शकतो.
* तुमचा डेटा प्लान आणि कॉलिंग प्लान याची तुलना करून तुम्ही हा पर्याय वापरायचा की नाही हे ठरवू शकता.