हां हां म्हणता म्हणता, मोबाइलवरील सोशल मेसेजिंगचे सर्वाधिक पसंतीचे अ‍ॅप ठरलेल्या ‘व्हॉट्सअ‍ॅप’ने जगभरात अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली आहे. त्यातच फेसबुकने हे अ‍ॅप खरेदी केल्यापासून त्यात काही ठळक आणि उपयुक्त बदल होऊ लागले आहेत. अशातच आता ‘व्हॉट्सअ‍ॅप’ चक्क डेस्कटॉप संगणकांवरही येऊ घातले आहे. या पाश्र्वभूमीवर ‘व्हॉट्सअ‍ॅप’चे डेस्कटॉपवरील येणे आणि त्याआधीपासून ‘पीसी’ आणि ‘मोबाइल’ अशा दोन्हीकडे संचार असलेले अ‍ॅप्लिकेशन्स यांचा घेतलेला आढावा..

जगभरातील संवादाचे सर्वात सहज आणि सर्वाधिक वापर असलेले मोबाइल अ‍ॅप म्हणून व्हॉट्सअ‍ॅपने आपले स्थान मजबूत केले आहे. कोणतेही अतिरिक्त शुल्क न घेता (भारतात आता विनामूल्य) केवळ इंटरनेट डाटाच्या वापरातून एकाचवेळी अनेक लोकांशी संवाद साधण्याची संधी देणाऱ्या ‘व्हॉट्सअ‍ॅप’ने मोबाइलमधील ‘एसएमएस’
सुविधा केवळ औपचारिकतेसाठी शिल्लक ठेवली आहे. रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्याउठल्या प्रत्येकाची नजर मोबाइलवरील ‘व्हॉट्सअ‍ॅप’ मेसेजेसवर जात नसेल तर नवलच. अशी किर्ती प्रस्थापित करणारे ‘व्हॉट्सअ‍ॅप’ आता लवकरच तुमच्या डेस्कटॉप संगणकांवरही येत आहे.
‘व्हॉट्सअ‍ॅप’चे स्पर्धक सोशल मेसेजिंग अ‍ॅप असलेल्या ‘टेलिग्राम’चे सहसंस्थापक पेवेल डुरोव्ह यांनी अलिकडेच एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत ‘व्हॉट्सअ‍ॅप’ संगणकांवर येण्याच्या खटपटीत असल्याचा दावा केला. ‘व्हॉट्सअ‍ॅप’च्या अँड्रॉइड फोनवरील नव्या अपडेटमध्ये ‘व्हॉट्सअ‍ॅप वेब’ नावाचा कोड असल्याचेही उघड झाले आहे. शिवाय या अपडेटमध्ये संगणकावरील ‘लॉगइन लॉगआऊट’ तसेच ‘ऑनलाइन स्टेटस’ यासंबंधीचे कोडही दिसून आले आहेत. या सर्व गोष्टींनी ‘व्हॉट्सअ‍ॅप’ची डेस्कटॉप आवृत्ती लवकरच येण्याची शक्यता गडद केली आहे. अर्थात ‘व्हॉट्सअ‍ॅप’ किंवा त्याची मालक असलेल्या ‘फेसबुक’कडून अद्याप यासंदर्भात कोणताही खुलासा वा घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, स्मार्टफोनवर स्वत:चे अधिराज्य निर्माण केल्यानंतर ‘व्हॉट्सअ‍ॅप’चा मोर्चा टेबलावरील संगणकांकडे वळेल, यात शंका नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. आजघडीला तब्बल ६० कोटींहून अधिक वापरकर्ते असलेल्या ‘व्हॉट्सअ‍ॅप’च्या वापरकर्त्यांची संख्या त्यामुळे अधिक वाढणार आहे. विशेष म्हणजे, ‘व्हॉट्सअ‍ॅप’ संगणकावर आल्यानंतर वापरकर्त्यांना मोठय़ा स्क्रीनवरून मोबाइलवर सोशल मेसेजिंग करणे शक्य होणार आहे.

‘व्हॉट्सअ‍ॅप’ पहिले नाही
मोबाइलवरून डेस्कटॉप संगणकावर अवतरणारे व्हॉट्सअ‍ॅप हे पहिले सोशल मेसेजिंग अ‍ॅप नाही. उलट ‘व्हॉट्सअ‍ॅप’ला टक्कर देत असलेले टेलिग्राम, वायबर, वुई चॅट या अ‍ॅप्सनी आधीपासूनच संगणकीय रूपात वावरायला सुरुवात केली आहे. या तीन प्रमुख अ‍ॅप्सखेरीज आणखीही अनेक अ‍ॅप्स आहेत, जे संगणक आणि स्मार्टफोनवर काम करतात. अशाच काही अ‍ॅप्सविषयी:

वायबर
विंडोज, आयओएस, ओएसएक्स, अँड्रॉइड, ब्लॅकबेरी, नोकिया अशा प्रत्येक प्लॅटफॉर्मवर चालू शकणारे ‘वायबर’ आतापर्यंत २० कोटींहून अधिक वापरकर्त्यांच्या मोबाइलवर स्थानापन्न झाले आहे. ‘व्हॉट्सअ‍ॅप’प्रमाणे वायबरदेखील मोबाइल क्रमांकाच्या आधारेच वापरता येते. यातून व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल्सची सुविधाही पुरवण्यात आली आहे. मात्र, संगणकावर इन्स्टॉल करण्यापूर्वी ‘वायबर’ मोबाइलवर ‘इन्स्टॉल’ करणे आवश्यक आहे.

टेलिग्राम
व्हॉट्सअ‍ॅपला चांगली टक्कर देणारे ‘टेलिग्राम’ बऱ्याच आधीपासून संगणकावर उपलब्ध आहे. ‘एमटीप्रोटो’ या डाटा प्रोटोकॉलवर आधारीत असलेल्या ‘टेलिग्राम’चे सर्वात मोठे वैशिष्टय़ त्यातील संदेशांची गोपनीयता आहे. एखाद्या व्यक्तिला पाठवलेला मेसेज ती व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला फॉरवर्ड करू शकत नाही आणि तो मेसेजही काही ठरावीक काळाने लूप्त होतो, हे टेलिग्रामचे वैशिष्टय़ अतिशय व्यक्तिगत संवादासाठी प्रचंड उपयुक्त आहे. याशिवाय आपले सामान्य संदेश ‘टेलिग्राम’ ‘क्लाउड’वर स्टोअर करून ठेवत असल्याने आपल्या मोबाइलची स्पेस तुलनेने कमी वापरली जाते. ‘क्लाउड’वरील डाटाही आपल्या गरजेनुसार काढून टाकता येतो.  

स्काइप
स्काइप हे सर्वात जुने सोशल मेसेजिंग अ‍ॅप असून आजही त्याची लोकप्रियता कमी झालेली नाही. विशेषत: यातील व्हिडिओ कॉलिंगची सुविधा वापरकर्त्यांना अधिक आकर्षित करत असते. मात्र, स्काइपच्या एकूण इंटरफेसमध्ये अनेक त्रुटी आजही जाणवतात. त्यातील कॉन्टॅक्ट सर्च करताना होणारा विलंब तर वैतागवाणा आहे.

लाइन
आशियामध्ये आणि विशेषत: भारतात अधिक लोकप्रिय असलेल्या ‘लाइन’चे २० कोटीच्या आसपास वापरकर्ते आहेत. यावरून व्हिडिओ, व्हॉइस, फोटो, स्टिकर्सची देवाणघेवाण करता येते. ‘लाइन’चा लूक तरुणवर्गाला अधिक आकर्षित करणारा आहे.