मायक्रोसॉफ्ट कार्पोरेशनची ‘विंडोज १०’ ही नवीन ऑपरेटिंग सिस्टीम लवकरच बाजारात येणार असून, येत्या २९ जुलैपासून विंडोज किंवा मायक्रोसॉफ्टची ७ किंवा ८.१ आवृत्ती वापरत असलेल्या ग्राहकांना नवीन आवृत्ती मोफत डाऊनलोड करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
टचस्क्रीनसाठी अनुकूल असलेली नवीन आवृत्ती संगणक, मोबाईल तसेच टॅबलेट्समध्येही वापरता येणार आहे. विंडोज ८ मध्ये वगळण्यात आलेला स्टार्ट मेन्यू नवीन आवृत्तीमध्ये पुन्हा एकदा पाहता येणार आहे. विंडोजची ७ किंवा ८.१ ही आवृत्ती असणा-यांना नवीन आवृत्ती मोफत डाऊनलोड करता येणार असली तरी त्याची बनावट आवृत्ती वापरणा-यांना या सुविधेपासून दूर राहावे लागणार आहे.
येत्या २९ जुलै पासूनच विंडोज १० वर चालणारे टॅबलेट्स आणि संगणक यांची बाजारात विक्री केली जाणार आहे. असे असले तरी स्मार्टफोन्स धारकांना या आवृत्तीसाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे.
विंडोज १० मध्ये नवीन काय ?
स्टार्ट मेन्यूमध्ये लाईव्ह टाईल अॅनिमेशन प्रणालीचा समावेश करण्यात आला आहे. तसेच विंडोज १० हाय टीपीआय सहाय्य करु शकेल.
ग्राहकांच्या मागणीमुळे विंडोज ७ मधील ऐरो ग्लास प्रणाली विंडोज १० मध्ये पुन्हा आणण्याचा प्रयत्न मायक्रोसॉफ्टतर्फे केला जाणार आहे.
विंडोजचा फोन किंवा टॅब विंडोज डेक्सटॉपला कनेक्ट केल्यावर त्यामध्ये राहिलेल्या कामापासून पुन्हा सुरुवात करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
म्युझिक आणि व्हिडिओसाठी उपयुक्त अशी अॅप्लिकेशन विंडोज १० च्या माध्यमातून वापरता येणार आहेत.