स्मार्टफोनच्या बाजारात अँड्रॉइडची चलती आणि अ‍ॅपलच्या फोनचं आकर्षण कायम आहे. या दोघांच्या भाऊगर्दीत विंडोज फोनच्या ग्राहकांची संख्या वाढवण्यासाठी नोकिया आटोकाट प्रयत्न करत आहेत. नोकियाच्या लुमिया स्मार्टफोननी मध्यम ते उच्च किंमत श्रेणीमधील आपला वेगळा ग्राहकवर्ग तयार केला आहे. त्याच वेळी कमी किमतीतील आणि ‘बेसिक’ फोन गटातील ‘आशा’ स्मार्टफोननी भारतासारख्या बाजारपेठेत चांगला जम बसवला आहे. यात आता भर पडलीय ती नोकिया आशा ५०१ आणि ५०३ या स्मार्टफोन्सची. ‘सिम्बियन’ आणि ‘मीगो’ ऑपरेटिंग सिस्टीमला छाट देऊन ‘आशा १.२’ या स्वतंत्र प्लॅटफॉर्मवर हे स्मार्टफोन्स विकसित करण्यात आले आहेत. टचस्क्रीन, आकर्षक रंगसंगती, कॅमेरा आणि वायफाय अशा वैशिष्टय़ांमुळे ‘आशा ५०१’ने बाजारात नाव कमावले तर, या साऱ्या वैशिष्टय़ांमध्ये ‘थ्रीजी’ सुविधेची भर घालत ‘आशा ५०३’ने एक पाऊल पुढे टाकले आहे.
‘आशा ५०३’ हा नोकियाच्या ‘आशा’ फोन्सच्या श्रेणीतील सर्वाधिक वैशिष्टय़े असलेला स्मार्टफोन आहे. ५ मेगापिक्सेल कॅमेरा, एलईडी फ्लॅश, ३ इंचाचा डिस्प्ले, गोíरला ग्लास, डय़ुअल सिम ही त्याची वैशिष्टय़े ग्राहकाला प्रथमदर्शनी निश्चितच आकर्षति करतात. पण प्रत्यक्ष हाताळताना हा स्मार्टफोन ग्राहकांच्या अपेक्षांना कितपत खरा ठरतो, याचा आम्ही आढावा घेतला. मात्र, त्यापूर्वी या फोनच्या वैशिष्टय़ांवर एक नजर टाकूयात.
पैशांचे मोल: ‘आशा ५०३’ची किंमत आणि त्या तुलनेत त्यासोबत मिळणाऱ्या सुविधा या स्मार्टफोनची सर्वात मोठी जमेची बाजू आहे. बाजारामध्ये या फोनची किंमत साडेसहा ते सात हजारच्या आसपास आहे. या किमतीत अनेक कंपन्यांचे अँड्रॉइडवर आधारित स्मार्टफोन उपलब्ध आहेत. मात्र, त्यामध्ये पाच मेगापिक्सेल कॅमेरा, थ्रीजी, वायफाय, एलईडी फ्लॅश अशी सर्व वैशिष्टय़े मिळणार नाहीत. या सर्व सुविधा ‘आशा ५०३’मध्ये आहेत. यातील काही महत्त्वाच्या वैशिष्टय़ांच्या चांगल्या-वाईट बाजूंचा पुढे आढावा घेतला आहे.

डिझाइन:  या फोनचा ‘लूक’ आणि ‘डिझाइन’ हे पहिल्याप्रथम त्याच्याबद्दल आकर्षण निर्माण करते. साधारण ४ इंच आकाराचा आणि अध्र्या इंच जाडीचा हा फोन लाल, पिळ्या, निळ्या, हिरव्या अशा आकर्षक रंगात उपलब्ध आहे. तसेच या फोनला ‘आयसिंग’ कव्हरप्रमाणे ‘लूक’ देण्यात आला आहे. म्हणजे तो पाहताना बर्फाच्या एका क्यूबमध्ये फोन बसवल्यासारखा अनुभव येतो. यामुळे ‘आशा ५०३’ अधिकच आकर्षक बनला आहे. फोन आकाराने जाड असला तरी याची लांबी अथवा उंची कमी असल्याने तो हातात सहज मावतो. एका हाताने वापर करण्यासाठीही हा फोन अतिशय ‘कम्फर्टेबल’ आहे. या फोनच्या डावीकडील बाजूस पॉवर, व्हॉल्यूमची बटणे आहेत. शिवाय मुख्य स्क्रीनवर ‘बॅक’चे बटण आहे. हे बटण या फोनची सर्वात उणी बाजू आहे, असे म्हणावे लागेल. कारण या ‘बॅक’ बटणाने केवळ मागील स्क्रीन ओपन करता येते. परंतु, थेट मेन्यूत जाणे अथवा मेसेज किंवा कॉिलग पॅड ओपन करणे हे शक्य होत नाही. त्यामुळे प्रत्येक वेळी एका प्रोग्रॅममधून बाहेर पडूनच दुसरा प्रोग्रॅम सुरू करता येतो.
डिस्प्ले : फोनचा डिस्प्ले अतिशय छोटा आहे. आजकाल पाच इंची डिस्प्लेची चलती असताना तीन इंचाचा डिस्प्ले ही कल्पना काहीशी मागास वाटू शकते. त्यातच या डिस्प्लेच्या भोवतालच्या फ्रेममुळे तो अधिकच छोटा असल्याचा भास होतो. टचस्क्रीनला गोíरला ग्लास प्रोटेक्शन असल्याने त्यात मजबुती आली आहे. मात्र, या फोनचा दृश्यानुभव हा सगळा सरंजाम फिका पाडतो. या फोनचा दृश्यानुभव विंडोज फोनच्या आकर्षक रंगसंगतीची आठवण करून देतो. मात्र, काही रंग अधिक गडद असल्याचे जाणवते. एलसीडीच्या मानाने फोनचा ब्राइटनेसही जास्त आहे. अर्थात किमतीच्या तुलनेत अधिक चांगल्या डिस्प्लेची अपेक्षा करणे योग्य ठरत नाही. शिवाय, टचस्क्रीन वेगाने काम करते.

कॅमेरा : पाच मेगापिक्सेलचा कॅमेरा देणारा सात हजार रुपयांच्या श्रेणीतील फोन म्हणून ‘आशा ५०३’चे कौतुक करता येईल. कॅमेरा सुरू करणे आणि हाताळणे अतिशय सोपे आहे. शिवाय कॅमेरा चालू असताना सेटिंग बदलणेही सहज जमते. एलईडी फ्लॅश परिणामकारक आहे. मात्र, केवळ एका जागी स्थिर असलेल्या वस्तूंचे, माणसांचे फोटो काढण्यासाठीच तो अधिक उपयुक्त आहे. कारण हालचाल करत असलेल्या गोष्टींचे फोटो एकतर पुसट येतात अथवा त्यांचा फोकसच चुकतो. त्यामुळे प्रवासादरम्यान किंवा एखाद्या धावणाऱ्या प्राण्याचा फोटो या कॅमेऱ्यातून व्यवस्थित येत नाही. स्थिर फोटोंचा दर्जा मात्र उत्तम आहे.

अंतर्गत रचना : या फोनचा ‘इंटरफेस’ आशा १.२ या प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. परंतु, नोकियाच्या आधीच्या फोन्समधील मेनूप्रमाणेच या फोनचा मेनू दिसतो. मेनूतील आयकॉन्स निवडण्यासाठी ‘स्क्रोलिंग’ करावे लागते.  मात्र, या फोनच्या मुख्य स्क्रीनवरून ‘बॅक’ बटण दाबताच ‘फास्टलेन’मध्ये तुमचा प्रवेश होतो. येथे तुम्ही अलीकडेच वापरलेल्या सर्व अ‍ॅप्सचा शॉर्टकट मिळतो. शिवाय व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर आणि फेसबुकच्या अपडेट्सही येथे पाहावयास मिळतात. या फोनवर व्हॉट्सअ‍ॅप आणि अन्य सोशल नेटवìकग साइट्स ‘प्रीलोडेड’ आहेत. त्यामुळे ते नव्याने डाउनलोड करावे लागत नाही. या फोनला ‘ई मेल’ सपोर्ट आहे. पण तो केवळ ‘टेक्स्ट’पुरताच असल्याने मोठे ईमेल्स ओपन करता येत नाही.  
‘आशा ५०३’च्या माध्यमातून नोकियाने एक ‘स्मार्ट’ खेळी खेळली आहे. भारतासारख्या बाजारपेठेत स्मार्टफोनच्या नवोदित वापरकर्त्यांची संख्या लक्षणीय आहे. या वर्गासाठी सॅमसंगपासून एलजी, कार्बन, मायक्रोमॅक्स, क्झोलो यांचे अँड्रॉइड फोन येत आहेतच. पण या फोनच्या कमी किंमत श्रेणीतील मर्यादा आता स्पष्ट होत आहेत. अशा परिस्थितीत ‘आशा ५०३’च्या रूपात एक चांगला पर्याय नोकियाने ग्राहकांसमोर आणला आहे. या फोनच्या माध्यमातून स्मार्टफोनच्या नवीन वापरकर्त्यांना आकर्षति करण्याचा नोकियाचा प्रयत्न आहेच. पण या फोनची एकूण रचना पाहता या वापरकर्त्यांना पुढे िवडोज सिस्टीमवर आधारित ‘लुमिया’ फोनकडे नेण्याचं कसबही नोकियानं साधलं आहे. डिस्प्ले, कॅमेरा, थ्रीजी, आकार, अंतर्गत रचना, रंगसंगती या बाबतीत ‘५०३’ वैशिष्टय़पूर्ण ठरतो. पण याच वैशिष्टय़ांमध्ये तो काहीसा कमीही पडतो. पण तो ज्या किमतीत उपलब्ध आहे, त्या श्रेणीतील अन्य स्मार्टफोन्सच्या तुलनेत ‘आशा ५०३’ उजवा आहे, हे निश्चितच.