दिवाळी म्हटले की खरेदी आणि आपल्या प्रियजनांना भेटवस्तू देण्याचा सण. कपडय़ांच्या खरेदीबरोबरच गेल्या काही वर्षांपासून ‘तंत्र’ खरेदीलाही ग्राहकांची चांगलीच पसंती दिसते. अगदी स्वत:साठी किंवा भेट म्हणून देण्यासाठी यंदा बाजारात कोणती चांगली उपकरणे बाजारात आली आहे याची माहिती आपण करून घेऊयात.

अ‍ॅपधारित टीव्ही

टीव्हीच्या बाजारात थ्रीडीपासून फोरकेपर्यंतेचे विविध टीव्ही उपलब्ध आहेत. याचबरोबर अ‍ॅपवर आधारित टीव्हीचीही चांगलीच चलती आहे. बराच काळ केवळ ऑनलाइन उपलब्ध असलेले हे टीव्ही आता किरकोळ बाजारातही दिसू लागले आहे. नुकताच व्हिडीओकॉनने विंडोजच्या सोबत असाच एक अ‍ॅपवर आधारित टीव्ही बाजारात आणला आहे. या टीव्हीमध्ये विंडोज १० उपलब्ध करून देण्यात आले असून या टीव्हीचा वापर आपण संगणक म्हणूनही करू शकतो. यामध्ये संगणक आणि टीव्हीसाठी दोन पर्याय देण्यात आले आहेत. यामध्ये टीव्हीचा पर्याय निवडल्यावर आपण सामन्य टीव्ही वाहिन्या पाहू शकतो. हा टीव्ही एलईडी असून तो पूर्णत: एचडी आहे. याशिवाय टीव्हीला एचडीएमआय पोर्ट देण्यात आला आहे. तसेच दोन जीबी डीडीआर ३रॅम आणि १६ जीबीची अंतर्गत साठवणूक क्षमता देण्यात आली आहे. तसेही एसडी कार्डच्या मदतीने ही साठवणूक क्षमता आपण १२८ जीबीपर्यंत वाढवू शकतो. यासाठी टीव्हीमध्ये मायक्रो एसडी स्लॉटही देण्यात आला आहे. हा टीव्ही ८१ सेंमी आणि ९८ सेंमी अशा दोन आकारांमध्ये उपलब्ध आहे. टीव्हीतील संगणकाचा पर्याय निवडल्यावर टीव्ही संगणकासारखा काम करू लागतो. यामध्ये मायक्रोसॉफ्ट वर्डपासून इंटरनेटपर्यंत संगणकात वापरता येणारे बहुतांश सॉफ्टवेअर वापरता येऊ शकतात. हा टीव्ही नोव्हेंबर महिन्यात देशभरात उपलब्ध होणार असून त्याची किंमत ३९,९९० रुपये इतकी आहे. याशिवाय तुम्हाला नवीन तंत्रज्ञान असलेला टीव्ही घ्यायचा असेल तर तुम्ही पॅनासॉनिकने नुकतचा बाजारात आणलेला फोरके टीव्हीचा पर्याय निवडू शकता, याचबरोबर सॅमसंग, एलजी, सोनी यांसारख्या ब्रँड्सनी बाजारात आणालेल्या कव्‍‌र्ह टीव्हीचा पर्यायही तुमच्यासमोर आहे.

स्मार्टफोन

तुम्हाला मोबाइलचा पर्याय निवडायचा असेल तर तुम्ही अगदी दहा हजारांपेक्षा कमी किंमतीपासून ६० हजारांपर्यंतचे विविध पर्याय निवडू शकता. यामध्ये लिनोवा के३ पासून ते आयफोन ६ आणि आयफोन ६ प्लसपर्यंतचे विविध पर्याय उपलबध आहेत. शिओमी किंवा वनप्लससारख्या फोन्सना ऑनलाइनला बाजारात मोठी मागणी आहे. पण जर तुम्हाला जास्त किमतीचे फोन घ्यावयाचे असतील तर आयफोन ६ किंवा ६प्लस हे फोन भारतीय बाजारात दाखल झाले आहेत. याचबरोबर जर तुम्हाला अँड्राइडचा महागडा पर्याय हवा असेल तर सॅमसंग नोट ५चा पर्यायही समोर आहे. या सर्वाच्या पलीकडे जाऊन मध्यम किमतीच्या फोन्समध्ये व्हिवो कंपनीच्या एक्स आणि व्ही मालिकेतील विविध फोन्सचा पर्यायही समोर आहे. विंडोजमध्येही मायक्रोसॉफ्टचे फोन उपलब्ध आहेत. हे फोनही अगदी आठ हजारांपासून ते ३० हजारांपर्यंत उपलब्ध आहेत.

आवाजाचा बार

दिवाळी पहाट छान शास्त्रीय संगीत किंवा भक्तिगीते ऐकून घालवावी असे अनेकांना वाटते. प्रत्येकाला दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाला जायला जमतेच असे नाही. अशा वेळी घरीही आपण हे करू शकतो. यासाठी फार काही करण्याची आवश्यकता नाही. सध्या बाजारात कमीतकमी आकाराचे, पण चांगला आवाज देणारे स्पीकर्स उपलब्ध आहेत. या स्पीकर्समुळे आपण घरबसल्या चांगल्या आवाजात गाणी ऐकू शकतो. यासाठी घरात सीडी प्लेअर अथवा एमपीथ्री प्लेअर असण्याची गरज नाही. यासाठी तुमचा मोबाइलही पुरेसा आहे. मोबाइलमधली गाणी तुम्ही या स्पीकर्सवर वाजवू शकता. यासाठी मोबाइल आणि स्पीकर तुम्हाला ब्लूटूथनेही जोडता येऊ शकतात. यासाठी महागडय़ा स्पीकर्ससोबतच मध्यम किमतीचे स्पीकर्सही बाजारात आले आहेत. झेब्रॉनिक्स या कंपनीने नुकतेच त्यांचे ५.१ मल्टीमीडिया स्पीकर बाजारात आणले आहेत. यामध्ये तीन इंचांचा पूर्ण तर वूफरसाठी आठ इंचाचा ड्रायव्हर आहे. याची किंमत ५९९९ रुपये आहे. याशिवाय बाजारात बॉससारख्या कंपन्यांचे स्पीकर्सही उपलब्ध आहेत.

हेडफोन

जर तुम्हाला मोठे स्पीकर नको असतील आणि संगीताचा अनुभव एकटय़ालाच घ्यावयाचा असेल तर तुम्ही हेडफोनही खरेदी करू शकता. यासाठी तुम्ही आयबॉलपासून विविध कंपन्यांचे चांगले हेडफोन्स बाजारात उपलब्ध आहेत. जर तुम्हाला महागडे आणि कानाला त्रास न देता दमदार आवाज देणारे हेडफोन हवे असतील तर तुम्ही नुकत्याच बाजारात आलेल्या सोनीच्या हेडफोन मालिकेचा विचार करू शकता. सोनीने नुकतीच बाजारात हेडफोनची मालिका आणली आहे. या मालिकेतील हेडफोन हे ६९९० पासून ते १२९९० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. हे हेडफोन्स वायर्ड आणि ब्लूटूथ अशा दोन्ही जोडण्यांमध्ये उपलब्ध आहेत.

पॉवर बँक

सध्या आपल्याकडे अनेक उपकरणं असतात. त्याचा वापरही जास्त होत असल्यामुळे ते सातत्याने चार्जिग करावे लागतात. अशा वेळी आपल्याला पॉवर बँक उपयुक्त ठरतात. यामध्ये अगदी १२०० एमएएचपासून ते २० हजार ८०० एमएएच क्षमतेच्या पॉवर बँक्सचा समावेश आहे. यामध्ये मोबाइल उत्पादन करणाऱ्या कंपन्यांपासून ते मोबाइलपूरक उत्पादने तयार करणाऱ्या कंपन्यांच्या पॉवर बँक्सचा समावेश आहे. यात एसटीके, आयबॉलसारख्या कंपन्यांच्या पॉवर बँकही बाजारात उपलब्ध आहे. याशिवाय अम्ब्रेनकडून नुकतेच १६७५० आणि १००५० एमएएच क्षमतेच्या दोन पॉवर बँक्स बाजारात आणल्या आहेत. यांची किंमत अनुक्रमे १७९९ आणि १२९९ रुपये इतकी आहे. तर मी या ब्रँडने २०८०० एमएएएचची पॉवर बँक आणली असून त्याची किंमत ९९९९ असतली तरी ती ऑनलाइन बाजारात सध्या ९९९ रुपयांपासून उपलब्ध आहे.

नीरज पंडित
niraj.pandit@expressindia.com