जगातील सुमारे १३० कोटी व्यक्ती अपुऱ्या,अयोग्य निद्रेच्या व्याधीने पछाडलेले आहेत. विशिष्ट मुरलेला कायमस्वरूपी आजार, उच्च रक्तदाब, अन्नग्रहणाच्या चुकीच्या सवई किंवा अन्नाचा अयोग्य पुरवठा, मानसिक दुर्बलता आणि न्यूनगंड, अदृश्य भीती इत्यादी अनेक कारणांमुळे मेंदूतील निद्राकेंद्र योग्य प्रकारे कार्य करीत नाही. यामुळे अर्थातच अयोग्य प्रमाणात झोप म्हणजेच निद्रानाश – इनसोमनिया याने व्यक्ती ग्रस्त होते.
कृत्रिम रीतीने निद्रा येण्यासाठी झोपेच्या गोळ्या (पिल्स) घेणे एवढाच उपाय शिल्लक उरतो. सातत्याने पिल्स घेतल्याने शरीराला घातक अशा सवयी नकळत जडतात. परिणामत: वेगवेगळ्या प्रकारचे कर्करोग जडणे, शरीराची रोगप्रतिकारक शक्ती क्षीण होत जाऊन मृत्यूही येतो.  पृथ्वीवर प्रतिवर्षी सुमारे सहाश कोटी रुपयांची उलाढाल स्लीपिंग पील्स मार्फत घडून येत आहे. पृथ्वीवरील सुमारे वीस टक्के व्यक्ती निद्रानाशामुळे व्यथित आहेत.
इनसोमनिआ क्लिनिक्समध्ये झोपण्यापूर्वी मसाज करणे, फळांचे, सहज पचणाऱ्या पदार्थाचे सेवन करणे, सभोवताली मंद संगीत, पांढऱ्या रंगाची रंगसंगती यासारखे उपाय उपयुक्त ठरतात. वेगवेगळ्या कंपन्यांनी खास तंत्रज्ञान वापरून विविध आकाराच्या उशा (पिलो) तयार केल्या आहेत. त्यांना ललबी, सॅटीन, ब्यूटी, स्विडीश मेमारी मर्टनिटी, बकव्ही अशा नावानी ओळखले जाते. त्या उशांमध्ये थोडय़ा प्रमाणात स्प्रिंग, कापूस, कापड यांचा वापर केलेला असतो. डोके आणि मान याच्या वजनाचे प्रमाण ओळखून त्यामध्ये खोलगटपणा तयार होईल, कानात शांतपणे अगदी सौम्य, मंद संगीत ऐकू येईल अशा प्रकारची सोय असते. या प्रकारच्या उशांची किंमत साधारणत: चारशे ते पाचशे  डॉलर्स (सुमारे वीस ते पंचवीस हजार रुपये) इतकी असते. तीन ते पाच वर्षांची बालके, सहा ते पंधरा वर्षांर्पयची मुले, मुली, प्रौढ आणि वृद्ध व्यक्ती अशा प्रकारे वयोगटांप्रमाणे उशांची रचना वेगवेगळी असते. निद्रारोग तज्ज्ञ डॉ. विल्यम डिमांट,  प्रा. जेन केंट ब्राऊन आणि इतर काही संशोधकांनी मिळून सर्व वयोगटांतील निद्रानाशाने पछाडलेल्या व्यक्तींसाठी नवीन उपाय शोधून काढला आहे. त्यांच्या संशोधक पथकाने ग्रीसमधून कोकोमॅट नावाच्या वेगळ्या नवीन प्रकारच्या गाद्यांची निर्मिती सुरू केली आहे. ग्रीसमध्ये सापडणारे ठराविक सागरी शैवाल, घोडय़ांचे केस, लोकर आणि नारळीच्या पानातील तंतू आणि अत्यंत थोडय़ा प्रमाणात कापडाच्या चिंध्या यांच्यापासून तयार केलेल्या अत्यंत आरामदायी गाद्यांना ‘कोको मॅट’ या नावाने २०१० मध्ये बाजारात आणले.
प्रायोगिक तत्त्वावर वेगवेगळ्या वयोगटातील शंभर व्यक्तींची कोकोमॅटसाठी निवड करण्यात आली. त्यांना वेगवेगळ्या प्रकारे निद्रानाशाचा विकार त्रस्त करीत होता. त्या गाद्यांवर पहुडल्या नंतर ६२ टक्के व्यक्तींना, व्याधीग्रस्तांना शांतपणे झोप येऊ लागली. त्या गादीवर झोपून उठल्यानंतर ते खूप प्रमाणात तरतरीत असल्याचे आढळले. कोकोमॅटच्या प्रायोगिक यशानंतर आता बारा देशांमध्ये या वेगळ्या प्रकारच्या गादीचा प्रसार मोठय़ा प्रमाणात झाला आहे. आरामदायी निश्चित झोप येऊ शकेल अशा कोकोमॅटची किंमत मात्र पंचवीस ते सत्तावीस हजार डॉलर्स इतकी (सुमारे १३ लाख रुपये) आहे. या गाद्यांचा उपयोग मोठय़ा शहरांतील व्यक्तींना जास्त प्रमाणात होत आहे.