प्रश्न – मला जर एखादा ई-मेल ठरावीक वेळी  पाठवायचा असेल किंवा ठरावीक वेळी माझ्या इनबॉक्समध्ये वरती हवा असेल तर जीमेलसाठी तशी काही सुविधा आहे का?
– ओंकार तांबे
उत्तर – गुगलने अशी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यापूर्वी ही सुविधा केवळ ई-मेल पाठविण्यासाठी होती. म्हणजे एखादे ई-मेल आपण ड्राफ्टमध्ये सेव्ह केले आणि त्यावर तारीख आणि वेळ दिली की त्या वेळेला बरोबर तो ई-मेल पाठविला जात असे. आता आपल्या इनबॉक्समधील ई-मेलही आपल्याला पाहिजे त्या वेळेला पाहायचा असेल तर गुगलने त्यासाठी मोबाइलच्या आलार्ममध्ये असते तशी ‘स्नूझ’ची सुविधा दिली आहे. आपल्या ई-मेलवर घडय़ाळय़ासारख्या दिसणाऱ्या चिन्हावर आपण क्लिक केल्यानंतर ‘स्नूझ’चा पर्याय समोर येतो. यामध्ये आपल्याला मेल कोणत्या तारखेला किती वाजता दिसणे अपेक्षित आहे ती वेळ टाकली की त्या वेळेला तो मेल इनबॉक्समध्ये फ्लॅश होतो. हॉटेल बुकिंगपासून ते मीटिंगच्या ई-मेल्सपर्यंतच्या ई-मेल्सना आपण ही सुविधा वापरू शकतो. जेणेकरून आपली वेळ चुकणार नाही.

प्रश्न – गुगल मॅपचा प्रवासात कसा उपयोग होऊ शकतो. इंटरनेट जोडणी नसेल तर अ‍ॅप मदत करू शकते का?
– कार्तिकी मोरे
उत्तर – हे अ‍ॅप आपल्याला प्रवासात दिशादर्शक म्हणून उपयुक्त आहे.  जगभरात तुम्ही कुठेही फिरायला गेलात तर हे अ‍ॅप तुमची साथ देऊ शकते. आपण कोणत्या रस्त्याने जात आहोत, आता आपण कोठे आहोत याची माहिती हे अ‍ॅप देतेच; याचबरोबर आपल्याला ज्या ठिकाणी जायचे आहे तेथे जाण्यासाठी किती वेळ लागेल, जाण्यासाठी कोणते रस्ते उपलब्ध आहेत आदी माहिती यामध्ये मिळते. तसेच यातील नव्या व्हर्जनमध्ये आपण ज्या ठिकाणी आहोत तेथील आसपासची माहितीही आपल्याला या अ‍ॅपमध्ये मिळते. यात खाण्याची ठिकाणे, दुकाने, हॉटेल्स आदींची माहितीही येथे मिळते. यामध्ये थ्रीडी नकाशे उपलब्ध आहेत. यामुळे रस्ता समजणे अधिक सोपे जाते. हे अ‍ॅप अ‍ॅण्डॉइड आणि आयओएसवर उपलब्ध आहे. यासाठी प्रत्येक उपकरणानुसार वेगळी साठवणूक जागा लागते. तसेच इंटरनेटशिवाय हे अ‍ॅप तुम्हाला मार्ग दाखवू शकते. पण नेव्हिगेशन करू शकणार नाही. म्हणजे तुम्हाला रस्ता कळेल पण तुम्ही आत्ता नेमके कुठे आहात रस्ता चुकालात की कसे हेही कळू शकणार नाही.
– तंत्रस्वामी