पूर्वी लॅपटॉप किंवा इतर कोणतेही उत्पादन घ्यायला गेले की, ग्राहकांना निवडीच्या बाबतीत फारसे पर्याय नसायचे. शिवाय इतर फारसे नाव नसलेल्या कंपन्यांची उत्पादने घेताना ग्राहकही काहीसे कचरायचे. पण आता दोन महत्त्वाच्या बाबी झाल्या आहेत. पहिले महत्त्वाचे म्हणजे चांगल्या सर्वोत्तम दर्जाच्या कंपन्यांबरोबरच इतर चांगल्या कंपन्यांची उत्पादनेही त्याच वेळेस बाजारपेठेत पाहायला मिळतात आणि त्यानिमित्ताने पर्यायही राहतो निवडीसाठी. शिवाय एखादी कंपनी फारशी माहिती नसली तरी फारसा फरक पडत नाही कारण तुम्ही थेट इंटरनेटवर जाऊन त्या उत्पादनाची आणि त्या कंपनीची माहिती इंटरनेटच्या माध्यमातून घेऊन तुमचे स्वतचे मत तयार करू शकतात. कंपनीच्या शिवाय इतर अनेकांनी त्या उत्पादनाबाबत माहिती इंटरनेटवर नोंदविलेली असते. त्यामुळे चांगले- वाईट दोन्ही वाचायला मिळते.
टिकावू नोटबुक
फूजित्सू ही भारतात फारशी प्रसिद्ध नसलेली अशी कंपनी. पण आता मात्र अनेक ठिकाणी या कंपनीची उत्पादने पाहायला मिळतात. आणि बाजारपेठेनेही त्यांची चांगली दखल घेतलेली दिसते. या फूजित्सूने अलीकडे बाजारपेठेत आणलेले लॅपटॉप सध्या चांगलेच चर्चेत आहेत. त्यातही लाइफबुक- एएच ५३१ची चर्चा थोडी अधिक आहे. हा लॅपटॉप नोटबुक या प्रकारात मोडणारा आहे. याची बांधणी अतिशय उत्तम असून त्याचे बाह्य़ावरण टिकाऊ आणि दणकट आहे. शिवाय त्याच्या गुळगुळीत फिनिशिंगमुळे ते उठावदारही दिसते.
१५.६ इंचाचा एचडी डिस्प्ले
१५.६ इंचाचा डिस्प्ले स्क्रीन हे त्याचे वैशिष्टय़ तर आहेच. शिवाय तो हायडेफिनेशन एलसीडी स्क्रीन आहे. त्याची डिस्प्ले काच ही अँटीग्लेअर असल्यामुळे दिवसाउजेडी घराबाहेर काम करतानाही त्रास होत नाही. स्क्रीनवरचा मजकूर व्यवस्थित पाहाता येतो. यात डब्लूलॅन, ब्लूटूथ, अशी सोय असून कनेक्टिविटीसाठी थ्रीजीची सोयही देण्यात आली आहे. त्यामुळे हे अद्ययावत असे नोटबुक आहे.
भारतीय बाजारपेठेतील किंमत : रु. ४५,०००/-