गेल्या काही शतकांमध्ये मानवाची जी प्रगती झाली आहे त्याला विज्ञान आणि तंत्रज्ञान यातील शोध कारणीभूत आहेत याबद्दल कोणाचेच दुमत नसावे. अंदाजे चारशे वर्षांपूर्वी युरोपातून कोलंबस आणि वास्को द गामा यांच्यासारख्या साहसी मंडळींना भारताच्या सागरी मार्गाचा शोध घ्यायला निघावे लागले होते. त्यासाठी त्यांनी अनेक महिने प्रवास केला होता. आज आपण चोवीस तासांच्या आत पृथ्वीवरील एका ठिकाणाहून दुसऱ्या खंडात पोहोचू शकतो. इच्छा झाली की, खिशातल्या मोबाइलवरून जगात कुठेही व्हिडीओ कॉल करू शकतो. आज एखाद्या जिवंत व्यक्तीच्या शरीरातील किडनीसारख्या अवयवाचे रोपण दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात करून त्याचा जीव वाचवता येतो. अशा किती तरी शोधांनी मानवाचे जीवन समृद्ध केलेले आहे.

विज्ञानाविषयी सर्वसामान्य लोकांच्या मनात कुतूहल असले तरी थोडीशी (आदरयुक्त) भीतीची भावना असते. लोकांना पडलेल्या प्रश्नांची उत्सुकता शमवणारी आणि त्यांना विज्ञान तंत्रज्ञानाची गोडी लावणारी एक साइट आपण आज बघणार आहोत. तिचे नाव आहे- <http://www.thenakedscientists.com/>  या साइटचे नाव (नेकेड सायंटिस्ट) थोडेसे दचकवणारे असले तरी ती जगविख्यात केंब्रिज विद्यापीठाच्या टीमने चालवलेली साइट असून इंग्लंडच्या बीबीसी, ऑस्ट्रेलियाच्या एबीसी यांसारख्या अनेक नामवंत प्रसारमाध्यमांनी या टीमने बनवलेले कार्यक्रम प्रसारित केले आहेत. अशा प्रकारे लक्षावधी श्रोत्यांपर्यंत/प्रेक्षकांपर्यंत यांनी बनवलेले कार्यक्रम ऑडियो-व्हिडीओ रूपात पोहोचले आहेत.

या साइटवर मुख्यत्वे एमपी३ फॉरमॅटमध्ये सांगितलेली माहिती (पॉडकास्ट), वैज्ञानिक विषयांवरील विविध मनोरंजक लेख, शास्त्रज्ञांच्या मुलाखती आणि लोकांना पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे यांसारख्या विभागांमध्ये माहिती संग्रहित केलेली आहे. विद्यार्थ्यांना करून बघता येतील असे काही प्रयोगही येथे सुचवलेले आहेत. या विभागाला येथे किचन एक्सप्रिमेंट असे नाव दिलेले आहे.

प्रश्नांच्या विभागात प्रत्येक आठवडय़ाला एक प्रश्न घेतला जाऊन त्यावर चर्चा करून उत्तर दिले जाते. उदाहरणार्थ १० नोव्हेंबरचा प्रश्न होता की (अण्वस्त्रांमुळे) पृथ्वीवरील मानवजात पूर्ण नष्ट झाली आणि इतर प्राणी राहिले तर पृथ्वीवर कुठल्या सजीवांचे राज्य येईल? (या प्रश्नाचे उत्तर साइटवर जाऊनच पाहा.)

पॅरिसला नुकतीच उच्चपदस्थांची पर्यावरणविषयक परिषद झाली. पर्यावरणाचे तापमान वाढू नये यासाठी सर्वमान्य तोडगा काढण्याचा प्रयत्न होत आहे. याद्वारे निसर्गचक्राचा तोल ढासळणार नाही; परंतु हा केवळ राज्यकर्त्यांनीच चर्चा करण्याचा विषय आहे का? तुमच्या-आमच्या सर्वसामान्य लोकांचे दायित्व काय आहे? याची चर्चाही ८ डिसेंबरच्या इंटरव्हय़ूमध्ये तुम्ही वाचू शकाल.

कोणत्याही तांत्रिक बाबींचे अवडंबर न माजवता, शास्त्रीय समीकरणांच्या जंजाळात न सापडता तुम्हाला-आम्हाला पटणाऱ्या विज्ञान तंत्रज्ञानातल्या प्रश्नांची सोप्या शब्दांत उत्तरे देणारी ही साइट आहे.

मनाली रानडे

manaliranade84@gmail.com