विण्डोज आणि मायक्रोसॉफ्ट ऑफिस आज आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक झाल्या आहेत. पूर्वी आपल्याला केवळ वर्ड, एक्सेल, पॉवरपॉइंट, आऊटलुक आणि अॅक्सेस हीच ऑफिस अॅप्लिकेशन माहीत होती. परंतु आता जसजशी नवी वर्जन्स येत आहेत तशी ही अॅप्लिकेशन नव्या वैशिष्टय़ांनी समृद्ध होत आहेत. तसेच मायक्रोसॉफ्ट ऑफिसमध्ये वन नोट, वन ड्राइव्ह, पब्लिशरसारखी नवी अॅप्लिकेशन्सदेखील आलेली आहेत.
<https://support.office.com/en-MY/article/Office-Training-Center-b8f02f81-ec85-4493-a39b-4c48e6bc4bfb&gt; या साइटवर ऑफिसच्या या सर्व अॅप्लिकेशन्सचे ऑनलाइन ट्रेिनग उपलब्ध आहे. वर्ड, एक्सेल, पॉवरपॉइंट, आऊटलुक आणि अॅक्सेस यांची २००७, २०१० आणि २०१३ या वर्जन्सची टय़ुटोरियल्स उपलब्ध आहेत. २०१० आणि २०१३ या वर्जन्सची व्हिडीओ टय़ुटोरियल्स उपलब्ध आहेत. प्रत्येक व्हिडीओ अंदाजे दोन ते पाच मिनिटांचा आहे.
एक्सेलमधे वर्कबुक तयार करणे, रो आणि कॉलम्स समाविष्ट करणे, काढून टाकणे या प्राथमिक गोष्टींबरोबरच बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकाराची सूत्रे वापरून उत्तर कसे काढायचे, दोन तारखांमधील दिवस काढणे इत्यादी शिकवणारी टय़ुटोरियल्स आहेत. त्याचबरोबर एक्सेलमधला डेटा शेअर पॉइंटवर एक्स्पोर्ट वापरून तो इतरांना कसा शेअर करायचा या विषयांवरील पाठ येथे बघता येतील. या आणि इतर अॅप्लिकेशन्सचा उपयोग कसा करायचा हे येथे समजून घेता येईल.
ही सर्व अॅप्लिकेशन्स विण्डोज या ऑपरेटिंग सिस्टीमव्यतिरिक्त मॅक ऑपरेटिंग सिस्टीम, अॅण्ड्रॉइड, आय-पॅड आणि विण्डोज फोनवरदेखील कशी वापरायची याचे टय़ुटोरियल व गाइड येथे मिळेल. या अॅप्लिकेशन्समधे असंख्य फीचर्स आहेत. परंतु प्रत्येक फीचर टय़ुटोरियलच्या माध्यमातून समजावून सांगणे कठीणच आहे. ती समजून घेण्यासाठी स्वत: वापरून बघणे हाच एक सोपा उपाय असू शकतो. परंतु ऑफिस ट्रेिनग सेंटरमध्ये उपलब्ध असलेल्या या टय़ुटोरियल्समुळे ही अॅप्लिकेशन्स किती आणि कशी उपयोगी ठरू शकतात हे जाणून घेण्यास नक्कीच मदत होईल.
ऑफिस ३६५ ही २०११ पासून लोकांना उपलब्ध करून दिलेली सेवा आहे. ही सेवा तुम्हाला तुमच्या वापरानुसार मासिक किंवा वार्षकि भाडे देऊन वापरता येते. यामधून तुम्हाला वैयक्तिकरीत्या किंवा बिझनेससाठी ऑफिस पॅकेजमधील हव्या त्या सेवा इंटरनेटवर उपलब्ध होऊ शकतात. म्हणजेच ही सॉफ्टवेअर्स तुम्ही कॉम्प्युटरवर लोड न करता थेट इंटरनेटवरून वापरायची असतात. तुमचा तयार झालेला डेटासुद्धा इंटरनेटवर साठवला जातो. तो कोणत्याही ठिकाणाहून अॅक्सेस करून वापरता येतो. हे छोटय़ा कंपन्यांच्या दृष्टीने उपयोगाचे असते, कारण त्यांना कॉम्प्युटर्स व त्यातील सॉफ्टवेअर्स विकत घ्यावी लागत नाहीत. ऑफिस ३६५ कसे वापरावे याची माहिती व ट्रेिनग या साइटवर मिळेल.
जगात सर्वात जास्त वापरले जाणारे हे सॉफ्टवेअर प्रत्यक्ष मायक्रोसॉफ्टच्या निर्मात्यांकडून विनामूल्य शिकणे तुम्हाला आता सहज शक्य आहे.
– मनाली रानडे
manaliranade84@gmail.com