संगणकाचा जीव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऑपरेटिंग सिस्टिमपैकी एक म्हणजे विंडोज नुकतीच तीस वर्षांची झाली. ऑपरेटिंग सिस्टिम म्हणजे काय हे माहिती नसतानाही संगणकाला हात लावणाऱ्या प्रत्येकाला सोयीचे होईल अशी प्रणाली विकसित करून मायक्रोसॉफ्टने विंडोजच्या रूपाने संगणक क्षेत्रात क्रांती घडविली. एकच गोष्ट तीस वष्रे वापरणे हे मानवी स्वभावाला धरून नसले तरी मायक्रोसॉफ्टने काळानरूप स्वीकारलेल्या बदलांमुळेच त्यांना हा पल्ला गाठणे शक्य आहे. आजमितीस भारतात सर्वाधिक वापरली जाणारी ऑपरेटिंग सिस्टिम ही विंडोज आहे. विंडोजच्या तिशीनिमित्त विंडोजबाबत काही जाणून घेऊ या.
मायक्रोसॉफ्टने विंडोजच्या आधी एमएस-डॉस ही ऑपरेटिंगप्रणाली बाजारात आणली. यानंतर त्यांनी काळाची गरज ओळखून विंडोज ऑपरेटिंग प्रणाली बाजारात आणली. पण तोपर्यंत अ‍ॅपलने मॅक ऑपरेटिंग सिस्टिम बाजारात आणली होती. यामुळे मायक्रोसॉफ्टच्या डॉस प्रणालीला धक्का बसू लागला होता. पण ज्या ठिकाणी काहीच नाही अशा ठिकाणापर्यंत पोहचून आपले उत्पादन विकण्याच्या कंपनीच्या धोरणाचा फायदा झाला आणि विंडोज ही ऑपरेटिंग प्रणाली संगणकाचा प्राण बनली.

विंडोज १.०
नोव्हेंबर १९८५ मध्ये विंडोज १.० बाजारात आले. प्रत्यक्षात विंडोजचा हा प्रवास दीड वष्रे उशिरा सुरू झाला. कंपनीला अपेक्षित असलेल्या वेळेपेक्षा दीड वर्षांनंतर विंडोजची पहिली आवृत्ती बाजारात आली. तरीही वापरकर्त्यांच्या दृष्टीने विकसित करण्यात आलेल्या या ऑपरेटिंग सिस्टिमला लोकांची पसंती मिळाली. काळानुरूप बदलत जाणाऱ्या ऑपरेटिंग सिस्टिमच्या आवृत्त्यांमुळे तब्बल तीन दशके या ऑपरेटिंग सिस्टिमने संगणक क्षेत्रात अधिराज्य गाजवले आणि अब्जावधी संगणकांची प्राण बनली. मायक्रोसॉफ्टने सर्वाधिक काळ अधिकृतपणे सेवा पुरविलेली ऑपरेटिंग प्रणाली कोणती असा प्रश्न येतो तेव्हा अर्थातच विंडोज १.० चे नाव येते. कारण कंपनीने तब्बल १६ वर्षे म्हणजे ३१ डिसेंबर २००१ पर्यंत या आवृत्तीची सेवा पुरविली.

Untitled-18

विंडोज ३८६
मायक्रोसॉफ्टने तीन वर्षांच्या कालावधीत म्हणजे १९८८ मध्ये विंडोज ३८६ बाजारात आणले. याला विंडोज २.१ आवृत्ती म्हणूनही ओळख होती. पण ही ऑपरेटिंग प्रणाली सक्षमपणे वापरण्यासाठी त्याकाळी हार्डवेअर अर्थात संगणक उपलब्ध नव्हते. म्हणजे ती वापरण्यासाठी उपयुक्त संगणक नव्हते. त्यावेळेस डॉस सर्वत्र पसरले होते. यामुळे वापरकर्त्यांनाही नवी प्रणाली वापरणे तसे सोयीस्कर होत नव्हते. यामुळे विंडोज २.१ आवृत्ती आली तेव्हा कुठे विंडोज १.० लोकांमध्ये रूढ होत होती.

विंडोज ३.११
विंडोजची ही आवृत्ती म्हणजे बदलाची सुरुवात होती. सुरुवातील संगणक हा एकच व्यक्ती वापरू शकत होता. म्हणजे एका संगणकातील माहिती त्याच संगणकावर उपलब्ध होत होती. त्यासाठी हार्डवेअर उपलब्ध होते. पण ऑपरेटिंग प्रणाली तसे करण्याची परवानगी देत नव्हती. १९९३ मध्ये विंडोजने ही आवृत्ती बाजारात आणली आणि विंडोजवर कार्यालयीन कामकाज करणाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला. यामुळे या आवृत्तीला ‘विंडोज फॉर वर्कग्रुप्स’ असे टोपण नावही देण्यात आले होते. या आवृत्तीमध्ये नेटवर्क कार्ड इंस्टॉल करण्याची परवानगी होती. या आवृत्तीत केलेले बदल हे ३२ बीटच्या डिस्कला पूरक इरले. यामुळे ३२ बीट नेटवर्किंग करणे शक्य झाले. इंटरनेट प्रोटोकॉल नेटवर्किंगला पुरक अशी ही पहिली आवृत्ती होती.

Untitled-19

विंडोज ९५
आज आपण वापरत असलेया विंडोज आवृत्तींचा पाया म्हणून आपण विंडोज ९५ म्हणू शकतो. विंडोजची ही आवृत्ती ऑगस्ट १९९५ मध्ये बाजारात आणली गेली. ही आवृत्ती भविष्यात खूप मोलाची कामगिरी बाजावेल हे स्पष्ट झाल्याने मायक्रोसॉफ्टने एका मोठय़ा कार्यक्रमात ही आवृत्ती सादर केली. ही आवृत्ती बाजारात पोहचत नाही तोवर म्हणजे साधारणत: एका वर्षांच्या आतात आवृत्तीत बदल करून ती अद्ययावत करण्यात आली. एफएटी ३२ ला पूरक ठरणारी ही पहिली विंडोज ऑपरेटिंग प्रणाली होती. यामुळे संगणकात मोठे बदल झाले. संगणकाची साठवणूक क्षमता, कामाचा वेग आणि विश्वासार्हता वाढली.

विंडोज एनटी ४.०
विंडोजच्या जुन्या ग्राहकांसोबतच व्यावसायिकांना वापरा योग्य अशी एक आवृत्ती मायक्रोसॉफ्ट १९९० पासून विकसित करत होती. ती म्हणजे विंडोज एनटी. ही आवृत्ती त्यांनी विंडोज ९५ नंतर लगेजच्याच वर्षी म्हणजे १९९६ मध्ये बाजारात आणली. पण या आवृत्तीचे काम नवीन तंत्रज्ञान विकसित होण्यापूर्वीच सुरू झाल्यामुळे ही डॉसवर आधारीत होती. यामध्ये व्यवसायाला उपयुक्त अशा सुविधा देण्यात आल्या होत्या. पण ही आवृत्ती फारशी चालली नाही. कारण या आवृत्तीमध्ये एक प्रोग्रॅम सुरू करण्यासाठी ३२ एमबी रॅम खर्च होत होती. जी त्याकाळी खूप जास्त होती. पण या आवृत्तीने विंडोजला ‘स्टार्ट’ मेन्यू दिला. म्हणजे खालच्या टास्क बारमध्ये स्टार्टचा पर्याय देण्यात आला होता. ज्याचा वापर करून आपण आपल्या पाहिजे तो प्रोग्राम निवडू शकत होतो.

Untitled-20

विंडोज 98
यूएसबी उपकरण जोडण्याची मुभा देणाऱ्या विंडोजच्या या आवृत्तीमध्ये मायक्रोसॉफ्टने संगणक वापर अधिक प्रगत केला होता. ही आवृत्ती जगभरात पोहचत असतानाच काही महिन्यांमध्येच मायक्रोसॉफ्टने या आवृत्तीची अद्ययावत आवृत्ती बाजारात आणली. ही अद्ययावत आवृत्ती म्हणजे यापूर्वीच्या डॉस आधारीत विंडोज प्रणालींपेक्षा वेगळी होती. कारण यामध्ये प्रथमच डॉस आधार घेण्यात आला नव्हता. ही आवृत्ती कंपनीने किरकोळ बाजारात उपलब्ध करून दिली होती. या आवृत्तीमध्ये जुन्या विंडोजच्या आवृत्तींच्या तुलनेत खूप अद्ययावत बदल करण्यात आले होते. जे बदल सध्याच्या विंडोजचा पाया ठरले आहेत. यामध्ये सर्वप्रथम यूएसबी उपकरण जोडण्याची मुभा वापरकर्त्यांला मिळाली होती.

विंडोज २०००
ही आवृत्ती म्हणजे विंडोज एनटीचे अद्ययावत व्हर्जन म्हणून ओळखली जात होती. ही आवृत्ती डिसेंबर १९९९ मध्ये कंपनीने प्रसिद्ध केली. पण फेब्रुवारी २०००मध्ये ती बाजारात आणली गेली. ही आवृत्ती क्लायंट आणि सव्‍‌र्हरला जोडणारी होती. यामुळे याचा वापर व्यावसायिकांची खूप महत्त्वाची आहे. या आवृत्तीचा विकास होत असताना त्याला विंडोज एनटी ५.० असे नाव देण्यात आले होते. मात्र कालांतराने त्याचे नाव बदलून विंडोज २००० ठेवण्यात आले. कालांतराने या आवृत्तीच्या प्रोफेशनल, सव्‍‌र्हर, अँडव्हान्स सव्‍‌र्हर आणि डेटासेंटर सव्‍‌र्हर अशा उपआवृत्या आल्या. पुढे याला विंडोज एक्सपीचा पर्याय उपलब्ध झाला.

विंडोज एक्सपी
वैयक्तिक संगणकाची ऑपरेटिंग प्रणाली म्हणून विंडोज एक्सपीची ओळख आहे. ही आवृत्ती मायक्रोसॉफ्टने ऑगस्ट २००१ मध्ये पूर्णत्वाला नेली. यानंतर ती त्याच वर्षांत ऑक्टोबरमध्ये बाजारात उपलब्ध करून देण्यात आली. ही ऑपरेटिंग प्रणाली म्हणजे मायक्रोसॉफ्टमधील अभियंतांच्या ११ वर्षांच्या मेहनतीचे फळ होते. या काळात संगणक घराघरात पोहचण्यास सुरुवात झाली होती. यामुळे घरात वापरण्यास योग्य अशा ऑपरेटिंग प्रणालीची गरज होती. ती गरज या आवृत्तीने भरून काढली. यामुळेच या आवृत्तीने तब्बल 12 वष्रे संगणक क्षेत्रात राज्य केले. ही आवृत्ती संगणक सुरक्षा, स्थिरता आणि कार्यक्षमता या सर्व पातळय़ांवर आघाडीवर होती. या आवृत्तीमध्ये प्रथमच ग्राफिकचा वापर करण्यात आला. विंडोज एक्सपी ही मायक्रोसॉफ्टची सर्वाधिक विक्री झालेली ऑपरेटिंग प्रणाली आहे. याच्या अब्जावधी प्रती विकल्या गेल्या. ही प्रणाली विकसित झाल्यानंतर मायक्रोसॉफ्टने विंडोज २००३ सह विंडोज विस्टा या पुढच्या आवृत्तीही बाजारात आणल्या. मात्र त्या एक्सपीला पर्याय ठरू शकल्या नाहीत. इतकेच नव्हे तर या ही ऑपरेटिंग प्रणाली वापरण्यास बंद करण्याचा निर्णय अखेर कंपनीला घ्यावा लागला. २०१४ मध्ये कंपनीने एक्सपीला कोणत्याही प्रकारची सुरक्षा सुविधा आणि पुढची सेवा दिली जाणार नसल्याचे जाहीर केले.

विंडोज ७
विंडोज एक्सपीच्या पुढचे पाऊल ठरलेल्या विंडोज ७ या ऑपरेटिंग प्रणालीने संगणक बाजारात २००९ मध्ये प्रवेश करा. मात्र तरीही एक्सपीला टक्कर देणे या ऑपरेटिंग प्रणालीला शक्य झाले नाही. ज्यावेळेस कंपनीने एक्सपीला पुढील सहकार्य न करण्याचे जाहीर केले तेव्हा वापरकर्ते विंडोज 7चा पर्याय निवडू लागले. या ऑपरेटिंग प्रणालीमध्ये लायब्रेरीज, शेअरिंग प्रणाली होम ग्रुप यासारख्या अद्ययावत सुविधा बाजारात आणल्या. या प्रणालीलाही बाजारात चांगला प्रतिसाद मिळाला. यामुळेच ही प्रणाली बाजारात येऊन सात वष्रे उलटली तरी आजही या प्रणालीला बाजारात चांगली मागणी आहे.

1

विंडोज ८
काळाची गरज ओळखून पाऊल टाकणाऱ्या मायक्रोसॉफ्टने अ‍ॅप आधारित विंडोज 8 ही प्रणाली बाजारात आणली. मात्र आजवरच्या विंडोजच्या प्रणालीपेक्षा ही प्रणाली खूप वेगळी होती. यामुळे वापरकर्त्यांनी याचे स्वागत फारसे आवडीने केले नाही. यामुळे मायक्रोसॉफ्टला चांगलाच धक्का बसला. याशिवाय यामध्ये अनेक त्रुटी होत्या. या त्रुटी लोकांनी चांगल्याप्रकारे दाखवून दिल्या. यामुळे लगेजच विंडोज ८ची ८.१ ही प्रणाली बाजारात आली. पण यातही फारसे बदल नसल्यामुळे ती लोकांच्या पसंतीस उतरली नाही.

विंडोज १०
विंडोज ८ मुळे भविष्यातील संगणक प्रणालीची चुणूक दिसली खरी. पण त्याचा उपभोग घेणे ग्राहकांना जमले नाही. यामुळे कंपनीने तातडीने विंडोज १० ही ऑपरेटिंग प्रणाली बाजारात आणली. ही प्रणालीही अ‍ॅप आधारीत असून यामुळे संगणक क्षेत्राला वेगळे वळण मिळाले. या प्रणालीमुळे संगणक आणि स्मार्टफोन हे एकमेकांस पूरक उपकरणं ठरली आहेत. यामुळेच लोक या प्रणालीला पसंती देऊ लागले आहेत. मात्र घरगुती वापरासाठी आजही विंडोज ७लाच पसंती आहे.
संगणक वापराला वेगळय़ा वळणावर नेऊन ठेवणाऱ्या मायक्रोसॉफ्टने यापुढे नवी ऑपरेटिंग प्रणाली बाजारात न आणण्याचा निर्णय घेतला असून कंपनी विंडोज १० मध्येच अद्ययावत सुविधा देणार आहे. असे असले तरी विंडोज १० चे अद्ययावत आवृत्ती ही नवी ऑपरेटिंग प्रणाली ठरू शकणार आहे.

– नीरज पंडित
niraj.pandit@expressindia.com