मोटोरोला कंपनी सुमारे पाच ते सहा वर्षांपूर्वी अतिशय तेजीमध्ये होती. तरुणांच्या हाती केवळ आणि केवळ मोटोरोलाचेच हॅण्डसेट दिसत होते. अगदी जेम्स बॉण्डपासून ते भारतात लोकप्रिय असलेल्या डॉनपर्यंत सर्वत्र महत्त्वाच्या पात्राकडे हाती मोटोरोलाचेच हॅण्डसेट दिसत होते. अर्थात या पात्रांमुळे मोटोरोलाच्या लोकप्रियतेमध्ये तुफान वाढ झाली होती. मोटोरेझरचे लाँचिंग भारतात याच कालखंडात झाले होते. हे मॉडेल तुफान लोकप्रिय होते. त्यानंतर मात्र मोटोरोलाला उतरती कळा लागल्यासारखीच स्थिती होती. त्यानंतर अलीकडेच मोबाइलच्या क्षेत्रातील आपला विस्तार वाढविण्याच्या दृष्टीने  गुगलने मोटोरोला कंपनीच विकत घेतली. त्यानंतर बाजारात आलेला पहिला हॅण्डसेट म्हणजे मोटोरोला रेझर मॅक्स.
१७ तासांची बॅटरी क्षमता
मोटोरोला कंपनी पूर्वीपासून ओळखली जाते ती त्यांच्या मशीनसाठी अर्थात चांगल्या क्षमतेच्या यंत्रणांसाठी. त्याचे प्रत्यंतर या मॉडेलमध्येही आपल्याला येते. मोटोरोलाच्या या हॅण्डसेटची बॅटरी क्षमता अतिशय उत्तम असून एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल १७.६ तास टॉक- टाइमसाठी त्याचा वापर करता येतो, असा कंपनीचा दावा आहे. याचा डिस्प्ले स्क्रीन ४.३ इंचाचा एमोलेड असून फोन आकाराने केवळ ८.९९ मिमी. जाडीचा आहे.
मेगापिक्सेल कॅमेरा
या हॅण्डसेटला समोरच्या व मागच्या बाजूस असे दोन कॅमेरे आहेत. मागच्या बाजूस असलेला कॅमेरा ८ मेगापिक्सेल क्षमतेचा आहे. त्यावर १०८० पी क्षमतेने व्हिडीओ रेकॉर्डिगची सोयही त्यावर आहे. बाजारात असलेल्या काही हॅण्डसेटमध्ये ऑपरेटिंग सिस्टिम म्हणून अँड्रॉइड २.३ ही जुनी आवृत्ती वापरण्यात आलेली असली तरी आता मोटोरोलाने
‘ओव्हर द एअर’ पद्धतीने अँड्रॉइडची नवीन आवृत्ती ४.० अद्ययावत करण्याची सोयही उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी हॅण्डसेटमध्ये कोणताही बदल करावा लागत नाही. याच क्षमतेमध्ये नवीन आवृत्ती सहज लोड करता येते.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे या ‘बिझनेस रेडी’ स्मार्ट फोन असल्याचा कंपनीचा दावा असून त्यासाठी तुमचे व्यवहार संरक्षित करणाऱ्या सोयीदेखील त्यामध्ये देण्यात आल्या आहेत.
भारतीय बाजारपेठेतील किंमत :  नेमकी उपलब्ध नाही.
मात्र अंदाजानुसार रुपये ३१ हजारांपेक्षा अधिक