ऑलिम्पसने अलीकडेच त्यांची स्टायलस मालिका बाजारपेठेत आणली असून त्यातील व्हीएच-५२० हे मॉडेल ‘लोकसत्ता’कडे रिव्ह्य़ूसाठी पाठवले होते. २५.४ मिमी. एवढा त्याचा आटोपशीर आकार आहे. समोरच्या बाजूस लेन्स व फ्लॅश पाहायला मिळतो, तर मागच्या बाजूस तीन इंचाचा एलसीडी स्क्रीन आहे. उजव्या हातास वरती वाइड अँगल आणि टेली अशी सेटिंग्ज असलेली बटने आहेत. खालच्या बाजूस गोल चकती असून त्या चकतीवर वरती इन्फो, उजवीकडे फ्लॅश सेटिंग्ज, खालती सेल्फ शूट आणि डिलीट असे मोड्स देण्यात आले आहेत. सर्वात खालती टिपलेले फोटो पाहण्यासाठी आणि मेन्यू अशी दोन सेटिंग्ज आहेत.
खालच्या बाजूस बॅटरी सॉकेट आहे, तर उजवीकडे एचडीएमआय आणि यूएसबी केबलची सॉकेटस् आहेत. वरच्या बाजूस तीन बटने आहेत. त्यात ऑन-ऑफ, शटर क्लिक्  बटन आणि व्हिडीओ मोड यांचा समावेश आहे. स्पीकरही वरच्याच बाजूस देण्यात आला आहे.
१० एक्स ऑप्टिकल झूम आणि २० एक्स सूपरझूम हे याचे खास वैशिष्टय़ आहे. याला २६ मिमी वाइड अँगल लेन्स देण्यात आली आहे.  त्याला १० एक्स ऑप्टिकल झूमची जोड म्हणजे २६० मिमीपर्यंतचे शूट यावर सहज करता येईल.
 १४ मेगापिक्सेल हे त्याचे आणखी एक वैशिष्टय़. शिवाय या कॅमेऱ्यातील वेगवान प्रक्रियेसाठी ऑलिम्पसने ट्रपिक व्ही हा प्रोसेसर वापरला आहे. हा प्रोसेसर अद्ययावत अशा डीएसएलआर कॅमेऱ्यांमध्येच वापरला जात होता. तो कॉम्पॅक्ट कॅमेऱ्यामध्ये वापरला जाणे हा ऑलिम्पसने घेतलेला महत्त्वाचा निर्णय आहे.
१४ मेगापिक्सेल
व्हीएच-५२० या कॅमेऱ्याचे डिझाइन तर उत्तम आहेच, पण त्याचा उत्तम चित्रणासाठी यात दोन महत्त्वाच्या बाबी वापरण्यात आल्या आहेत. यात १४ मेगापिक्सेल सीमॉस सेन्सर वापरण्यात आला आहे.
आयएचएस तंत्रज्ञान
त्याच वेळेस आयएचएस तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. हे तंत्रज्ञान अतिशय उच्च प्रतीच्या डिजिटल एसएलआर कॅमेऱ्यांमध्ये वापरण्यात येते. ऑलिम्पसने ते आता कॉम्पॅक्ट डिजिटल कॅमेऱ्यामध्ये उपलब्ध करून दिले आहे. आयएचएस तंत्रज्ञानामुळे तुम्हाला जे व जसे हवे तसे चित्रण करणे सहज शक्य होते. कमी प्रकाश असला तरी मग त्याची चिंता तुम्ही करण्याचे कारण राहात नाही. यामुळे कमी प्रकाशात अतिवेगात चित्रण सहज करणे शक्य होते.
सुस्पष्ट चित्रणासाठी स्टॅबिलायझेशन
कमी प्रकाशामध्ये अनेकदा काम करताना पंचाईत होते, कारण एक्स्पोजर अधिक काळासाठी ठेवावे लागते आणि मग ट्रायपॉड सोबत नसेल तर अशा वेळेस हात हलल्याने चित्रण सुस्पष्ट येत नाही. त्यात एकावर एक अशा पद्धतीने प्रतिमा पाहायला मिळतात.
तिहेरी स्टॅबिलायझेशन
तेच दुहेरी-तिहेरी प्रतिमांकन टाळता यावे यासाठी या कॅमेऱ्यामध्ये तिहेरी प्रकारचे स्टॅबिलायझेशन वापरण्यात आले आहे. म्हणजे आजवर अनेक कॅमेऱ्यांमध्ये दुहेरी स्टॅबिलायझेशन वापरण्यात आले आहे. ते म्हणजे कॅमेरा उभा वर- खाली किंवा आडव्या रेषेत आजूबाजूला हलतो, असे गृहीत धरले जाते. पण यात तिसरी बाजू म्हणजेच गोलाकार रेषेतही वर-खाली हलू शकतो, असे गृहीत धरण्यात आले आहे. त्यामुळे या तिहेरी स्टॅबिलायझेशनमुळे अतिशय सुस्पष्ट चित्रण करणे शक्य होते. ऑलिम्पसने यापूर्वी त्यांच्या ओ-एमडी या अतिअद्ययावत कॅमेऱ्यामध्ये हे तंत्रज्ञान वापरले होते. ते प्रथमच कॉम्पॅक्ट कॅमेऱ्यामध्ये वापरण्यात आले आहे.
मूव्ही फॉर्मॅटमध्येही स्टॅबिलायझेशन
 स्थिर चित्रणात स्टॅबिलायझेशनची सोय देणारे काही कॅमेरे आहेतही, पण मूव्ही मोडमध्ये शूट करताना ही सोय देणारे कॉम्पॅक्ट कॅमेरे अभावानेच पाहायला मिळतात. या व्हीएच-५२०चा समावेश ती सोय असणाऱ्या कॅमेऱ्यांमध्ये करावा लागतो. रात्रीच्या वेळेस प्रवास करताना आपण मूव्ही मोड ऑन केल्यानंतर अनेकदा रेकॉर्डिगमध्ये प्रकाशाच्या रेषाच वर-खाली होताना दिसतात. कारण आपण ज्या गाडीमधून प्रवास करत असतो, त्याच्या कंपनांनुसार तो कॅमेरा वर-खाली होतो. त्यामुळे त्या प्रकाशाच्या रेषा दिसतात. अतिशय अद्ययावत अशा मूव्ही कॅमेऱ्यामध्ये मात्र हे टाळले जाणारे तंत्रज्ञान वापरलेले असते. तेच तंत्रज्ञान या कॅमेऱ्यामध्ये ऑलिम्पसने वापरले आहे.
आयऑटो  
अनेकदा फोटो टिपत असतानाचा प्रकाश आदी बाबी पाहिल्यानंतर आपल्याला नेमक्या कोणत्या सेटिंग्जवर ते टिपावेत, त्याचा अंदाज येत नाही आणि मग गोंधळ उडतो. शिवाय तो क्षण निघून जातो, ती गोष्टच वेगळी. हेच टाळले जावे यासाठी ऑलिम्पसने आयऑटो हे सेटिंग दिले आहे. यामध्ये एखाद्या व्यक्ती किंवा वस्तूच्या दिशेने कॅमेरा ठेवल्यानंतर त्याला सुयोग्य असे सेटिंग कॅमेरा स्वत:च निवडतो आणि चांगले चित्रण असलेला परिणाम आपल्याला पाहायला मिळतो.
रात्रीही सुस्पष्ट चित्रण
अनेकदा दिवसा काढलेले फोटोदेखील कमी प्रकाशामुळे हललेल्या अवस्थेत दिसतात. मग रात्रीच्या वेळेस तर विचारूच नका, अशी अवस्था असते. ही गोची दूर करण्याचा प्रयत्न ऑलिम्पसने या कॅमेऱ्याच्या माध्यमातून केला आहे. यातील खास नाइट मोडमध्ये एकाच वेळेस तुमचा हात हलत असतानाही अनेक फोटो टिपले जातात. ते स्वयंचलित पद्धतीने एकमेकांमध्ये मिसळून त्यातून सुस्पष्ट चित्र समोर येते.
१० एक्स ऑप्टिकल झूम
या कॅमेऱ्याला १० एक्स ऑप्टिकल झूमची सोय देण्यात आली आहे. शिवाय त्याला सुपरझूमसाठी २० एक्स सुविधा आहे. म्हणजेच ३५ मिमी कॅमेऱ्याच्या तुलनेत ५२० मिमी झूम लेन्स तुमच्या हाती असल्यासारखीच स्थिती असेल.
फूल एचडी मूव्ही
फूल एचडी मूव्ही  शूट करण्यासाठी एक स्वतंत्र बटन देण्यात आले आहे. त्यासाठी एच.२६४ एमओव्ही फॉरमॅटचा वापर करण्यात आला आहे.
मॅजिक फिल्टर्स
ऑलिम्पसने सुमारे दोन वर्षांपासून त्यांच्या कॉम्पॅक्ट कॅमेरा आणि डिजिटल एसएलआरमध्ये डिजिटल फिल्टर्स देण्यास सुरुवात केली आहे. या फिल्टर्सची मजा या कॅमेऱ्यामध्येही चांगल्या पद्धतीने लुटता येते. त्यात पॉप आर्ट, पिनहोल कॅमेरा, फिश आय, सॉफ्ट फोकस, स्पार्कल, रिफ्लेक्शन, मिनिएचर, ड्रामॅटिक असे पर्याय देण्यात आले आहेत.  
निष्कर्ष
काळा, पांढरा, लाल, जांभळा आणि निळा अशा विविध रंगांमध्ये ही मॉडेल्स उपलब्ध आहेत. याची बॅटरी क्षमताही चांगली आहे. ती दीर्घकाळ चालते, असे वापरादरम्यान लक्षात आले. ऑलिम्पसने त्यांच्या विविध सेटिंग्जच्या माध्यमातून कमी प्रकाशातील चित्रण या कॅमेऱ्यामध्ये अधिक सुधारित करण्याचा प्रयत्न केला आहे. यापूर्वीच्या कॅमेऱ्यांमधील चित्रणापेक्षा ते अधिक सुस्पष्ट भासणारे असे आहे. कमी प्रकाशातील व्हिडीओदेखील चांगल्या पद्धतीने चित्रित करता येतात. ट्रपिक व्हीच्या वापराने कॅमेऱ्याच्या प्रक्रियेचा वेगही वाढलेला दिसतो. सहज सहलीला जाताना अधिक चांगली क्षमता असलेला कॅमेरा हवा असेल, तर हे मॉडेल विकत घ्यायला हरकत नाही. पैसे वसूल असतील.