यंदाच्या दिवाळीमध्ये सर्वाधिक खरेदी ही कपडय़ालत्त्यांपेक्षाही इलेक्ट्रॉनिक उपकरणांची होणार आहे, असा संकेत खरेतर यापूर्वीच मिळाला आहे. त्यासाठी बाजारपेठ अर्थात कंपन्या, ग्राहक सारे जण सज्ज आहेत. त्यासाठी विविध कंपन्यांनी वैविध्यपूर्ण आणि नावीण्य असलेली इलेक्ट्रॉनिक उपकरणे बाजारात आणली आहेत. सर्वाचे लक्ष मात्र काटेकोरपणे बाजारपेठेवर आहे. प्रत्येकाने आपला ग्राहक वर्गही निश्चित केलेला दिसतो आहे. काहींनी स्मार्टफोन वापरण्याची इच्छा राखणारा पण तो न परवडणारा असा वर्ग स्वतसमोर ठेवला आहे. तर काहींनी लॅपटॉप किंवा अल्ट्राबुकच्या वाटेला न जाणारा पण संगीतप्रेमी वर्ग आपल्यासमोर ठेवला आहे. काहींना स्टेटस सिम्बॉल म्हणून काही तरी नवीन घेणारा वर्ग नजरेसमोर ठेवला आहे. कुणाला पक्के ठावूक आहे की, आताचा ग्राहक वर्ग हा स्मार्ट आहे. त्यामुळे त्यांनी क्लिक् अ‍ॅण्ड शेअर तत्त्वावरचा कॅमेरा बाजारात आणला आहे.. एकूण काय तर यंदाची दिवाळी ही अशी ‘गॅझेट दिवाळी’च असणार आहे !