सुमारे दोन वर्षांपूर्वी एचटीसीने गटांगळ्या खाण्यास सुरुवात केली होती. मात्र मध्यंतरीच्या काळात तरुणाईने एचटीसीचे हॅण्डसेट स्वीकारण्यास सुरुवात केली आणि पुन्हा एकदा कंपनीला चांगले दिवस आले. तरुणाईच्या पसंतीस उतरले की मग मोबाइल हॅण्डसेटच्या क्षेत्रातील कंपनी तरते किंवा मग नफ्यात येते. या क्षेत्रात म्हणूनच तरुणाईचे मन राखण्यासाठी सर्व कंपन्या प्रयत्नशील असतात. याशिवाय एक महत्त्वाचा भाग म्हणजे कोणत्या हॅण्डसेटच्या किंवा कंपनीच्या उत्पादनाच्या बाबतीत मार्केटिंग किती चांगले केले जाते यावरदेखील त्या हॅण्डसेटचे किंवा कंपनीचे भवितव्य अवलंबून असते. अलीकडच्या काळात एचटीसी या कंपनीला आलेले चांगले दिवस यात ब्रॅण्डिंग व मार्केटिंगचाही चांगलाच हात आहे. अर्थात तरुणाईच्या पसंतीला तोड नाहीच.
उत्तम वेगवान प्रोसेसर
एचटीसीने बाजारपेठेत आणलेले वन एक्स हे मॉडेल सध्या बाजारात लोकप्रिय आहे. यात एनविडिआ टेग्रा थ्री हा अद्ययावत प्रोसेसर वापरण्यात आला आहे. त्यामुळे हॅण्डसेट अतिशय वेगात काम करतो. किंवा त्यावर एकाच वेळेस अनेक कामेही करणे सहज शक्य होते. या हॅण्डसेटमध्ये १.५ गिगाहर्टझ् सुपर फोर प्लस वन क्वाड कोअर क्षमतेचा प्रोसेसर वापरण्यात
आला असून त्यातच फिफ्थ बॅटरी सेव्हर कोअरचाही वापर करण्यात आला आहे.
चांगला डिस्प्ले
अलीकडच्या काळात मोबाइल विकत घेताना प्राधान्य दिली जाणारी बाब म्हणजे त्याचा डिस्प्ले. या सुपर स्मार्टफोनला ४.७ इंचाचा डिस्प्ले स्क्रीन आहे. त्याची क्षमता ७२० पी एचडी स्क्रीनची आहे. त्यासाठी गोरिला ग्लासचा वापर करण्यात आला आहे. तरुणाईने हा हॅण्डसेट मोठय़ा प्रमाणावर आपलासा केला आहे. त्यामुळे अनेकांच्या हातात पाहायला मिळतो.  
भारतीय बाजारपेठेतील किंमत : रु. २९,५४४ /- पासून पुढे    
एचटीसी डिझायर सी
मोबाइल फोन वापरणाऱ्यांच्याही अनेक पातळ्या असतात. म्हणजे अनेकांची सुरुवात होते ती अगदी साध्या मोबाइलपासून. मग जसजसा त्यांचा अनुभव अधिक चांगला होत जातो आणि सवय होत जाते तसतशी अधिक चांगला फोन घेण्याची त्यांची इच्छा बळावत जाते. मग ते फीचर फोनकडे वळतात. यात अधिक फीचर्स त्यांना पाहायला मिळतात, अनुभवता येतात, वापरता येतात. त्यातील
फीचर्स वापरून अनुभव चांगला आला की, तोपर्यंत वापरकर्त्यांस स्मार्ट फोन वापरण्याची इच्छा निर्माण झालेली असते आणि फीचर फोन कमी पडतो आहे, अशा काहीशा भावना मनात मूळ धरू लागतात. पण स्मार्ट फोनमध्ये देखील अनेक परी अर्थात प्रकार आहेत. मग स्मार्ट फोन नेमका कोणता निवडावा, याबद्दल मनात संभ्रम निर्माण होतो किंवा मनात गोंधळ उडतो. बाजारात स्मार्ट फोन्सची काही कमी नसते आणि इच्छाही सर्वोत्तम गोष्टी वापरण्याचीच असते. पण एकदम सुपरस्मार्ट फोन घेतल्यानंतर उडालेला गोंधळही सामान्य माणसासाठी खूप असतो. म्हणूनच असे म्हणतात की, एक एक पायरी चढत टप्प्याटप्प्याने पुढे जावे. एचटीसीनेही
ग्राहकांची ही मानसिकता लक्षात घेऊन प्रत्येक टप्प्यासाठी वेगवेगळे फोन बाजारात आणले आहेत.
धातूचे बाह्य़ावरण
ज्यांना स्मार्ट फोन वापरण्यास आता सुरुवात करायची आहे अशांसाठी कंपनीने स्मार्ट फोनमधील पहिली पायरी असलेले मॉडेल बाजारात आणले आहे, ते म्हणजे एचटीसी डिझायर सी. महाविद्यालयीन तरुण- तरुणींमध्ये हे मॉडेल अतिशय लोकप्रिय आहे. हा छोटेखानी आणि चांगला असा स्मार्ट फोन आहे. ३.५ एचव्हीजीए स्क्रीन हे त्याचे वैशिष्टय़ आहे. महत्त्वाचे म्हणजे हल्ली बाजारपेठेत आलेल्या अनेक हॅण्डसेटसाठी फायबरची तकलादू फ्रेम वापरण्यात आली आहे. मात्र एचटीसी डिझायर सीसाठी कंपनीने मेटल अर्थात धातूच्या फ्रेमचा वापर केला आहे.
उत्तम बॅटरी क्षमता
या स्मार्ट फोनमध्ये एचटीसी सेन्स ४.० याच्याबरोबरच अँड्रॉइडचे आइस्क्रीम सँडविच हे ४.० ही नवीन आवृत्ती एकत्रित रूपात वापरण्यात आली आहे. त्यामुळे त्याच्या क्षमतेमध्ये अनेक पटींनी वाढ झाली आहे. आकाराने तसा छोटेखानी असला तरी त्याची बॅटरी क्षमता उत्तम असून तो दीर्घकाळ चालणारा आहे. सोबत पाच मेगापिक्सेल कॅमेरा आहेच. याशिवाय बीटस् ऑडिओमुळे आवाजही सुश्राव्य असाच आहे. अलीकडे अनेक स्मार्ट फोन्स तुम्हाला क्लाऊडची सोय देतात. एचटीसीच्या या मॉडेलसोबत तुम्हाला ड्रॉपबॉक्सवर २५ जीबी साठवणूक क्षमतेची सोयही देण्यात आली आहे.
भारतीय बाजारपेठेतील किंमत : रु. ११,३९९/- पासून पुढे