गेल्या वर्षअखेरीस त्या वर्षांतील तंत्रज्ञानाचा आढावा न घेता नव्या वर्षांत येणाऱ्या आणि रुळणाऱ्या तंत्रज्ञानाविषयी ‘टेक-इट’मध्ये माहिती देण्यात आली होती. त्यात असे म्हटले होते की, २०१२ हे अल्ट्राबुक आणि टॅब्लेट यांचे वर्ष असणार आहे. आता हे वर्ष संपण्यास केवळ दीड महिना शिल्लक आहे. यंदाच्या वर्षांचा आढावा घ्यायचा तर आपल्याला सर्वानाच त्या विधानाचा प्रत्यय आता पुरता आला आहे. यंदाच्या वर्षांच्या सुरुवातीसच सर्व महत्त्वाच्या कंपन्यांनी अल्ट्राबुकच्या क्षेत्रात आपापली आघाडी उघडलेली होती. मे महिन्यापर्यंत तर अनेक कंपन्यांची अल्ट्राबुक्स बाजारात स्थिरावलेली ही होती. पण तोपर्यंत गेल्या दोन वर्षांत लोकप्रिय ठरलेल्या सोनीकडून त्यांच्या वायो ब्रॅण्ड मालिकेतील एकही अल्ट्राबुक बाजारात आलेले नव्हते. नाही म्हणायला इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांमध्ये प्रसिद्ध असलेल्या कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शोमध्ये सोनीने त्यांचेही अल्ट्राबुक असणार, याचे संकेत दिले होते. पण त्या वेळेस ते अल्ट्राबुक कुणालाच हाताळता आले नव्हते. कारण ते होते शोकेसमध्ये काचेच्या पलीकडे. गेल्या दोन वर्षांत सोनीचा वायो हा ब्रॅण्ड भारतात चांगलाच लोकप्रिय झाला आहे. कधी की बोर्ड तर कधी ट्रॅकपॅड असे काहीसे नाराज करणारे घटक होते. पण बाजारपेठेने मात्र त्याला चांगला प्रतिसाद दिला होता. खासकरून तरुणांमध्ये सोनी वायोची क्रेझच आल्यासारखी स्थिती होती. त्यामुळे आता हाच तरुण ग्राहकवर्ग नजरेसमोर ठेवून सोनी वायो मालिकेत अल्ट्राबुक बाजारात आणणार ही अपेक्षा होतीच.
टी मालिकेतील अल्ट्राबुक
अर्थात झालेही तसेच. सोनीने अलीकडे त्यांची टी मालिका बाजारात आणली असून ही अल्ट्राबुकची मालिका आहे. सुरुवातीचा काही काळ त्यावरून एक छोटेखानी वादही झाला. कारण कमी किमतीतील अल्ट्राबुक बाजारात आणण्यासाठी सोनीने सँडी ब्रीज प्रोसेसरचा वापर केला होता. मात्र नंतर आयव्ही ब्रीज प्रोसेसर असलेली अल्ट्राबुक्सही सोनीने बाजारात आणली. त्यात असलेल्या चांगल्या जुळणीनंतर त्या वादावर पडदा पडला.
एअरबुकसारखा लूक
या नव्या मालिकेतील ‘सोनी वायो टी ११ (अल्ट्राबुक) एसव्हीटी ११११३ एफजी/एस’ हे मॉडेल सोनीने ‘लोकसत्ता-टेक इट’कडे रिव्ह्य़ूसाठी पाठविले होते. अल्ट्राबुकच्या क्षेत्रातील सोनीचा प्रवेश हा असा काहीसा विलंबानेच झालेला असला तरी सोनीचा प्रवेश हा काहीसा झोकदारही झाल्याचे या मॉडेलकडे पाहून लक्षात येते. या नव्या टी मालिकेतील अल्ट्राबुक्सचा लूक हा काहीसा अ‍ॅपल मॅक एअरबुकसारखा आहे. एअरबुकचे देखणेपण निर्विवाद आहे. तसाच लूक ठेवण्याचा सोनीचा प्रयत्न दिसतो.
वजन केवळ १.४२ किलोग्रॅम्स
११.६ इंचांचा स्क्रीन हे त्याचे वैशिष्टय़ असून त्याचे रिझोल्युशन फूल एचडी नसले तरी १३६६ गुणिले ७६८ असे आहे. सध्या बाजारात आलेल्या कमी किमतीच्या अल्ट्राबुक्समध्ये हेच रिझोल्युशन वापरण्यात आले आहे. स्क्रीनसाठी टीएफटी डिस्प्लेचा वापर करण्यात आला आहे. अल्ट्राबुकचा आकार २९७.० गुणिले १७.८ गुणिले २१४.५ मिमी. असा आहे. त्याचे वजन १.४२ किलोग्रॅम्स एवढेच आहे.
सिल्व्हर डिझाइन
सोनी वायोचे हे अल्ट्राबुक सिल्व्हर डिझाइन असलेले आहे. राहता राहून त्याचे देखणेपण हे एअरबुकच्याच जवळ जाणारे वाटत राहते. शार्प फिनिश, अ‍ॅल्युमिनीअम व मॅग्नेशिअम संयुगापासून तयार केलेले खास बाह्य़ावरण अशी त्याची रचना आहे. बाह्य़ावरणाचा भाग मॅट पद्धतीचा असून त्यामुळेच तो काळजीपूर्वक दक्षतेने न वापरता कसाही वापरला तरी त्या हाताळणीसाठीही तो सुयोग्य असल्याचा फिल आपल्याला देतो.
आय ५ प्रोसेसर
कोणत्याही यंत्रणेचा आत्मा असतो तो म्हणजे प्रोसेसर. हा प्रोसेसरच त्याचा वेग आणि कार्यक्षमता हे सारे काही निर्धारित करत असतो. या अल्ट्राबुकसाठी इंटेल कोअर आय ५-३३१७ यू हा १.७० गिगाहर्टझ्चा टबरे बूस्ट असलेला प्रोसेसर वापरण्यात आला असून टबरे मोडमध्ये त्याची क्षमता २.६० गिगाहर्टझ्पर्यंत विस्तारते. ग्राफिक्ससाठी एचडी ४०००चा वापर करण्यात आला आहे. ४ जीबी रॅम आणि ऑपरेटिंग सिस्टीम विंडोज सेव्हन प्रोफेशनल अशी सोय त्यात देण्यात आली आहे.
५०० जीबी हार्डडिस्क
यासोबत देण्यात आलेल्या हार्डडिस्कची क्षमता ५०० जीबींची आहे. अल्ट्राबुकच्या डाव्या बाजूस दोन यूएसबी पोर्टस् देण्यात आले आहेत. त्यातील एक वेगवान यूएसबी ३.० आहे, तर उजवीकडे व्हीजीए पॉइंट, एचडीएमआय पोर्ट, इथरनेट पोर्ट आणि ३.५ मीमी हेडफोन व स्पीकर जॅक यांची सुविधा देण्यात आली आहे. टीव्ही टय़ूनर कार्डचा मात्र त्यात समावेश नाही. मात्र मल्टिमीडिया कार्डरीडरचा समावेश यात आहे. त्यामुळे कॅमेऱ्यावर टिपलेली छायाचित्रे किंवा व्हिडीओ पटकन डाऊनलोड करता येणे सोयीचे झाले आहे.
कनेक्टिव्हिटी
वाय-फाय आणि ब्लूटूथ ही दोन्ही कनेक्टिव्हिटीची महत्त्वाची माध्यमे आहेत. ब्लूटूथ ४.० या आवृत्तीचा वापर करण्यात आला आहे, तर वाय-फाय इंटरफेस हा आयट्रीपलइ ८०२.११ हा आहे.
एचडी कॅमेरा व एक्समॉर सेन्सर
या अल्ट्राबुकचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे बिल्ट इन १.३ मेगा पिक्सेलचा कॅमेरा. महत्त्वाचे म्हणजे सोनीने त्यासाठी त्यांच्या मोठय़ा डिजिटल कॅमेऱ्यामध्ये वापरण्यात येणारा एक्समॉर सेन्सर वापरला आहे. त्या सेन्सरमुळे चित्रामधील सुस्पष्टता अधिक वाढते आणि रंग अधिक चांगल्या पद्धतीने टिपले जातात.
क्विक रिस्पॉन्स
सध्या बाजारात असलेल्या सर्वच अल्ट्राबुक्सच्या जाहिराती पाहिल्या तर असे लक्षात येईल की, या जाहिरातींमध्ये सर्वाधिक  भर देण्यात आला आहे तो क्विक रिस्पॉन्स या महत्त्वाच्या तंत्रज्ञानावर. इतर कोणताही लॅपटॉप तुम्ही त्याचा स्क्रीन खाली करून ठेवल्यानंतर स्लीप मोडमध्ये जातो. आणि नंतर पुन्हा स्क्रीन वरती केल्यानंतर झोपेतून जागा झाल्याप्रमाणे तो सुरू होतो. पण यामध्ये मिनिटभराचा अवधी जातो. अल्ट्राबुकचे वैशिष्टय़ म्हणजे तो काही सेकंदांमध्ये पुन्हा व्यवस्थित सुरू होतो. त्याला क्विक रिस्पॉन्ससाठी लागणारा कालावधी अतिशय कमी आहे. सोनीच्या या अल्ट्राबुकमध्येही हाच प्रत्यय येतो. इंटेल स्मार्ट रिस्पॉन्स टेक्नॉलॉजी व सोनीचे रॅपिड वेक या दोन्हीमुळे हा कालावधी चांगलाच कमी करण्यात सोनीला यश आले आहे.
उत्तम साऊंड व व्हिडीओ
साऊंड आणि व्हिडीओ ही दोन्ही सोनीच्या उत्पादनांची खास वैशिष्टय़े आहेत. त्याचा प्रत्यय या अल्ट्राबुकमध्येही येतो. मात्र याचा स्क्रीन अनेकदा त्यावर पडणाऱ्या प्रतिबिंबामुळे आपला काही वेळेस हिरमोड करतो. मात्र या अल्ट्राबुकवर स्लाइड शो पाहताना किंवा चित्रपट पाहताना इतर कोणताही अडथळा येत नाही. याच्या ऑडिओ जॅकबाबत मात्र काही तक्रारी आहेत.
घरगुती वापर
बहुतांश करून अलीकडे अल्ट्राबुक्सचा वापर दोन कारणांसाठी केला जातो. पहिला म्हणजे घरगुती किंवा दुसरा कार्यालयीन किंवा व्यावसायिक कामांसाठी. घरगुतीमध्येही प्राथमिक वापर हा सोशल नेटवर्किंग आणि मायक्रोसॉफ्ट ऑफिसचा वापर करण्यासाठी केला जातो. कॉलेजमधील विद्यार्थ्यांसाठी तो चांगला ठरू शकतो. त्यांच्या गरजा अधिक नसतात. बाहेर असताना म्हणजेच ऑन द गो चांगल्या पद्धतीने वापरता येणे हे या अल्ट्राबुक्सचे वैशिष्टय़ आहे. शिवाय एकाच वेळेस अनेक फाइल्स उघडून काम करतानाही यावर त्रास होत नाही किंवा कामात कोणताही अडथळा येत नाही वा त्याच्या वेगावरही त्याचा परिणाम होत नाही.
वायो गेटचा अडसर
वायो गेट टूलबार हे वायो या सोनीच्या ब्रॅण्डचे वैशिष्टय़ आहे. या टूलबारमध्ये अनेक गोष्टी प्री-लोडेड स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतात. त्यावर वरच्या बाजूस जरा जरी कर्सर गेला तरी थेट वायो गेट समोर दिसू लागते आणि हा प्रकार काम करताना अडथळ्याप्रमाणे वाटू शकतो. शिवाय अनेक अनावश्यक बाबींचा भरणाही या वायो गेटमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे त्यातील अनावश्यक बाबी अन-इन्स्टॉल करणे महत्त्वाचे ठरते.
वायोचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे असिस्ट, वेब वायो हे प्रीसेट शॉर्टकटस् या अल्ट्राबुकमध्येही आहेतच.
की बोर्ड व ट्रॅकपॅड
की बोर्डचा लूकदेखील मॅकबुकप्रमाणेच आहे. मात्र निराश करणारी गोष्ट म्हणजे सोनीच्या लेटेस्ट उत्पादनांमध्ये की बोर्ड हा बॅकलाइट असलेला आहे तशी सोय अल्ट्राबुकमध्ये नाही. ट्रॅकपॅड ही सोनी वायोची जुनी समस्या आहे. पण ती सोडविण्यात अल्ट्राबुकमध्ये यश आले आहे. हे ट्रॅकपॅड मल्टिटच असून आकारानेही नेहमीपेक्षा थोडे मोठे आहे.
बॅटरी
या अल्ट्राबुकच्या बॅटरीची क्षमता ही तब्बल चार तास उत्तम काम करण्याची आहे.
निष्कर्ष
बाजारपेठेतील कमी किंमत हे सोनीच्या या अल्ट्राबुकचे वैशिष्टय़ आहे, जे जपताना अनेक बाबींमध्ये सोनीला तडजोड करावी लागली आहे. त्यामुळे हाय-एण्ड ग्राफिक्सचे काम किंवा काही विशिष्ट प्रकारे अतिक्षमतेचे व्यावसायिक काम करताना यावर अडचणी येतात. त्यामुळे असे काम यावर करता येणार नाही. मात्र असे असले तरी घरगुती वापरासाठी हे अल्ट्राबुक योग्य ठरू शकते. कारण घरगुती वापरासाठीची कामे त्यावर व्यवस्थित होतात.
भारतीय बाजारपेठेतील किंमत : रु. ४९,६७८/-

विनायक परब

vinayak.parab@expressindia.com