दिवाळीच्या सुट्टय़ांमध्ये लांबपल्ल्याच्या प्रवासाचे नियोजन झाले असेलच. कधी एकदा परीक्षा संपतेय आणि तयारीला लागतोय असे झाले असेल. प्रवासाची तयारी करताना आपली काळजी घेण्यासाठी जशा आपण अनेक वस्तू घेतो, तशाच वस्तू आपल्या लाडक्या गॅजेट्सच्या काळजीसाठीही घ्याव्यात. तसचे अनेक असे गॅजेट्स आहेत जे आपल्याला खरोखरच प्रवसात उपयुक्त ठरू शकतात. पाहुयात अशाच काही गॅजेट्सविषयी.

पॉवर बँक
प्रवासाला जाताना माणसी किमान एक असा मोबाइल आपल्यासोबत असतोच. यामुळे हा फोन सतत चार्ज राहण्यासाठी पॉवर बँक घेण्यास अजिबात विसरू नका. बसमध्ये किंवा ट्रेनमध्ये मोबाइल चार्जिगसाठी सॉकेट दिलेले असतात, मात्र ते पुरेसे नसल्यामुळे आपला नंबर येईपर्यंत वाट पाहावी लागते. यामुळेच जर तुम्ही पॉवर बँक सोबत ठेवली तर तुम्हाला तुमची उपकरणे बसल्या जागेवर चार्ज करणे शक्य होणार आहे. पॉवर बँकेची खरेदी करत असताना जास्तीत जास्त एमएएचची बँक खरेदी करावी, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त उपकरणे चार्ज करणे शक्य होईल. सध्या बाजारात १५०० एमएएचपासून ते २० हजार एमएएचची क्षमता असलेली पॉवर बँक उपलब्ध आहेत.

ई-बुक रीडर
लांब पल्ल्याचा प्रवास असेल तर प्रवासात वेळ घालवण्यासाठी तसे अनेक पर्याय असतात. यामध्ये पत्ते, अंताक्षरी खेळण्यापासून अनेक पर्यायांचा समावेश आहे. पण अनेकदा त्याचाही कंटाळा येतो. अशा वेळी पुस्तकांची मदत होऊ शकते. तुम्हाला बॅगमध्ये पुस्तके घेऊन जाणे अवघड होत असेल तर तुम्ही किंडलसारखे ई-बुक रीडर सोबत नेऊ शकता. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीची पुस्तके डाऊनलोड करून ठेवलीत की, तुम्हाला पाहिजे तेव्हा पुस्तके वाचता येऊ शकतील. ई-बुक रीडरसाठी तुमच्याकडे किंडलसोबतच आयपॅड तसेच स्मार्टफोनमधील ई-बुक अ‍ॅपचे पर्यायही उपलब्ध आहेत. या अ‍ॅपच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या फोनवर ई-बुक वाचू शकता.

सेल्फी स्टिक
तरुणाईमध्ये सेल्फीबाबत प्रचंड आकर्षण आहे. यामुळे बहुतांश लोकांकडे फ्रंट कॅमेरा किमान पाच मेगापिक्सेलचा तरी असतोच. जर तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणासह सेल्फी काढावयाचा असेल तर ही स्टिक नक्कीच तुम्हाला उपयोगी पडू शकते. याचबरोबर तुमचा ग्रुप फोटो काढावयाचा असेल तर अनेकदा आपण सोबत असलेल्या दुसऱ्या ग्रुपच्या व्यक्तींना किंवा गाइड अथवा चालकांना फोटो काढण्याची विनंती करतो. मात्र त्यांच्याकडून आपल्या मनाजोगा फोटो येईलच असे नाही. यामुळे अशा वेळीही ही सेल्फी स्टिक आपली मदत करू शकते. बाजारात अगदी ५९९ रुपयांपासून अशा सेल्फी स्टिक उपलब्ध आहेत.

वाय-फाय राऊटर
इंटरनेट ही सध्याच्या तरुणाईची गरज बनली आहे, पण रोिमगमध्ये असताना नेटपॅक रिचार्ज करणे अनेकदा परवडतेच असे नाही. अनेक ठिकाणच्या हॉटेलमध्ये वायरनेटचा अ‍ॅक्सेस अनेकदा मोफत दिला जातो, पण वायफायसाठी दर आकारले जातात. यामुळे जर वायफाय वापरायचे असेल तर तुम्हाला अतिरिक्त पसे मोजावे लागतात. यामुळे जर तुम्ही फिरते वाय-फाय राऊटर घेऊन गेलात तर तुम्ही हॉटेलमधील इंटरनेट जोडणीला राऊटर लावून तुमच्या खोलीपुरते वाय-फाय सुरू करून घेऊ शकता. यामध्ये नॅनो राऊटर्सही मिळतात. जे तुम्हाला प्रवासात घेऊन जाणे सोपे पडते. याच्या माध्यमातून तुम्हाला १५० एमबीपीएसपर्यंतचा वेग मिळू शकतो. तसेच एअरटेलसारख्या कंपनीने वाय-फायसाठी ‘माय-फाय’ उपकरण बाजारात आणले आहे. या उपकरणाच्या माध्यमातून आपण एअरटेलचे फोरजी नेट असलेले कार्ड घेतले की एकाच वेळी चार ते पाच फोन यावर आपण जोडू शकतो. तसेच फोरजी नेट संपल्यावर टूजीनेट अनलिमिटेड देणाऱ्या ऑफर्सही कंपनीकडून देण्यात आल्या आहेत. यामुळे याही एका पर्यायाचा तुम्ही विचार करू शकता.

युनिव्हर्सल अ‍ॅडप्टर
तुम्ही सतत प्रवास करत असाल आणि तुम्हाला लॅपटॉप किंवा टॅबलेट चार्ज करायची गरज पडत असेल तर तुम्ही युनिव्हर्सल अ‍ॅडप्टर बाळगणे फायद्याचे ठरले. या अ‍ॅडप्टरमध्ये यूएसबी पोर्टही देण्यात आला आहे. ज्याचा वापर करून तुम्ही तुमची उपकरणे चार्ज करू शकता. याचबरोबर थ्री-पिन प्लगही देण्यात आला आहे. यामुळे ज्या उपकरणांना प्लग आहेत ती उपकरणेही तुम्ही चार्ज करू शकता. या प्रकारचा अगदी साधा अ‍ॅडप्टर ३०० रुपयांपासून उपलब्ध आहे.

मनोरंजनाची साथ
प्रेक्षणीय स्थळांना भेट देण्यासाठी हॉटेलपासून खूप लांब प्रवास करावा लागतो. या प्रवासात आपल्याला अनेकदा कंटाळा येतो. यामुळे पुस्तक वाचण्यापासून ते गाणी ऐकण्यापर्यंतचे अनेक पर्याय तुमच्यासमोर असतात. जर तुम्हाला पुस्तके वाचूनही कंटाळा आला तर तुम्ही आयपॅड, एमपीथ्री प्लेअरसोबत घेतला तर गाणी ऐकू शकता. तसे पाहता मोबाइलमध्ये गाणी असतातच, पण प्रवासात असताना मोबाइलची बॅटरी कमीत कमी खर्च होणे योग्य असते. यामुळे या उपकरणांचा वापर करून तुम्ही गाणी ऐकू शकतात. इतकेच नव्हे तर तुम्हाला टीव्ही पाहायचा असेल तर अ‍ॅपल टीव्हीसारख्या अ‍ॅपच्या माध्यमातून तुम्ही टीव्हीही पाहू शकता. अ‍ॅपल टीव्ही हा केवळ आयओएसधारकांसाठीच मर्यादित आहे असे नाही, तर प्ले स्टोअरवरही हे अ‍ॅप उपलब्ध आहे. याचबरोबर एका वेळी एकाच्याच मोबाइलची बॅटरी खर्च करावयाची असेल तर तुम्ही छोटा पोर्टेबल स्पीकरही सोबत नेऊ शकता. जेणेकरून तुम्ही गाडीत किंवा चालत असताना गाण्यांचा अस्वाद घेऊ शकता.
– नीरज पंडित
niraj.pandit@expressindia.com