सध्या पॉवर बँक ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. बाजारात विविध कंपन्यांच्या विविध प्रकारच्या पॉवर बँक्स उपलब्ध आहेत. यात अनेकदा आपली फसगतही होते. यामुळे पॉवर बँक घेताना नेमक्या कोणत्या गोष्टींचा विचार करावा. याबाबत पुनीत गुप्ता यांनी लिहिलेला लेख.
आपल्या रोजच्या वापरात टॅब्लेट्स, स्मार्टफोन्स अशी अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे असतात; पण त्यांच्यामध्ये दिवसभर पुरेल इतकी बॅटरी नसते. ऑफिसच्या कामानिमित्त घराबाहेर असताना बॅटरी संपल्यास बॅटरी रिचार्ज करण्याकरिता पॉवर बँक ही पोर्टेबल उपाययोजना ठरू शकते. बाजारात अनेक ब्रँड्सच्या निरनिराळ्या पॉवर बँक्स उपलब्ध आहेत. त्यामुळे कोणती पॉवर बँक खरेदी करावी, याचा निर्णय घेताना ग्राहक गोंधळणे साहजिक आहे. खरेदी करण्याकरिता सर्वोत्तम पॉवर बँक कोणती याचे कोणते तरी एक उत्तर देणे कठीण आहे, कारण प्रत्येक वापरकर्ता निरनिराळी इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरत असल्याने प्रत्येक वापरकर्त्यांच्या गरजा वेगळ्या असतात. पण पॉवर बँक खरेदी करताना खालील गोष्टी जरूर ध्यानात ठेवता येतील.
पॉवर बँकची क्षमता मिलि-अ‍ॅम्प-अवर्स (एमएएच)मध्ये असते. प्रत्येक उपकरणातील बॅटरीची क्षमता वेगळी असते आणि ती उपकरणासोबत आलेल्या माहिती पुस्तिकेमध्ये किंवा बॅटरीवर नमूद केलेली असते. उदा. सॅमसंग गॅलक्सी एस४च्या बॅटरीची क्षमता २६०० एमएएच आहे, तर आयफोन ५ची क्षमता १४४० एमएएच आहे.
पॉवर बँकचे आऊटपूट १ ए किंवा २.० एमध्ये उपलब्ध असते. हा ‘ए’ (अ‍ॅम्प) जितका जास्त असतो तितक्या लवकर आपले उपकरण रिचार्ज होते. टॅब्लेट्सकरिता किंवा तुम्ही एकाच वेळी दोन उपकरणांचे चाìजग करत असाल तर, २.० ‘ए’ आऊटपूट असलेल्या पॉवर बँकला प्राधान्य द्या. यूएसबी पोर्ट्सच्या संख्येवरून तुम्ही एका वेळी किती उपकरणे चार्ज करू शकता हे ठरत असते. तुम्ही स्मार्टफोनसह अजून एखादे इलेक्ट्रॉनिक उपकरण नियमितपणे वापरत असाल आणि त्याला वारंवार चार्ज करण्याची गरज भासत असेल किंवा अनेक लोक एकच पॉवर बँक वापरणार असतील तर डय़ुएल पोर्ट पॉवर बँक अतिशय सोयीची ठरते.
सर्वात शेवटी सेलच्या प्रकारावर लक्ष द्या. पॉवर बँकमध्ये लिथियम आयन किंवा लिथियम पॉलिमर सेल असतो. लिथियम आयन सेल अतिशय स्वस्त असतो आणि तो बाजारात सहजपणे मिळतो. लिथियम पॉलिमर सेल महाग असतो, पण तो वजनाच्या प्रत्येक युनिटमागे दुप्पट चार्ज डेन्सिटी देतो. तुमचा फोन आणि पॉवर बँक जोडण्याकरिता नेहमी मूळ कनेक्टरचा वापर करावा. पॉवर बँकचे वापरकत्रे या बाबीकडे सर्रास दुर्लक्ष करतात. पॉवर बँकचा मूल कनेक्टर न वापरल्यास शॉर्ट सट होण्याचा संभव असतो. पॉवर बँकचा मूळ कनेक्टर वापरणे अधिक सुरक्षित असते, कारण त्यातून मिळणारे आऊटपूट अधिक स्थिर असते.
तुम्ही पॉवर बँक खरेदी करणार असाल तर एखाद्या चांगल्या ब्रँडची पॉवर बँक खरेदी करा. अनेकदा रस्त्यावरही पॉवर बँक विक्रीस ठेवलेल्या दिसून येतात. त्यावर पॉवर बँकची एमएएच क्षमता किंवा किती विद्युत प्रवाह ओढला जातो ही माहिती दिलेली नसते. या पॉवर बँक्स जास्त वापराने तापून फुटण्याचा धोका असतो. अधिक सुरक्षा आणि उत्तम कामगिरीकरिता, ओव्हर व्होल्टेज प्रोटेक्शन (ओव्हीपी), ओव्हर चार्ज प्रोटेक्शन (ओसीपी) आणि ओव्हर टेम्परेचर प्रोटेक्शन (ओटीपी)ने युक्त मॉडेलची निवड करा. त्यामुळे विद्युत प्रवाह कमी-जास्त झाला तरी पॉवर बँकला नुकसान पोहोचत नाही, तसेच चाìजगदरम्यान पॉवर बँक जास्त तापण्यास व डिस्चार्ज होण्यास प्रतिबंध केला जातो. तुम्हाला पोर्टेबल पॉवर बँक खरेदी करायची असेल, तर स्वस्त पॉवर बँक खरेदी करूच नका. मध्यम ते उच्च रेंजमधील पॉवर बँक खरेदी केल्यास तुम्हाला दर्जाबाबतही तडजोड करावी लागणार नाही.
याही गोष्टी लक्षात ठेवा
* एलईडी इंडिकेटर असलेली पॉवर बँक खरेदी करा. त्यामुळे तुमच्या पॉवर बँकचे चाìजग लवकर उतरत असल्याचे समजू शकेल आणि त्याबाबतीत उपाययोजना करता येईल.
* तुम्ही खरेदी करत असलेल्या पॉवर बँकला एफसीसी, सीई, आरओएचएस ही प्रमाणने लाभलेली आहेत हे पाहा. ही प्रमाणने उत्पादनाच्या खरेपणाचे द्योतक असते.
* तुम्ही ज्या ब्रँडची पॉवर बँक खरेदी करणार आहात त्या ब्रँडची विक्रीपश्चात सेवा कशी आहे, ते पाहा. पॉवर बँकला विक्रीपश्चात सेवा पुरवणारे ब्रँड फार कमी आहेत.
* चाìजग करून पॉवर बँक तापल्यास कनेक्टर पॉवर बँकमधून काढून बाजूला ठेवा.
(लेखक – सॅन्टोक इंडियाच्या भारत व सार्क विभागाचे प्रमुख आहेत.)