आपण मोबाइलवर खेळ खेळत असताना अचानक जाहिरात येते. खेळ खेळण्याच्या नादात अचानकपणे जाहिरातींवर क्लिक होते आणि आपला डेटा नाहक खर्च होतो आणि वेळही वाया जातो. पण जर तुम्हाला जाहिरातमुक्त खेळ खेळायचे असतील तर एअरटेलने नुकताच एक पर्याय खुला करून दिला आहे. विंक म्युझिक, विंक मुव्हिज याप्रमाणेच एअरटेलने विंक गेम्स हे अ‍ॅप बाजारात आणले आहे. पाहुयात कसे आहे हे अ‍ॅप.

दोन हजारांपेक्षा जास्त गेम असलेले हे अ‍ॅप सध्या बिटा स्वरूपात उपलब्ध आहे. लवकरच ते अ‍ॅप बाजारात पूर्णपणे उपलब्ध होणार आहे. हे अ‍ॅप एअरटेलधारकांसाठी मोफत उपलब्ध असून इतर मोबाइल सेवा घेणाऱ्या ग्राहकांना दरमाह २९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

गुगल प्ले स्टोअर असताना हे अ‍ॅप का? असा प्रश्न अ‍ॅपविषयी ऐकल्यावर पडतो. पण हे अ‍ॅप पाहिल्यावर त्याची उपयुक्तता नक्कीच जाणवते. या अ‍ॅपचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यामध्ये आपल्याला केवळ गेम्सचेच अ‍ॅप्स उपलब्ध असतात. गुगल प्लेवर आपल्याला विविध प्रकारचे अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. त्या सर्व अ‍ॅप्समधून आपण आपल्याला माहिती असलेले अ‍ॅप्सच डाऊनलोड करत असतो. गेम्स या विभागात गेलो तरी तेथे आपल्याला काही ठरावीक गेम्स वरच्या बाजूला दिसतात. यामुळे तेथे आपल्याला उपयुक्त किंवा आवडू शकणारा गेम असू  शकतो याबाबत आपण फारसा विचार करत नाही. हा विचार आपण विंक गेम्समध्ये करू शकतो. या अ‍ॅपमध्ये गेम्स शोधणे सोपे असून यासाठी अ‍ॅपमध्ये अ‍ॅक्शन, अ‍ॅडव्हेंचर, कार्ड, क्रिकेट, शिक्षण, लहानमुले असे विविध गट करण्यात आले आहेत. यापैकी आपल्याला पाहिजे त्या गटात जाऊन आपण तेथे आपला आवडीचा गेम डाऊनलोड करून घेऊ शकतो.

या अ‍ॅपमधील गेम्स हे काँप्रेस करण्यात आलेले आहेत. यामुळे हे गेम्स प्ले स्टोअरच्या तुलनेत कमी एमबीमध्ये उपलब्ध असतात. याचबरोबर प्ले स्टोअरवर पैसे देऊन उपलब्ध असलेले गेम्स विंक गेम्समध्ये मोफत उपलब्ध आहेत. यामुळे येथे आपल्याला सर्व गेम्स मोफत आणि जाहितरातमुक्त खेळावयास मिळतात. याचे उदाहरण घ्यायचेच झालेच तर रिअल स्टिल हा गेम प्ले स्टोअरवर १० रुपयांना उपलब्ध असून तो ३४१एमबीचा आहे. हाच गेम विंक गेम्सवर मोफत उपलब्ध असून तो २०.३८ एमबी इतकाच आहे. आपण एकदा का हे अ‍ॅप डाऊनलोड केले की आपण आपल्याला पाहिजे तेवढे गेम्स डाऊनलोड करू शकतो. विंक अ‍ॅपने खेळांचा हा संग्रह मिळवण्यासाठी प्लेफोनशी सहकार्य केले आहे. याचा फायदा ग्राहकांबरोबरच गेम विकासकांनाही होतो. यामध्ये एखादा गेम अद्ययावत केला की प्लेफोन ज्या देशांमध्ये उपलब्ध आहे तेथे तुमचा गेम पोहचू शकतो. तसेच ग्राहकांनाही इतर देशांतील गेम्स यामध्ये उपलब्ध होऊ शकतात. यामुळे प्ले स्टोअरपेक्षाही खूप वेगळे गेम्स या अ‍ॅपमध्ये आपल्याला मिळू शकतात.

अ‍ॅप कुठे उपलब्ध – हे अ‍ॅप सध्या http://wynk.in  वर उपलब्ध आहे. अ‍ॅपसाठी लागणारी साठवणूक क्षमता – अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी १० एमबी

– नीरज पंडित

niraj.pandit@expressindia.com