स्मार्टफोनच्या निर्मितीक्षेत्रासाठी भारत ही मोठी बाजारपेठ आहे, हे एव्हाना पुरेपूर सिद्ध झाले आहे. दररोज शेकडोच्या संख्येने मोबाइल वापरकर्त्यांमध्ये भर पडत असताना स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्याही लक्षणीयरीत्या वाढत चालली आहे. त्यातच इंटरनेटने आपली व्याप्ती सर्वदूर पसरवल्याने गावखेडय़ांतही स्मार्टफोनवरून इंटरनेटचा वापर सहजशक्य होऊ लागला आहे. अशा अनुकूल वातावरणात गरज आहे ती सर्वसामान्यांना परवडणाऱ्या आणि त्याच वेळी त्यांना तंत्रज्ञानाच्या उच्च क्षमतेची चुणूक दाखवणाऱ्या स्मार्टफोनची. खिशाला परवडेल अशा किमतीत तंत्रज्ञान हातात खेळत असेल तर ते कुणाला नको आहे?

नेमका हाच विचार करून ‘कूलपॅड’ या कंपनीने भारतीय बाजारपेठेत शिरकाव केला आहे. सुमारे २३ वर्षांपूर्वी चीनमध्ये स्थापन झालेली ही कंपनी दरवर्षी सरासरी ८५ प्रकारांचे मोबाइल निर्माण करते. अन्य चिनी कंपन्यांप्रमाणे ‘कूलपॅड’नेही गेल्या काही वर्षांत आंतरराष्ट्रीय बाजारात आपले स्थान निर्माण केले आहे. भारतात अलीकडच्या काळात स्मार्टफोनच्या उपभोक्त्यांची संख्या वाढू लागल्यानंतर ‘कूलपॅड’ने आपला मोर्चा तरुणाईचा चढता टक्का असलेल्या भारतीय बाजारपेठेकडे वळवला आणि आता या कंपनीने ‘मेक इन इंडिया’ या संकल्पनेतून भारतातच स्मार्टफोनचे उत्पादन करण्याचा निर्णय घेतला आहे. यातूनच ‘कूलपॅड नोट ३ लाइट’ हा पहिलावहिला ‘मेड इन इंडिया’ स्मार्टफोन कंपनीने भारतात आणला आहे. महाराष्ट्रातील औरंगाबाद येथील ‘व्हिडीओकॉन’च्या कारखान्यातून जन्मलेला ‘कूलपॅड नोट ३ लाइट’ हा स्मार्टफोन नावाप्रमाणेच ‘कूल’ आहे. याच्या वैशिष्टय़ांवर (पाहा चौकट) नजर टाकल्यानंतर हा स्मार्टफोन उच्च नाही तर किमान मध्यम श्रेणीतील फोन असावा अशी शंका येते. मात्र, प्रत्यक्षात हा स्मार्टफोन अ‍ॅमेझॉन या ईकॉमर्स संकेतस्थळावर अवघ्या ६९९९ रुपयांना विकला जात आहे. अर्थात वैशिष्टय़ांच्या यादीवर भुलून निर्णय घेता येत नाही. म्हणूनच प्रत्यक्षात वापरताना हा स्मार्टफोन कितपत ‘कूल’ आहे, हे सांगण्याचा प्रयत्न पुढे केला आहे.

‘लुक’:

‘कूलपॅड नोट ३ लाइट’च्या दिसण्याचा विचार केल्यास हा स्मार्टफोन बाजारातील सध्या उपलब्ध असलेल्या ‘बजेट’ स्मार्टफोनसारखाच आहे. मात्र, फोनच्या काठावर असलेली सोनेरी किनार आणि स्मार्टफोनच्या रुंदीएवढी व्यापलेली ‘स्क्रीन’ यामुळे चारचौघांत हा स्मार्टफोन उठून दिसतो. स्मार्टफोनच्या बॉडीसाठी प्लास्टिकचा वापर करण्यात आला आहे. मात्र, ते मजबूत असल्याचे दिसते. स्मार्टफोनच्या दर्शनी भागात स्क्रीनखाली अन्य फोनसारखी ती टचबटणे देण्यात आली आहेत. त्यातील डावीकडील बटण ‘रिसेन्ट अ‍ॅप’ आणि होम स्क्रीनवर असताना ‘थिम सेटिंग’साठी उपयोगात येते. मधले बटण ‘गुगल सर्च’ सुरू करण्यासाठीचा ‘शॉर्टकट’ आहे. तर त्याच्या शेजारी ‘बॅक’ बटण आहे. मागील बाजूस कॅमेरा आणि ‘फिंगर प्रिंट स्कॅनर’ पुरवण्यात आला आहे. स्मार्टफोनच्या उजव्या बाजूला ‘व्हॉल्यूम’ची बटणे तर डाव्या बाजूला ‘लॉक’ बटण आहे. डोक्याकडील भागात ३.५ एमएमच्या हेडफोनच्या पिनसाठी ‘सॉकेट’ देण्यात आला असून खालील बाजूस बॅटरी चार्जिगसाठी ‘सॉकेट’ आहे. दिसण्याच्या बाबतीत हा स्मार्टफोन अतिशय देखणा नसला तरी पांढऱ्या रंगाच्या स्क्रीनला सोनेरी रंगाची किनार असल्याने तो उठून दिसतो. सुमारे १४० ग्रॅम वजनामुळे स्मार्टफोन हलका आणि हाताला सहज हाताळता येण्यासारखा आहे.

डिस्प्ले :

‘कूलपॅड नोट ३ लाइट’ला पाच इंची आकाराची एचडी स्क्रीन आहे. ७२० बाय १२८० पिक्सेल रेझोल्युशन असल्याने ‘डिस्प्ले’ चांगला आहे. मात्र, यूटय़ूबवर व्हिडीओ पाहताना ‘एचडी’सारखा अनुभव मिळत नाही. अर्थात हा दृश्यानुभव अगदीच वाईट नाही.

कामगिरी :

‘नोट ३ लाइट’मध्ये ३ जीबी रॅमची व्यवस्था आहे. अलीकडे ‘रॅम’ जितके जास्त तितका फोन अधिक शक्तिशाली असे समजले जाते. ते अर्थातच पूर्णपणे चुकीचे नाही. मात्र, जास्त ‘रॅम’ असले तरी त्याला ‘प्रोसेसर’ही तितक्याच ताकदीचा हवा. दुर्दैवाने ‘कूलपॅड नोट ३’मध्ये १.३ गिगा हार्ट्झचा ऑक्टाकोअर प्रोसेसर पुरवण्यात आला आहे. सध्या दोन गिगा हार्ट्झच्या प्रोसेसरचे स्मार्टफोन बाजारात टिमकी वाजवत असताना १.३ गिगा हार्ट्झ क्षमतेचा प्रोसेसर परिणामकारक ठरत नाही. परंतु, ‘३ जीबी रॅम’मुळे ही उणीव बऱ्याच अंशी भरून निघाली आहे. यूटय़ूबवरील व्हिडीओ पाहताना किंवा ‘कट द रोप’सारखे गेम खेळताना फोनचा वेग मंदावल्यासारखा वाटत नाही. विशेष म्हणजे, संपूर्ण दिवसभराच्या वापरात एकदाही स्मार्टफोन तापल्याचे जाणवले नाही. त्यामुळेच हा स्मार्टफोन नावाप्रमाणेच ‘कूल’ आहे, असे म्हणावे लागेल.

साठवण क्षमता :

‘स्टोअरेज’ला सध्या भरपूर मागणी आहे. त्यामुळे कंपन्या अधिकाधिक जीबीची साठवण क्षमता देऊ करत आहेत. ‘कूलपॅड’ने याबाबतीत मात्र, पारंपरिक १६ जीबीचीच इंटर्नल स्टोअरेज पुरवली आहे. त्यातही फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, कूल स्टोअर अशा ‘डिफॉल्ट’ अ‍ॅपनी ८ जीबी जागा वापरल्याने वापरकर्त्यांच्या हातात केवळ आठ जीबी इंटर्नल मेमरी राहते. अर्थात या फोनला ६४ जीबी क्षमतेच्या मायक्रोएसडी कार्डनिशी अधिक सक्षम बनवण्याची सुविधा आहे.

कॅमेरा :

‘कूलपॅड नोट ३ लाइट’मध्ये मागील बाजूस १३ मेगापिक्सेल कॅमेरा आणि पुढील बाजूस ५ मेगापिक्सेल कॅमेरा पुरवण्यात आला आहे. सात हजार रुपयांच्या किमतीत इतक्या क्षमतेचा कॅमेरा अपवादानेच मिळतो. कॅमेऱ्यांतून काढलेल्या छायाचित्रांचा दर्जा उच्च श्रेणीतील १३ मेगापिक्सेल स्मार्टफोनइतका दर्जेदार नाही. परंतु, तो सुमारदेखील नाही. कदाचित, किंमत आटोक्यात ठेवण्यासाठी कॅमेऱ्याच्या ‘लेन्स’च्या दर्जात कंपनीने तडजोड केली असावी. ‘झूम’ न करता काढलेली छायाचित्रे अधिक सुस्पष्ट आहेत. मात्र ज्याक्षणी तुम्ही ‘झूम’चा वापर करता, त्याक्षणी तुम्हाला स्क्रीनवर अस्पष्टतेचे ठिपके जाणवू लागतात. जमेची बाजू म्हणजे, पुढच्या बाजूला असलेला कॅमेरा लक्षणीयरीत्या उत्तम आहे. आजकाल सेल्फीच्या युगात असा कॅमेरा म्हणजे ‘सेल्फी’ने भारलेल्या तरुणाईला देणगीच म्हणावी लागेल. ‘नोट ३’मध्ये ‘प्रो’ अर्थात ‘प्रोफेशनल’ कॅमेऱ्याची सोय पुरवण्यात आली आहे. त्याद्वारे छायाचित्रे काढतानाच त्याचा फोकस अ‍ॅडजस्ट करता येतो. याशिवाय ‘ब्राइटनेस’, ‘कॉन्ट्रास्ट’ या सुविधाही लागलीच हाताळता येतात. मागील बाजूस ‘एलईडी फ्लॅश’ची सुविधा आहे. त्याच्या मदतीने अंधारातील फोटो चांगले निघतात.

बॅटरी :

‘कूलपॅड नोट ३’मध्ये २५०० एमएएच क्षमतेची बॅटरी पुरवण्यात आली आहे. ही बॅटरी चांगल्या दर्जाची आहे. अख्खा दिवस वापरल्यानंतरही ती निम्माच वापर दाखवत होती. मात्र, चार्जिगला ही बॅटरी सर्वसामान्य स्मार्टफोनपेक्षा अधिक वेळ घेत असल्याचे जाणवते.

फिंगरप्रिंट स्कॅनर :

अलीकडे फोनच्या सुरक्षेचा आणि वापरकर्त्यांच्या गोपनीयतेचा मुद्दा महत्त्वाचा मानला जातो. यावर उपाय म्हणून पॅटर्न, पिन असे ‘लॉकिंग’ पर्याय प्रत्येक फोनमध्ये असतात. मात्र, आता उच्च किंमत श्रेणीतील स्मार्टफोनमध्ये ‘फिंगरप्रिंट स्कॅनर’ ही सुविधा पुरवण्यात येत आहे. त्यामुळे वापरकर्त्यांच्या ठरावीक बोटाच्या ठशाद्वारेच फोन ‘अनलॉक’ होऊ शकतो. ही सुविधा अवघ्या ७ हजारांच्या स्मार्टफोनमध्ये देण्याची कमाल ‘कूलपॅड नोट ३ लाइट’ने दाखवली आहे. यातील फिंगरप्रिंट स्कॅनर अतिशय चांगला आणि तत्पर काम करणारा आहे. फिंगर प्रिंट नोंदवतानाही फार वेळ खर्ची होत नाही. शिवाय काही कारणाने ‘फिंगर प्रिंट’ने अनलॉक होत नसल्याने वापरकर्त्यांला पर्यायी पिन क्रमांकाद्वारेही फोन अनलॉक करता येतो. दुसरं म्हणजे, या ‘फिंगर प्रिंट’ स्कॅनरच्या मदतीने विशिष्ट अ‍ॅप्सही ‘लॉक’ करता येतात. त्यामुळे मूळ मालकाखेरीज अन्य कोणीही ते अ‍ॅप्स हाताळू शकत नाही.

वरील सर्व वैशिष्टय़े पाहिली तर ‘कूलपॅड नोट ३ लाइट’ हा आठ हजार रुपयांखालील किमतीच्या स्मार्टफोनमधील चांगला पर्याय आहे, असे म्हणायला हरकत नाही. मागील कॅमेरा, प्रोसेसर, एचडी व्हिडीओ याबाबतीत हा स्मार्टफोन काहीसा कमी पडत असला तरी, सात हजार रुपयांत मिळणाऱ्या अन्य फोनच्या तुलनेत हा खरंच ‘कूल’ आहे.

 

‘कूलपॅड नोट ३ लाइट’ची वैशिष्टय़े

  • ५ इंच एचडी स्क्रीन
  • तीन जीबी रॅम
  • १.३ गिगा हार्ट्झ ऑक्टाकोअर

    प्रोसेसर

  • १६ जीबी इंटर्नल मेमरी
  • ६४ जीबी ‘एसडी कार्ड’ची सुविधा
  • १३ मेगापिक्सेल कॅमेरा

     (एलईडी फ्लॅशसह)

  • ५ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
  • २५०० एमएएच बॅटरी क्षमता
  • फिंगरप्रिंट स्कॅनर
  • जी एलटीई डय़ूअल सिम कार्ड
  • किंमत:  ६९९९ रुपये

     (अ‍ॅमेझॉनवर उपलब्ध)

– आसिफ बागवान

asif.bagwan@expressindia.com