मध्यम किमतीच्या स्मार्टफोनमध्ये सध्या चांगलीच स्पर्धा रंगली आहे. या स्पध्रेत देशातील तसेच चिनी बाजारातील कंपन्या जोमाने उतरल्या आहेत. यातच आता नवनवीन स्मार्टफोन्सची भर पडत आहेत. या नवीन कंपन्या सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या उत्पादनांपेक्षा वेगळे काही तरी देण्याचा प्रयत्न करीत आहेत. असाच काहीसा प्रयत्न अक्सुस स्टनर या मोबाइलच्या बाबतीत केलेला दिसून येतो. या फोनसोबतच प्रथमच आभासी वास्तवाकडे नेणारे हेडसेट देण्यात आले आहेत. पाहू या कसा आहे हे फोन.
फोनची रचना
या फोनची किंमत १५ हजारांच्या आसपास आहे. पण हा फोन त्या किमतीत बाजारात उपलब्ध असलेल्या फोन्सच्या तुलनेत रचनेमध्ये कमी पडताना दिसतो. याची रचना साधारणत: १० हजार रुपयांच्या फोनसारखी वाटते. सध्या अनेक कंपन्या आपले फोन हे फायबर किंवा मेटर बॉडीमध्ये आणतात मात्र या फोनची बॉडी ही प्लास्टिक आणि मेटलची आहे. याचबरोबर सध्या बाजारातील १५ हजार किमतींच्या फोनमध्ये बॅटरी काढण्याची सुविधा नसते. अंतर्गत बॅटरी देण्यात येते. मात्र हा फोन स्पर्धकांच्या तुलनेत यामध्ये मागे पडतो. या फोनमध्ये पाच इंचांचा आयपीएस ७२० पिक्सेलचा डिस्प्ले देण्यात आला आहे. स्क्रीनच्या रंगांमध्ये निळय़ा रंगाची छटा देण्यात आली आहे यामुळे इतर फोनच्या तुलनेत रंग अधिक छान दिसतात. एकूण फोनची रचना वापरण्यास सुयोग्य अशी आहे. याचे मुख्य कारण म्हणजे याची रचना ही कॅण्डी बारसारखी असून वजनानेही तो हलका आहे.
फोनची वैशिष्टय़े
या फोनसह आभासी वास्तव हेडसेट देण्यात आलेला आहे. याचा वापर बाइक रेसिंगचे खेळ खेळणाऱ्यांसाठी चांगल्या प्रकारे होऊ शकतो. हा गेम फोनमध्ये अंतर्गत देण्यात आला आहे. पण हा फोन आभासी वास्तवावर आधारित उपकरणांना पूर्णत: पूरक ठरत नाही. याचा वापर करताना अनेक मर्यादा जाणवतात. याफोनमध्ये अँड्रॉइड ५.१ ऑपरेटिंग प्रणाली देण्यात आली आहे. यामध्ये निफ्टिी रिमोट कंट्रोल अ‍ॅप देण्यात आले आहे. यामुळे आयआर रिमोट कंट्रोलवर चालणारी सर्व उपकरणे आपण या माध्यमातून चालवू शकतो. याअ‍ॅपमध्ये देण्यात आलेल्या अंतर्गत सेटिंग्ज या परिपूर्ण असून आपण आपल्याला पाहिजे त्या सेटिंग्जही करू शकतो. यामुळे हे अ‍ॅप या फोनचे गुणवैशिष्टय़ ठरते. या फोनमध्ये मीडियाटेक एमटी६७५३ ऑक्टा कोर एसओसी प्रोसेसर देण्यात आला आहे. यामध्ये तीन जीबी रॅम देण्यात आली फसून अंतर्गत साठवणूक क्षमता १६ जीबी इतकी आहे. मायक्रो एसडीच्या साहाय्याने ही साठवणूक क्षमता १२८ जीबीने वाढवू शकतो. हा फोन भारतात उपलब्ध असलेल्या सर्व ब्रॅण्ड्सच्या फोरजी एलटीई सुविधेसाठी पूरक आहे. यामध्ये ३००० एमएएचची बॅअरी देण्यात आली आहे. जी आठ ते दहा तास काम करण्यास उपयुक्त ठरते.
फोन अशा प्रकारे काम करतो
या फोनचा काम करण्याचा वेग खूप चांगला आहे. फोनचा इंटरफेस हा जलदगतीने प्रतिसाद देणारा आहे. यासाठी फोनमध्ये देण्यात आलेल्या रॅमची मदत त्याला मिळत असते. यामध्ये देण्यात आलेल्या थ्रीडी मार्क सुविधेचा वापर करीत असताना वेग काहीसा मंदावत असल्याचे जाणवते.
कॅमेरा
या फोनमध्ये मुख्य कॅमेरा हा आठ मेगापिक्सेलचा देण्यात आला असून फ्रंट कॅमेरा पाच मेगापिक्सेलचा देण्यात आला आहे. या दोन्ही कॅमेरांसाठी स्वतंत्र फ्लॅशही देण्यात आला आहे. या कॅमेरातून काढलेल्या छायाचित्राचा शार्पनेस हा चांगला असतो. पण सर्व छायाचित्रांवर निळय़ा रंगाचा प्रभाव काहीसा जास्त असल्याचे जाणवते.
आभासी वास्तव (व्हीआर)हेडसेट
हा हेडसेट म्हणजे वापरकर्त्यांला फोनसोबत मिळालेली सर्वोत्तम भेट म्हणता येऊ शकते. या हेडसेटमध्ये त्याचे वजन वगळता कोणतीही त्रुटी जाणवत नाही. याचा दर्जा खूपच चांगला जाणवतो. या हेडसेटमुळे गेम्सप्रेमींसाठी हा फोन एक पर्वणीच ठरू शकतो. हा हेडसेट घातल्यानंतर बाइक रेसिंग किंवा युद्धाचे गेम्स खेळताना खूप चांगला अनुभव घेता येतो.

किंमत – १४९९९ रुपये.

थोडक्यात
ज्यांना फक्त फोन हवा असेल अशांसाठी हा फोन ज्या किंमतीत उपलब्ध आहे त्या किमतीत इतर अनेक चांगले पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. पण जर चांगल्या फोनसह आभासी जगात रमवणारे उपकरण हवे असेल तर नक्कीच या फोनचा विचार होऊ शकतो.

– नीरज पंडित
niraj.pandit@expressindia.com