सध्या स्मार्टफोनवरूनच छायाचित्रणाची हौस आणि गरज भागवणे सहजसोपे झाले असताना, डिजिटल कॅमेऱ्यांचे बाजारातील स्थान काय, असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. पण छायाचित्रणाचा खराखुरा आनंद आणि दर्जेदार छायाचित्रे/चित्रिकरण हवे असल्यास या कॅमेऱ्यांना पर्याय नाही, हे ‘कॅनॉन’चा नवा कॅमेरा हाताळल्यावर लक्षात येते.

अलीकडे स्मार्टफोन हा ‘हर मर्ज की दवा’ बनला आहे. त्यात छायाचित्रणही आलंच. स्मार्टफोनना १६-१६, २०-२० मेगापिक्सेलचे कॅमेरे उपलब्ध होत असल्याने फोटोग्राफी ही अतिशय सहज गोष्ट झाली आहे. त्याचवेळी छायाचित्रणासाठी कॅमेऱ्यांचा वापर करण्याचे प्रमाण घटले आहे. अगदी व्यावसायिक छायाचित्रकार, निसर्गभ्रमंती करणारे पर्यटक किंवा अभ्यासक हेच कॅमेऱ्यांनिशी छायाचित्रण करत असतात. मोबाइलच्या कॅमेऱ्यांची क्षमता वाढलेली असताना कॅमेऱ्यांवर स्वतंत्र खर्च का करा, हा मुद्दा पटणारा आहे. पण त्याचवेळी कॅमेऱ्यांचे महत्त्व आणि कामगिरी यांकडे दुर्लक्ष करूनही चालणार नाही. स्मार्टफोनमधील कॅमेऱ्यांना जास्त मेगापिक्सेलचे कोंदण लाभले असले तरी, ते कोणत्याही डिजिटल कॅमेऱ्यातील अनेक वैशिष्टय़ांपैकी एक वैशिष्टय़ असते. स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यांना ‘झूम’, ‘फोकस’ अशा मर्यादा असतात. दुसरीकडे, अस्सल कॅमेऱ्यांच्या बाबतीत ‘कनेक्टिव्हीटी’ हा मुद्दा सर्वाधिक महत्त्वाचा असतो. अशा कॅमेऱ्यांतून छायाचित्रे काढल्यास ती डाऊनलोड करण्यासाठी कॅमेरा संगणकाशी जोडण्याची गरज पडते, ही वेळखाऊ प्रक्रिया असल्याचे मत काहीजण मांडतात. पण आता अलीकडे कॅमेरा बनवणाऱ्या कंपन्यांनी या तक्रारीचा सोक्षमोक्ष लावला आहे. आता कॅमेरेही ‘स्मार्ट’ होऊ लागले आहेत. ‘कॅनॉन’च्या ‘पॉवरशॉट जी९एक्स मार्क २’कडे पाहिल्यावर याचे प्रत्यंतर येते.

कॅमेरा निर्मितीत आघाडीवर असलेल्या ‘कॅनॉन’ने आपल्या ‘पॉवरशॉट’ श्रेणीत दाखल केलेला ‘जी९एक्स मार्क २’ हा दोन वर्षांपूर्वी आलेल्या ‘जी९एक्स’चा नवीन अवतार आहे. मात्र, याची किंमत आधीच्या कॅमेऱ्याइतकीच म्हणजे ३०,९९५ रुपये इतकी आहे. या कॅमेऱ्यात काय वेगळेपण आहे, हे आता जाणून घेऊ.

डिझाइन आणि रचना

‘जी९एक्स मार्क २’ हा लहान आकाराचा पण अतिशय सहज हाताळता येण्यासारखा कॅमेरा आहे. याची बाह्यरचना आधीच्या ‘जी९एक्स’सारखीच आहे. पण धातूच्या आवरणामुळे त्याला मजबुती मिळाली आहे. दुसरीकडे कॅमेऱ्याच्या कडांना असलेल्या रबरी आवरणामुळे तो घट्टपणे पकडता येतो.  या कॅमेऱ्याच्या डावीकडील बाजूस ‘शेअरिंग’साठी स्वतंत्र बटण आहे. या बटणाच्या माध्यमातून तुम्ही काढलेले फोटो अन्य कॅमेरा, स्मार्टफोन, प्रिंटर, ऑनलाइन यांच्याशी शेअर करू शकता. कॅमेऱ्याच्या मागील बाजूस तीन इंची टचस्क्रीन असून तो अतिशय व्यवस्थितपणे कामगिरी बजावतो. याशिवाय झूम, फोकस, व्हिडिओ रेकॉर्डिग, ‘क्वीक अ‍ॅक्सेस’, ‘शुटिंग मोड’, फ्लॅश यासाठी स्वतंत्र बटणांची व्यवस्था कॅमेऱ्यावर आहे. उजव्या बाजूला डेटा केबल व चार्जिगसाठी मायक्रो यूएसबी पोर्ट देण्यात आले आहेत. तुम्ही या पोर्टच्या साह्याने ‘पॉवरबँक’वरूनही हा कॅमेरा चार्ज करू शकता. याशिवाय ‘मायक्रो एचडीएमआय पोर्ट’च्या साह्याने कॅमेऱ्यावरील छायाचित्रे मोठय़ा डिस्प्लेवरून थेट पाहता येऊ शकतात. कॅमेऱ्याच्या खालील बाजूस बॅटरी आणि मेमरी कार्डसाठी जागा देण्यात आली आहे. कॅमेऱ्यासोबत आठ जीबी क्षमतेचे मेमरी कार्ड तुम्हाला पुरवण्यात येते.

कॅमेऱ्याची वैशिष्टय़े

या कॅमेऱ्यामध्ये त्याच्या आधीच्या अवतारासारखीच वैशिष्टय़े पुरवण्यात आली आहेत. पण यातील लक्षणीय बदल म्हणजे यात ‘कॅनॉन डिजिक ७ इमेज प्रोसेसर’ असून त्यामुळे ‘बर्स्ट शूटिंग’ करताना एका सेकंदात सहाऐवजी आठ छायाचित्रे टिपली जातात. कॅमेरा स्टार्ट होण्यासाठीचा अवधीही कमी झाला असून १.१ सेकंदात तो सक्रिय होतो.

या कॅमेऱ्यात २०.१ मेगापिक्सेलचा सीएमओएस सेन्सर बसवण्यात आला असून यात तुम्हाला ३एक्स ऑप्टिकल व ४एक्स डिजिटल झूमची व्यवस्था मिळते. कॅमेऱ्यातील ‘कॉन्ट्रास्ट डिटेक्शन ऑटोफोकस सिस्टिम’ व ‘नॅचरल डेन्सिटी फिल्टर’मुळे सूर्यप्रकाशात छायाचित्रणासाठीचा प्रकाश व्यवस्थित अ‍ॅडजस्ट होतो.

या कॅमेऱ्यात वायफाय, ब्लूटूथ आणि एनएफसी सुविधा पुरवण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्याही संगणक, स्मार्टफोन वा क्लाऊड सव्‍‌र्हिसशी थेट कॅमेऱ्याद्वारे कनेक्ट होऊ शकता. कॅनॉनच्या स्मार्टफोन अ‍ॅपच्या साह्याने तुम्ही कॅमेऱ्याचे फोटो पाहू आणि डिलिट करू शकता. याशिवाय या अ‍ॅपच्या साह्याने तुम्ही कॅमेऱ्याला हात न लावता त्यातून छायाचित्रे काढू शकता.

छायाचित्रणाचा अनुभव

‘जी९एक्स मार्क२’ हा अद्ययावत तंत्रज्ञानाने युक्त असला तरी हाताळण्यास अतिशय सोपा आहे. त्यामुळे कॅमेऱ्याच्या बॉक्ससोबत मिळणारे मॅन्यूअल न वाचताही तुम्ही तो व्यवस्थित वापरू शकता. ‘फोकस यंत्रणा’ अतिशय चांगली असल्याने कॅमेरा केवळ रोखून धरला तरी फ्रेम व्यवस्थित अ‍ॅडजस्ट होते. ‘झूम इन’ वा ‘झूम आऊट’ होतानाही कोणताही अडथळा होत नाही. दिवसाच्या उजेडात काढलेली छायाचित्रे अतिशय सुस्पष्ट व व्यवस्थित प्रकाश असलेली येतात. थोडय़ाशा अंधूक प्रकाशातही फ्लॅशविना छायाचित्रे व्यवस्थित येतात. यामध्ये शूटिंगसाठी वेगवेगळे ‘मोड्स’ असल्याने त्याआधारे फोटो काढता येतात.

कॅमेऱ्यातील व्हिडिओ रेकॉर्डिगदेखील व्यवस्थित व स्थिर असते. परंतु, यात ‘४के’ व्हिडिओ रेकॉर्डिगची सुविधा नाही. अलीकडे, या कॅमेऱ्याच्याच किमतीत मिळणाऱ्या स्मार्टफोनमध्येही अशी सुविधा असताना ‘जी९एक्स’ यात काहीसा पिछाडीवर असल्याचे दिसून येते. परंतु, कॅमेऱ्यातून रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओचा दर्जा अतिशय चांगला असून मोठय़ा स्क्रीनवरही चित्रिकरण सुस्पष्ट दिसते.