स्वयंचलित गाडय़ांच्या निर्मिती क्षेत्रातल्या तीन बलाढय़ कंपन्यांविषयी आपण गेल्या भागात चर्चा केली. गुगल, टेस्ला आणि अ‍ॅपल ह्या या क्षेत्रातल्या अत्यंत महत्त्वाच्या कंपन्या. आणि याचं कारण म्हणजे या तिन्ही कंपन्यांचं तंत्रज्ञान. माणूस किंवा चालक गाडी चालवताना आजूबाजूच्या परिस्थितीचं निरीक्षण करून गाडी चालवतो. म्हणजे वेग वाढवायचा, कमी करायचा, ब्रेक लावायचा, हॉर्न वाजवायचा असे निर्णय आजूबाजूच्या परिस्थितीनुसार घेतले जातात. स्वयंचलित गाडय़ांची कार्यपद्धतीही अशाच प्रकारे व्हावी यासाठी या सगळ्याच कंपन्या प्रयत्नशील आहेत. एका प्रकारे निर्णयक्षमता असणारे यंत्रमानव तयार करण्याचाच प्रकार आहे हा. त्यामुळेच भवतालच्या परिस्थितीला अनुसरून क्रिया-प्रतिक्रियांची साखळी रचणं हे या स्वयंचलित गाडय़ांचं खरं कार्य आहे. आता ही साखळी रचण्यासाठीचं प्रत्येकाचं तंत्रज्ञान निराळं आहे.

गुगल या कंपनीची जी स्वयंचलित गाडी आहे ती लिडार (लाइट-सेन्सिंग रडार) या तंत्रज्ञानाचा वापर करते. लेझर किरणांचा वापर करत भवतालची प्रतिमा तयार करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर होतो. गाडीवर असणाऱ्या लेझर बीमरमधून निघणाऱ्या प्रकाश किरणांच्या माध्यमातून गाडी आणि भवतालच्या वस्तू, ठिकाणांमधील अंतर मोजलं जातं. स्वयंचलित गाडय़ांच्या बाबतीत लिडार हे तंत्रज्ञान सर्वोत्कृष्ट समजलं जातं. याचं कारण म्हणजे ते अचूक असतं आणि त्याचसोबत गाडी लिडारमार्फत तयार करण्यात आलेल्या नकाशावर गाडीचं स्थान निश्चित करतं. मात्र लिडार हे अचूक असलं तरी महागडं आहे. एका गाडीवर बसवण्यात येणाऱ्या एका सेन्सरची किंमत ही साधारण ८० हजार डॉलर्स म्हणजे ५६ लाख रुपये इतकी आहे. आणि म्हणूनच अनेक इतर कंपन्यांनी या तंत्रज्ञानाचा अवलंब न करण्याचा निर्णय घेतला आहे. यात टेस्ला कंपनी आघाडीवर आहे.

टेस्लाचे सर्वेसर्वा एलॉन मस्क यांनी तर लिडारपेक्षा रडारचा वापर करणं सोयीस्कर ठरेल असंच सुतोवाच केलं. आणि त्यासाठी गाडीचे डोळे म्हणून हाय-टेक कॅमेरा सेन्सर्सचा वापर करण्यात येत आहे. टेस्लाच्या गाडय़ांमध्ये १२ अल्ट्रासॉनिक सेन्सर्स लावण्यात येतात. हे सेन्सर्स म्हणजे गाडीच्या भवतालचं ३६० अंशांचं व्हिजन यंत्रणेला देत असतं. आणि गाडीच्या पुढल्या भागात असणारी रडार यंत्रणा या व्हिजनचा वापर करत सेमी-ऑटोनोमस ऑटोपायलट सिस्टम कार्यरत करतं. टेस्लाच्या गाडय़ांमध्ये मोबिलआय कंपनीच्या कॅमेऱ्यांचा वापर केला जातो. हा कॅमेरा फक्त अंतर मोजण्याचं काम करत नाही, तर रस्त्यावरील सूचना आणि पादचाऱ्यांनाही डिटेक्ट करतो. टेस्लाने २०१४पासून सेमीऑटोनोमस आणि सेमीऑटोपायलट गाडय़ांची निर्मिती करण्यास सुरुवात केली आहे. भविष्यात रडारचा अधिक योग्य वापर करण्यासाठी त्या तंत्रज्ञानात संशोधन केलं जाईलही. पण सध्यातरी या कंपन्या लिडारची किंमत कमी होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. कारण सध्याच्या घडीला सर्वच कंपन्यांना ठाऊक आहे की लिडार हेच आजचं सर्वात्कृष्ट तंत्रज्ञान आहे.

अ‍ॅपल कार ही या सगळ्या चर्चेत जरा वेगळी पडते. याचं कारण म्हणजे अ‍ॅपल कंपनी ही सध्या फक्त तंत्रज्ञान म्हणजेच सॉफ्टवेअरवर काम करत आहे. आणि त्यामुळेच बीएमडब्ल्यू किंवा इतर गाडय़ा निर्मिती करणाऱ्या उत्पादकांशी करार करण्याकडे अ‍ॅपलचा भर आहे. मात्र गाडय़ांच्या आतील तंत्रज्ञानाच्या बाबतीत अ‍ॅपल काहीतरी जादू करेल अशीच चर्चा आहे. कंपनीकडून या सगळ्याच्या बाबतीत सुरुवातीपासूनच कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे. त्यामुळेच अ‍ॅपलचं तंत्रज्ञान नेमकं कसं असेल हे आत्ताच सांगता येणं कठीण आहे. मात्र इंटरअ‍ॅक्टिव्हिटी हा मूलमंत्र जोपासणं अ‍ॅपलच्या रक्तात आहे. त्यामुळेच गाडीशी संवाद साधत एकूणच प्रवास सुखकर करण्याकडे कंपनीचा ओढा असेल असं म्हटलं जातंय. बाकी वास्तव काय असेल हे येणारा काळच ठरवेल.

पुष्कर सामंत