इंटरनेट, क्लाऊड या सुविधा आता आपल्या इतक्या अंगवळणी पडल्या आहेत की, बऱ्याचदा आपण इंटरनेटवरून जमा केलेली माहिती अशा ठिकाणीच ठेवून देतो. परंतु, प्रत्यक्षात जेव्हा या माहितीची गरज पडते, तेव्हा ती शोधण्यासाठी आपल्याला बराच वेळ खर्ची घालायला लागतो. याच पाश्र्वभूमीवर गुगलने आपल्या ‘सर्च इंजिन’च्या माध्यमातून वापरकर्त्यांच्या वैयक्तिक माहितीचे ‘सर्च रिझल्ट’ देण्यासही सुरुवात केली आहे. गुगल सर्चवर तुम्हाला ही माहिती पाहता येऊ शकेल.

तुम्ही ‘गुगल क्रोम’ सुरू केल्यानंतर एखादा शब्द ‘सर्च’ करता तेव्हा तुम्हाला हजारो ‘सर्च रिझल्ट’ मिळतात. परंतु, आता तुम्हाला बाहेरील ‘सर्च रिझल्ट’सोबत तुमच्या ईमेल, अ‍ॅप, गेम, चॅट, छायाचित्रे आदीवरील त्या शब्दाचा समावेश असलेले ‘सर्च रिझल्ट’ही पाहता येतील. ‘गुगल सर्च’ केल्यानंतर स्क्रीनवर येणाऱ्या ‘सर्चबार’खाली ‘ऑल’, ‘न्यूज’, ‘इमेज’, ‘व्हिडीओ’, ‘डॉक्स’ असे पर्याय तुम्हाला दिसतात. हे पर्याय नेहमीचेच. पण ‘डॉक’पुढे असलेल्या ‘मोअर’ पर्यायावर क्लिक करताच तुम्हाला ‘पर्सनल’ असा पर्यायही दिसून येईल. या पर्यायावर ‘क्लिक’ करताच तुम्ही जे ‘सर्च’ करत आहात त्या सर्चशी संबंधित तुमच्या ईमेल, छायाचित्रे, चॅट अशा गुगलवर नोंद असलेल्या माहितीचे परिणाम तुम्हाला ‘पर्सनल’ अंतर्गत पाहता येतील.

वापरकर्त्यांना वैयक्तिक माहिती शोधणे सोपे जावे, यासाठी ही सुविधा सुरू केल्याचे गुगलचे म्हणणे आहे. यासाठी तुम्ही ‘सर्च’ करतेवेळेस तुमच्या ‘जीमेल’ अकाऊंटनिशी सक्रिय असणे आवश्यक आहे. ही सर्व माहिती सार्वजनिक नसून केवळ वापरकर्त्यांलाच ती पाहता येईल, असे गुगलने म्हटले आहे. याशिवाय ही सुविधा केवळ ‘गुगल क्रोम’ ब्राऊजरवरच उपलब्ध आहे.

फायदा की नुकसान?

गुगलची ही सुविधा वापरकर्त्यांच्या फायद्याची असली तरी, त्याद्वारे वैयक्तिक माहिती कुणाच्याही हाती लागण्याची भीतीही आहे. बऱ्याचदा अनेक जण संगणकावरील आपले ‘गुगल लॉगइन’ बंद करत नाही. त्यामुळे त्यांचे गुगल खाते संगणकावर सुरूच असते. अशावेळी तो संगणक अन्य कुणी हाताळल्यास त्यांना या ‘सर्च रिझल्ट’मधून वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती सहज मिळू शकेल. त्यामुळे ही सुविधा त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. अर्थात यासाठी खबरदारी म्हणून दरवेळेस ‘गुगल’ खात्यातून ‘लॉग आऊट’ करणे कधीही चांगले!

गुगल म्युझिकची मोफत सेवा

टेक्नॉलॉजी क्षेत्रावर वर्चस्व असूनही आपल्या ‘म्युझिक’ सेवेला अपेक्षित ग्राहक मिळवून देण्यात अपयशी ठरलेल्या गुगलने आता नवीन वापरकर्त्यांसाठी चार महिन्यांचे मोफत सदस्यत्व देऊ केले आहे. आतापर्यंत नवीन वापरकर्त्यांना ही सेवा ९० दिवस मोफत मिळत होती. तुम्ही या सुविधेद्वारे तुमच्या संगणक वा मोबाइलमधून ‘गुगल प्ले म्युझिक’ वापरू शकता. अर्थात या मोफत सुविधेदरम्यान वापरकर्त्यांना जाहिरातींचा भडिमार सहन करावा लागणार आहे. या सुविधेच्या साह्याने गाणी ऑनलाइन ऐकण्यासोबतच ऑफलाइन डाऊनलोडची सुविधाही गुगलने पुरवली आहे.