तुम्हाला एखाद्यी माहिती हवी असल्यास ताबडतोब इंटरनेटवर गुगल सुरू करून त्यातून माहितीचा शोध घेता. आपल्याला पाहिजे ती माहिती मिळते, आपण आनंदी होतो. मात्र आपण कोणत्या वेळी कोणत्या गोष्टीचा शोध घेतला अथवा कोणत्या वेळी कोणते व्हिडीओ पाहिले या सर्वाचा तपशील गुगलकडे नोंद होत असतो. इतकेच काय तर आपल्या इंटरनेट वापरावरून मायाजालवर आपलं एक व्यक्तिमत्त्व तयार होतं. या व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंमधून तुमच्या इंटरनेटवर अथवा ई-मेलवर जाहिराती येणे आदी गोष्टी सुरू होतात. गुगलकडील आपला हा ताबा आपण कसा नियंत्रित करू शकतो याकडे पाहुयात.

आपल्या स्मार्ट जीवनावर गुगलचा जणू हक्कच आहे. अशी संरचना सध्या अस्तित्वात आहे. आपण आपल्या संगणकावर अथवा अ‍ॅण्ड्रॉइड फोनवर नेमके काय करतो याच्या प्रत्येक क्षणाची नोंद या अ‍ॅपमध्ये आपल्याला पाहावयास मिळते. अशाच प्रकारचा हक्क फेसबुक आणि अ‍ॅपल या कंपन्याही आपल्या वापरकर्त्यांवर गाजवत असतात. पण या सर्वावर नियंत्रण करणे आपल्याला शक्य आहे. जगभरात अ‍ॅण्ड्रॉइड वापरकर्त्यांची संख्या जास्त असल्यामुळे गुगलकडे असलेल्या आपल्या माहितीबाबत आपण सजक असणे आवश्यक आहे. पाहुयात नेमके काय होते आणि ते कसे नियंत्रित करता येऊ शकते.

माय अ‍ॅक्टिव्हिटी

तुम्ही गुगलचा वापर करून नेमके काय करता याची नोंद तुम्हाला ‘माय अ‍ॅक्टिव्हिटी’ या भागात मिळेल. यासाठी तुम्हाला तुमच्या जीमेल खात्याचे लॉगइन करावे लागेल. यानंतर तुम्ही history.google.com/history या संकेतस्थळावर जा. यामध्ये गुगलच्या सेवांमध्ये तुम्ही ज्या सेवांचा लाभ घेतात त्याचा सर्व तपशील येतो. तसेच त्या सेवांचा वापर तुम्ही किती वेळा कोणत्या कारणासाठी किती वेळ केला याचा तपशीलही यामध्ये येतो. यामध्ये गुगल मॅप्स, गुगल सर्चेस, यूटय़ूब व्हिडीओज या सर्व अ‍ॅप्सवरील माहितीचा समावेश असतो. तुमच्या गुगल सर्चवर नियंत्रण आणण्यासाठी तुम्ही या पानावर स्क्रोल करा. खाली तुम्हाला ‘अ‍ॅक्टिव्हिटी कंट्रोल’ असा पर्याय दिसेल. त्यात ‘तुमचे सर्चेस आणि ब्राऊझिंग अ‍ॅक्टिव्हिटी’ असा पर्याय असेल. तेथे ‘मॅनेज अ‍ॅक्टिव्हिटी’ या पर्यायाची निवड करा. तेथे उजव्या बाजूला वरच्या भागात ‘इनसाइट्स’ असा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा व ‘ऑल टाइम’चा पर्याय निवडा. तेथे तुम्हाला तुम्ही कोणत्या उपकरणावरून कोणते सर्चेस केले. किती वेळेत कोणत्या संकेतस्थळाला भेट दिली इथपासून सर्व तपशील दिवस, तारीख, वेळ आणि उपकरणाच्या तपशिलानिशी दिसतो. तुम्ही या तपशिलावर नजर मारल्यानंतर तुम्हाला पाहिजे तो तपशील अथवा सर्वच तपशील डिलिट करू शकता. तसेच भविष्यात गुगलने या नोंदी ठेवू नयेत असे जर तुम्हाला वाटत असेल तर ‘पर्सनल इन्फो अ‍ॅण्ड प्रायव्हसी’ पानावर जा तेथे ‘अ‍ॅक्टिव्हिटी कंट्रोल्स’मध्ये अनटूगुगलचा पर्याय निवडून तुमच्या गुगल शोधावरील गुगलचे नियंत्रण रोखू शकता. हे केल्यावर तुम्हाला गुगल सांगते की, यामुळे ‘गुगल नाऊ’ आणि ‘गुगल प्लस’चा वापर करताना गुगलतर्फे येणारे शोध पर्याय येणार नाहीत. त्याला ओके करून तुम्ही हा पर्याय निवडू शकता. ज्यांना फार वेळा गुगल सर्चचा वापर करण्याची गरज भासत नाही त्यांनी असे करणे सोयीचे ठरू शकते. जर तुम्हाला काही वेळासाठी तुम्ही केलेल्या शोध पर्यायांचा तपशील साठवून ठेवायचा असेल तर तसा पर्यायही यामध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच अमुक एक दिवसानंतरचा तपशील आपोआप डीलीट व्हावा असे जर तुम्हाला वाटत असेल तर तसा पर्यायही यामध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे.

उपकरणांचा तपशील

गुगल तुमच्या शोध तपशिलाबरोबरच तुम्ही कोणते उपकरण वापरता व कोणत्या ठिकाणांहून वापरता याचा तपशीलही त्यांच्याकडे साठवून ठेवतो. अनेकदा तुम्ही एखादे उपकरण वापरणे सोडून देऊन अनेक वर्षे उलटलेली असतात

तरीही त्या उपकरणाचा तपशील तुमच्या गुगल खात्यामध्ये दिसतो. यामुळे एकदा हा तपशील तपासून जी उपकरणे तुम्ही वापरत नाहीत ती उपकरणे यादीतून वगळणे योग्य ठरते. यासाठी ‘साइन-इन आणि सिक्युरिटी’ या टॅबवर क्लिक करा आणि स्क्रोल डाऊन करा. तेथे तुम्हाला ‘डिव्हाइस अ‍ॅक्टिव्हिटी अ‍ॅण्ड नोटिफिकेशन’ हा पर्याय दिसेल. यात तुम्हाला ‘रिसेंटली युज्ड डिव्हाइस’ची यादी मिळते. यामध्ये ते आपण शेवटी कधी वापरले याचा तपशीलही असतो. जर यातील काही उपकरणे तुम्ही आत्ता वापरत नसाल तर तो तपशील डीलीट करणे केव्हाही योग्य ठरेल. यासाठी ते उपकरण निवडा व त्याखालील ‘रिमूव्ह’चा पर्याय निवडा. म्हणजे ते उपकरण तुमच्या यादीतून निघून जाईल.

लोकेशनवर नियंत्रण

तुम्ही कोणत्या उपकरणाद्वारे कोणत्या ठिकाणाहून लॉगइन करता याचा तपशीलही गुगल नोंदवून ठेवतो. हा पर्याय यापूर्वी गुगलकडे होता. मात्र या वर्षी एप्रिल महिन्यात गुगलने टाइमलाइन या पर्यायाद्वारे हा पर्याय अधिक सक्षम केला आहे. याचा वापर तुम्हाला तुमच्या आठवणी ताज्या करण्यासाठी होऊ शकतो. तुमच्या ई-मेलमध्ये येणारे तुमच्या वीकेंड सहिलींचा तपशील इतकेच नव्हे तर तेथे टिपलेली छायाचित्रे या सर्व गोष्टी तुम्हाला एका क्लिकवर टाइमलाइनमध्ये दिसतील असे गुगल मॅप्सचे उत्पादन व्यवस्थापक गेरार्ड सान्ज यांनी उत्पादन सर्वासाठी खुले करताना सांगितले. यावर नियंत्रण आणण्यासाठी गुगलच्या अ‍ॅक्टिव्हिटी पानाच्या उजव्या बाजूस तीन रेषा दिसतील त्यावर क्लिक करा. तेथे ‘सेटिंग्ज’मध्ये जा. त्यानंतर ‘शो मोअर कंट्रोल्स’चा पर्याय निवडा. त्यानंतर ‘प्लेस यू गो’ या पर्यायमध्ये ‘मॅनेज अ‍ॅक्टिव्हिटी’मध्ये जा. तेथे दिलेल्या पर्यायांचा वापर करून तुम्ही यावर नियंत्रण आणू शकता.

आपल्या सवयींनुसार जाहिराती

आपण इंटरनेटवर काय करतो, कोणत्या गोष्टी सर्च करतो, आपण पुरुष आहोत की स्त्री, आपले वय काय, या सर्वाचा विचार करून आपले

एक मायाजालातील व्यक्तिमत्त्व तयार केले जाते. या व्यक्तिमत्त्वाला साजेशा जाहिराती आपल्या जीमेल खात्यावर अथवा गुगलशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक गोष्टींवर येत असतात. यामध्ये अनेक जाहिराती या आपण ज्या शहरात आहोत त्या आसपासच्याही येत असतात. म्हणजे गुगलचे आपल्यावर इतके बारीक लक्ष असते. त्याचा वापर करून ते जाहिरातदारांना माहिती पुरवितात व पैसे कमावितात. तुम्हाला जर हे नियंत्रित करायचे असेल तर ‘पर्सनल इन्फो अ‍ॅण्ड प्रायव्हसी’ या पानावर जा. तेथे ‘मॅनेज अ‍ॅड सेटिंग्ज’मध्ये जा. तुम्हाला जर पाहिजे त्या जाहिराती याव्यात असे वाटत असेल तर तेथे तुम्ही तुमच्या आवडींमध्ये बदल करू शकता. जर नकोच असेल तर सर्वच डीलीट करू शकता.

डाऊनलोड युवर डेटा

तुम्हाला जर तुमचा सर्व तपशील नंतर वापरण्यासाठी हवा असेल तर तुम्ही तो साठवूनही ठेवू शकता. यासाठी ‘पर्सनल इन्फो अ‍ॅण्ड प्रायव्हसी’ या पर्यायामध्ये ‘कंट्रोल युवर कॉन्टेंट’चा पर्याय निवडा. तेथे ‘डाऊनलोड युवर डेटा’

‘क्रिएट अर्काइव्ह’चा पर्याय निवडून तुमचा सर्व डेटा डाऊनलोड करून घ्या. याची एक झिप फाइल तयार होते. ती फाइल तुम्ही तुमच्या मेलवर घेऊन ठेवू शकता. हे तयार होण्यासाठी काही तास किंवा दिवसही लागू शकतात. पण ते एकदा तयार झाले की तुमच्या ई-मेलवर तो तपशील येतो.

सर्व डीलीट करा

गुगल हे सर्व काही करत आहे ते असेच सुरू ठेवण्यास तुम्हाला जर काही हरकत नसेल तर या पर्यायांकडे तुम्ही लक्ष दिले नाही तरी चालेल. पण जर नको असेल तर तुम्ही सर्व माहिती डीलीट करून लोकेशन ट्रॅकिंग बंद करून ठेवा. हे करण्यासाठी तुम्हाला बाजूच्या तीन टिंबांवर जावे लागेल. तेथे ‘डीलीट ऑप्शन्स’ असा पर्याय येईल. यामध्ये तुम्हाला तुमचा आजचा व कालचा तपशील डीलीट करण्याचा पर्याय येईल. पण जर तुम्ही अ‍ॅडव्हान्समध्ये गेलात तर तुम्ही सर्व तपशील डीलीट करू शकता. जर तुम्हाला तुमचा तपशील केवळ गुगलवरीलच नव्हे तर इतर सर्वच ऑनलाइन माहिती डीलीट करायची असेल तर खालील प्रक्रिया पूर्ण करा.

*    Deseat.me <https://www.deseat.me/>  या संकेतस्थळावर जा. तेथे तुमच्या जीमेलने लॉगइन करा.

*   तेथे तुम्हाला तुमचे सिंक असलेली सर्व खाती दिसतील. यापैकी तुम्हाला जे पाहिजे ते खाते तुम्ही बंद करू शकता.

यानंतर तुमचा इतर संकेतस्थळांवरील तपशीलही डीलीट होऊ शकेल.

नीरज पंडित @ nirajcpandit

Niraj.pandit@expressindia.com