वापरकर्त्यांची संख्या दुप्पट होण्याचा अंदाज

भारतात गेल्या तीन वर्षांमध्ये स्मार्टफोनधारकांची संख्या तब्बल चौपट वाढली आहे. यामुळे आज भारतात ३९ कोटी दहा लाख स्मार्टफोनधारक आहेत. मात्र यापैकी इंटरनेट वापरकत्रे मात्र केवळ ५६ टक्के इतकेच आहेत. हे सर्व वापरकर्ते महिन्याला एक जीबी इंटरनेटचाच वापर करतात. हेच प्रमाण इतर विकसनशील देशांत म्हणजे इंडोनशिया आणि ब्राझीलमध्ये वापरकर्ते दर महिन्याला दोन ते तीन जीबी इंटरनेटचा वापर करतात. तर विकसित देशांमध्ये प्रत्येक वापरकर्ता दर महिन्याला ९ ते दहा जीबी इंटरनेटचा वापर करतो. मात्र सध्याचे डेटायुद्ध लक्षात घेता देशातील मोबाइल इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या लवकरच वाढेल आणि २०२०मध्ये देश इंटरनेटचा वापर करणाऱ्या देशांमध्ये अव्वल स्थानावर पोहचू शकणार आहे.

द इंडस एंटरप्रेनर्स (टीआयई) आणि बास्टन कन्सलटिंग समूह (बीसीजी)यांनी संयुक्तपणे नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवलानुसार २०२०मध्ये तब्बल ६५ कोटी मोबाइल इंटरनेट वापरकर्ते असणार आहेत. याचबरोबर देशातील मोबाइल इंटरनेटचा वापर तब्बल दहा ते चौदा पटींनी वाढणार आहे. देशातील ५५ कोटी मोबाइल धारक म्हणजे एकूण स्मार्टफोनधारकांपैकी ८५ टक्के इंटरनेट वापरकर्ते फोरजी इंटरनेट वापरकत्रे असणार आहेत. याचबरोबर प्रत्येक वापरकर्त्यांचा महिन्याचा वापर एक जीबीने वाढून सात ते दहा जीबीपर्यंत पोहोचेल असा अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. या सर्व बदलामुळे देशातील इंटरनेट अर्थव्यवस्था १२५अब्ज अमेरिकन डॉलर्सवरून दुप्पट होऊन २५० अब्ज अमेरिकन डॉलर्सवर पोहचणार आहे. यामध्ये देशातच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या ७.५टक्के इतका वाटा असणार आहे. देशात डिजिटल व्हिडीओज याचबरोबर मजकुराचा तपशिलाचा दर्जा वाढत आहे, यामुळे मोबाइलचा डेटा खर्च करण्याची मानसिकता वाढेल असा विश्वास अहवालाच्या सहलेखिका आणि बीसीजीच्या भागीदार निमिशा जैन यांनी व्यक्त केला. तर जेव्हा सर्वत्र इंटरनेट ऑफ थिंग्ज की इंटरनेट ऑफ एव्हरीथिंग

यावर चर्चा सुरू असतानाच हा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. यामुळे नवउद्योजकांना यातून प्रोत्साहन मिळणार असल्याचे टीआयईचे कार्यकारी संचालक गीतिका दयाल यांनी सांगितले.