कधी काळी पाकिटमारांपासून सावध राहावं लागायचं. तसं ते आजही राहावं लागतंच. पण या अशा पाटय़ांवर पाकिटमारांबरोबरच मोबाइलचोरांनीही आपली जागा बनवली आहे. खिशातल्या पाकिटाबरोबरच मोबाइल सावधानतेने बाळगणंही गरजेचंच आहे. दुसरी गोष्ट अशी की मोबाइल चोर म्हणजे फक्त खिसेकापूगिरी करत मोबाइल चोरणारे नाहीत. मोबाइलचा डेटा कसाही हॅक करता येतो आणि अ‍ॅण्ड्रॉइड फोन्सच्या बाबतीत तर हा धोका जरा जास्तच आहे. पण याचा अर्थ असा नाही की अ‍ॅण्ड्रॉइड फोन्स सुरक्षित नाहीत.

यूजर्सना अधिकाधिक सुलभ सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी गुगलने ऑपरेटिंग सिस्टीम सोपी ठेवली आहे. तसंच अ‍ॅप डेव्हलपमेंटही फारशी कठीण ठेवलेली नाही. पण त्यामुळेच अ‍ॅण्ड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीमवर होणाऱ्या मालवेअर, व्हायरसच्या हल्ल्यांची संख्याही मोठी आहे. अनेकदा आपला मोबाइल हॅक झालाय हेच आपल्याला माहीत नसतं. मोबाइल चोरीपेक्षा हा प्रकार जरा जास्तच गंभीर आहे. मोबाइल चोरीला गेला तर निदान तो ट्रॅक तरी करता येऊ  शकतो. पण हॅक झाला तर मोबाइल आपल्या हातात असला तरी त्यावर ताबा कुणा तरी भलत्याचा असतो.

मोबाइल हॅक झाला हे कसं ओळखावा?

मोबाइलचं कामकाज खराब झालंय का?

तुमचा फोन अनपेक्षितरीत्या, विचित्र पद्धतीने काम करत असेल तर हॅकिंगची शक्यता नाकारता येत नाही. मोबाइल एकदम शटडाऊन होणे, अचानक रीस्टार्ट होणे, अ‍ॅप्स अनपेक्षितरीत्या सुरू किंवा बंद होणं, आपोआप एसएमएस पाठवला जाणं ही मोबाइल हॅक होण्याची सामान्य लक्षणं आहेत. अनेकदा अवास्तव येणारी मोबाइल बिलं किंवा खर्च होणारा डेटा याचा कारणही तेच असतं. मोबाइलमध्ये शिरलेलं मालवेअर नकळतपणे तुमचा डेटा खात असतं आणि याची कल्पना मोबाइलचं बिल पाहिल्यावर येते.

बॅटरी लवकर संपतेय का?

बॅटरी संपण्याची अनेक कारणं आहेत. मागे बॅटरी बचाओच्या लेखात आपण ती पाहिली होती. पण अनेकदा सगळ्या उपाययोजना करूनही बॅटरी भराभर उतरते. बॅकग्राऊंडला सुरू असणाऱ्या या मालवेअरचा हा प्रताप असू शकतो. डेटा खात असतानाच चवीला बॅटरीचा तुकडाही हे मालवेअर तोडत असतात.

ही मालवेअर येतात तरी कशी?

अनेकदा आपण ब्राऊजिंग करत असताना चुकून कुठे तरी क्लिक करतो. जाहिरातींचे बॅनर्स, स्टीकर्स तर सतत येतच असतात. बऱ्याचदा या चुकून ठेवलेल्या बोटांमुळे मालवेअर्स मोबाइलमध्ये शिरतात आणि हळूहळू मोबाइलचा ताबा घेतात.

हे रोखायचं कसं?

सॉफ्टवेअर अपडेशन

ऑपरेटिंग सिस्टीम अप-टू-डेट ठेवणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. सॉफ्टवेअर अपडेटेड असेल तर मालवेअरचा मोबाइलवर होणारा परिणाम कमी होतो. त्यामुळेच वेळोवेळी मोबाइल, टॅब्लेटच्या ऑपरेटिंग सिस्टीम अपडेट्सकडे लक्ष ठेवा.

थर्ड पार्टी अ‍ॅप स्टोअर

मालवेअर्स, व्हायरस हे मुख्यत्वे मोबाइल अ‍ॅप्स डाऊनलोड करताना त्यासोबत येतात. त्यामुळे गुगल प्ले स्टोअर, अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअर, अ‍ॅमेझॉन अ‍ॅप स्टोअर याशिवाय इतर अ‍ॅप स्टोअर्समधून अ‍ॅप इन्स्टॉल करणं मोबाइलसाठी धोकादायक ठरू शकतं. कुठल्याही माहीत नसलेल्या वेबसाइटवरून अ‍ॅप डाऊनलोड करू नका.

दुसरी गोष्ट म्हणजे अ‍ॅप डाऊनलोड होत असताना अनेकदा परमिशनची एक विण्डो येते. ही परमिशन स्क्रीन पूर्णपणे वाचा. डाऊनलोड होत असलेलं अ‍ॅप तुमच्या मोबाइलमधला कोणता डेटा अ‍ॅक्सेस करणार आहे त्याची माहिती या स्क्रीनवर दिलेली असते.

डेटा कसा वाचवायचा

शक्यतो मोबाइलमधल्या महत्त्वाच्या अ‍ॅप्ससाठी लॉकिंग सिस्टीम वापरा. अ‍ॅप सुरू करण्यासाठी पिन किंवा पासवर्डचा वापर करा. त्यामुळे तुमचा डेटा अ‍ॅक्सेस करता येणार नाही. अनेकदा बँक अकाऊंट्सचे नंबर्स, युजरनेम, पासवर्ड्स मोबाइलवर सेव्ह केले जातात. हे अशा प्रकारे सेव्ह करणं मुळातच धोक्याचं आहेच. पण लक्षात ठेवण्यासाठी जर का सेव्ह करत असालच तर मग नीट काळजी घ्या. हे पासवर्ड्स कधीही एसडी कार्डवर सेव्ह करू नका. मोबाइलच्या इंटर्नल मेमरीमध्येच सेव्ह करा. त्या फाइलला किंवा फोल्डरला पासवर्ड ठेवा. याशिवाय इतर महत्त्वाची कागदपत्रं जर का मोबाइल, टॅब्लेटवर सेव्ह करत असाल तर त्यांच्यासाठीही पासवर्ड ठेवा.

मोबाइल सिक्युरिटी अ‍ॅप

मोबाइल सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक सिक्युरिटी अ‍ॅप्स किंवा अ‍ॅण्टिव्हायरस अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. पण वास्तव असं आहे की अ‍ॅप्स पूर्णपणे कार्यक्षम नाहीत. एखादं अ‍ॅण्टिव्हायरस अ‍ॅप इन्स्टॉल केलं म्हणजे आपण निर्धास्त व्हावं असं नाहीये. खुद्द गुगलच्या ओपन सोर्स टीमचे डिरेक्टर क्रिस डिबोना यांनीच हा खुलासा केला आहे. एखादं अ‍ॅण्टिव्हायरस अ‍ॅप इन्स्टॉल करायला हरकत नाही. पण डेस्कटॉप कॉम्प्युटर्ससारखी खोलात जाऊन स्कॅनिंग करणारी सॉफ्टवेअर्स अजून तरी तयार झालेली नाहीत असं डिबोना यांचं म्हणणं आहे. लुकआउट किंवा इसेट (एरएळ)सारखी रिअल टाइम स्कॅनिंग करणारी काही अ‍ॅप्स आहेत, पण मोबाइल सुरक्षित ठेवण्यासाठी कॉमन सेन्स हेच हत्यार असल्याचं डिबोना म्हणतात.

मोबाइल हॅक होण्यापासून कसा वाचवायचा ते आपण पाहिलं. पुढच्या भागात बघू या की मोबाइल चोरीला गेल्यास काय उपाययोजना करायच्या.

pushkar.samant@gmail.com