Intex ने अॅण्ड्रॉइड ६.० मार्शमेलो प्रणालीवर कार्य करणारा Aqua Ring स्मार्ट फोन बाजारात उतरवला आहे. कंपनीने या स्मार्ट फोनची किंमत केवळ ३,९९९ रुपये इतकी ठेवली आहे. अॅमेझॉन इंडिया ऑनलाईन शॉपिंग संकेतस्थळावर हा स्मार्टफोन विकत घेण्यासाठी उपलब्ध आहे. Intex Aqua Ring मध्ये ५ इंचाचा डिस्प्ले, १२८० x ७२० पिक्सलचे रेझोल्युशन, १.३ गेगाहर्ट्स क्वाडकोर मीडियाटेक MTK6580A प्रोसेसर, १ जीबी रॅम आणि ८ जीबी इंटरनल मेमरी स्टोअरेज देण्यात आली आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या या किंमतीच्या अन्य स्मार्ट फोनच्या तुलनेत Aqua Ring मध्ये गेमिंग आणि मल्टिटास्किंगचा अनुभव चांगला असल्याचा दावा कंपनीतर्फे करण्यात आला आहे. कॅमेऱ्याविषयी बोलायचे झाल्यास फोटोग्राफीसाठी यात ड्युअल फ्लॅश, ऑटोफोकस, पॅनोरामा मोड, फेस ब्यूटी आणि जेस्चर्सयुक्त असा ५ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये २४८० एमएएच बॅटरी देण्यात आली असून, फोनची जाडी केवळ ९.२५ एमएम इतकी आहे. अन्य स्मार्ट फोनप्रमाणे या फोनमध्येदेखील २१ भारतीय भाषा सपोर्ट करतात. उत्तम कनेक्टिविटीसाठी यात ३जी सपोर्ट देण्यात आला असून, ब्ल्यूटूथ ४.०, वायफाय ८०२.११ बी/जी/एन आणि जीपीएस सारखे फिचर्स देण्यात आले आहेत. काळ्या रंगात उपलब्ध असलेला हा स्मार्ट फोन एक वर्षाच्या वॉरेंटीसोबत येतो.