अलीकडे ‘मेड इन इंडिया’ असं बिरुद घेऊन भारतीय बाजारात दाखल होण्याची परदेशी कंपन्यांच्या स्मार्टफोनमध्ये जणू स्पर्धाच सुरू आहे. ‘ले इको’ या चालू वर्षांतच भारतात दाखल झालेल्या कंपनीने ‘ले १ एस’ आणि ‘ले मॅक्स’ असे दोन स्मार्टफोन बाजारात आणले. त्यानंतर अवघ्या तीन महिन्यांत ही कंपनी ‘ले १ एस इको’ हा नवीन स्मार्टफोन (नव्हे सुपरफोन! कंपनीने तसे नाव दिले आहे) कंपनीने बाजारात आणला आहे. ‘मेड इन इंडिया’ असा ‘टॅग’ लावून दाखल झालेला हा फोन दिसायला देखणा, कामगिरीला चांगला आणि हाताळायला सोपा आहे. पण तो इतका तापतो की हातात धरून ठेवणेही कधी कधी तापदायक होते.

‘ले इको’ ही मुळात ‘ले टीव्ही’ ही कंपनी. पण भारतात येण्यापूर्वी कंपनीने नवीन नाव धारण केले. ‘इकोसिस्टीम’ अर्थात परिसंस्थेशी सुसंगत उत्पादने निर्माण करणारी कंपनी असा प्रचार करीत ही कंपनी बाजारात उतरली. ‘ले वन एस’ आणि ‘ले मॅक्स’ या दोन स्मार्टफोनची ईकॉमर्स संकेतस्थळांवरून जोरदार विक्री झाल्यामुळे कंपनीचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यामुळेच या दोन फोननंतर काही महिन्यांतच ‘ले इको’ने ‘ले वन एस इको’ हा नवीन स्मार्टफोन बाजारात आणला आहे. पाहताक्षणी हा फोन ‘ले वन एस’ची दुसरी आवृत्ती असल्याचं जाणवतं आणि ते बव्हतांशी खरंही आहे. दोन्ही फोनमधील ‘सीपीयू स्पीड’ वगळता बाकी सर्व वैशिष्टय़े जवळपास सारखी आहेत. आणि किमतीचं म्हणाल तर ‘ले वन एस’च्या तुलनेत ‘ले वन एस इको’ हा १०० रुपयांनी स्वस्त आहे. ९९९९ रुपयांना असलेला हा फोन त्याहून किती तरी जास्त किमतीचा वाटतो आणि काम करतो. पण तरीही या फोनच्या वैशिष्टय़ांची सर्व मुद्दय़ांच्या आधारे पारख करणे आवश्यक ठरते.
रचनासौंदर्य : वर म्हटल्याप्रमाणे हा फोन दहा हजार रुपयांना आहे, हे तो पहिल्याप्रथम पाहणाऱ्यांना पटणार नाही. मेटॅलिक बॉडी, त्याची आकर्षक चमक, ५.५ इंचाचा डिस्प्ले, इतर फोनपेक्षा मोठा वाटणार स्पीकर पाहिल्यानंतर हा फोन हातात घ्यावासा वाटतोच. बऱ्यापैकी अ‍ॅपलच्या आयफोनसारखा दिसणारा असा हा फोन हातात घेतल्यानंतर त्याचे ‘वजन’ जाणवते. इतर फोनच्या तुलनेत आकाराने आणि वजनाने हा फोन मोठा वाटतो. फोनची बॉडी अतिशय ‘शार्प’ असल्याने तो हातातून निसटण्याची भीती मात्र नेहमी वाटत राहते.
डिस्प्ले : ५.५ इंची डिस्प्ले असलेल्या या फोनचे रेझोल्युशन १९२० बाय १०८० इतके आहे. त्यामुळे व्हिडीओज, छायाचित्रे यावर अतिशय चांगली दिसतात. काही वेळा छायाचित्रांतील रंग वास्तवापेक्षा अधिक भडक वाटतात.
कामगिरी : या फोनमध्ये हेलिओ एक्स१० मीडियाटेक प्रोसेसर, १.८ गिगा हार्ट्झचा सीपीयू, तीन जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोअरेज जागा आहे. त्या पातळीवर हा फोन अतिशय खरा उतरतो. या फोनवर व्हिडीओ, गेम किंवा ईमेलदेखील पटकन काम करतात. मात्र, फोनला एक्स्टर्नल स्टोअरेजची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे ३२ जीबीतल्या जागेतच वापरकर्त्यांला अ‍ॅपपासून मूव्हीजपर्यंतचा ‘संसार’ थाटावा लागतो.
बॅटरी : बॅटरी हा या फोनची उणी बाजू आहे, असं म्हणावं लागेल. ३००० एमएएच क्षमतेची बॅटरी तसं पाहायला गेलं तर कमी नाही. मात्र, पूर्ण वापर होत असताना ही बॅटरी जास्तीत जास्त सात ते आठ तास टिकू शकते, असे दिसून आले. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, या फोनचं गरम होणं. जास्त वापर होताना कोणताही स्मार्टफोन तापत जातो. पण ‘ले वन एस इको’ जास्त वापराचीही वाट न पाहता लगेच तापायला लागतो. बॅटरी चार्ज होताना हा फोन इतका गरम होतो की तो हातातही धरवत नाही. हे तापणं इतर फोनपेक्षा निश्चितच जास्त आहे. आणि ही या फोनची सर्वात दुबळी बाजू आहे, असं म्हणता येईल.
कॅमेरा : या फोनला मागील बाजूस १३ मेगापिक्सेल आणि पुढील बाजूस पाच मेगापिक्सेल कॅमेऱ्याची सुविधा दिली आहे. दोन्ही कॅमेरे क्षमतेनुसार चांगलं काम करतात. मघाशी म्हटल्याप्रमाणे छायाचित्रे वास्तवापेक्षा अधिक भडक वाटतात. परंतु, सेटिंग बदलून त्यावर नियंत्रण आणणं शक्य आहे. प्रकाशयोजना व्यवस्थित असल्याने अंधारातील छायाचित्रेही बऱ्यापैकी उजळ येतात.
टीव्ही कंटेंट : या फोनसोबत ‘ले व्हिडीओएफ’ ही सुविधा कंपनीने पुरवली असून त्या माध्यमातून २ हजार मूव्हीज आणि १०० हून अधिक लाइव्ह टीव्ही चॅनेल्स पाहता येतात. शिवाय ‘ले इको म्युझिक’ ही जवळपास २५ लाख गाणी उपलब्ध असलेली सुविधाही या फोनच्या माध्यमातून वापरायला मिळते. विशेष म्हणजे, फोन खरेदी करणाऱ्याला ही सेवा एका वर्षांसाठी मोफत दिली जाते. त्यामुळे तुम्ही या सेवेच्या माध्यमातून हवे तितके व्हिडीओज मोफत पाहू शकता.

‘टेक्नॉलेज’ निष्कर्ष
‘ले वन एस इको’ हा दहा हजार रुपयांच्या श्रेणीतील चांगला फोन आहे. त्याचा श्रीमंती रुबाब आपल्या हातात खेळवायला वाटतो. तो कामदेखील व्यवस्थित करतो. पण या फोनचं तापणं कसं नियंत्रणात आणायचं, हे कंपनीने जरा तपासलं पाहिजे. अन्यथा दिसायला देखणा असलेला हा फोन हाताला चटका लावून गेल्याशिवाय राहणार नाही.
आसिफ बागवान -asif.bagwan@expressindia.com