अॅण्ड्रॉइड स्मार्टफोन्सच्या दुनियेत भारतीय बाजारपेठेला विशेष महत्त्व असून यासाठी मोबाइल कंपन्या मोबाइलनिर्मिती क्षेत्राला नवे आयाम देण्याचा प्रयत्न करीत असतात. असाच प्रयत्न पूर्वाश्रमीच्या ‘ले-टीव्ही’ व आत्ताच्या ‘ले-इको’ कंपनीने केला असून त्यांनी ‘स्मार्ट’ नव्हे तर ‘ले-२’ व ‘ले-मॅक्स२’ हे दोन ‘सुपरफोन्स’ मोठय़ा गाजावाजा करीत भारतीय बाजारपेठेत आणले आहेत.
रचना – अॅण्ड्रॉइड फोन्समधील आघाडीच्या कंपन्यांना टक्कर देण्यासाठी ले-इको कंपनीने आणलेले मोबाइल फोन्स मेटल बॉडीचे आहेत. ले-२ व ले-मॅक्स २ हे दोन्ही फोन जवळपास ६ बाय २ इंचाचे असल्याने हाताचा तळवा व्यापून टाकतात. ले-२ १५३ ग्रॅम आणि ले-मॅक्स २ हा १८५ ग्रॅम वजनाचे असल्याने वजनाने अत्यंत हलके आहेत. दोघांचेही अनुक्रमे ५.५ व ५.७ इंचाचे डिस्प्ले आहेत. तसेच पुढून अत्यंत सपाट व जास्तीचा भाग डिस्प्लेने व्यापल्याने हल्लीच्या युजर्सची मोठय़ा डिस्पलेची मागणी पूर्ण होत असून या मोबाइलच्या उजेडाने डोळ्यांना त्रासदेखील होत नाही. मोबाइलचा रंग पूर्ण सोनेरी नसून गुलाबी रंगाकडे वळणारा (रोझ गोल्ड) असल्याने ग्राहकांना रंगांमध्ये एक वेगळा पर्याय उपलब्ध झाला आहे. तसेच या मोबाइलवर सर्वात खाली इतरांप्रमाणेच तीन बटणांचे स्क्रीनवरील पर्याय आहेत. या मोबाइलचे चार्जिग जलद होणारे असून त्यासाठी या दोन्ही मोबाइलसाठी ३००० एमएएच व ३१०० एमएएच क्षमतेची बॅटरी वापरण्यात आली आहे. कॅमेराच्या बाबतीत या दोन्ही मोबाइलमध्ये कंपनीने कमालच केली असून ले-२ चा १६ मेगापिक्सलचा तर ले-मॅक्स २ चा तब्बल २१ मेगापिक्सलचा कॅमेरा असल्याने फोटोग्राफी करणाऱ्यांना हे मोबाइल विशेष आकर्षित करणार आहेत. तसेच फिंगरप्रिंट सेन्सर, गायरोस्कोप, मॅग्नेटोमीटर असे आकर्षक फीचर्सही या मोबाइलमध्ये असून दोन्ही मोबाइलना गोरिला ग्लास-३ ने संरक्षित करण्यात आले आहे.
वापरकर्त्यांसाठी – या मोबाईलची अॅण्ड्रॉइड प्रणाली ही सध्याची चर्चेत असलेली मार्शमेलो ६.०.१ असून कंपनीने यातून वापरणाऱ्यांना नवा इकोसिस्टम युजर इंटरफेसचा वापर करता येणार आहे. तसेच, मोबाइल लॉक स्क्रीनवर स्वाइप करून मोबाइलचे प्रमुख आयकॉन आपल्यासमोर येतात. हे स्वाइप करताना विशिष्ट पद्धतीने हे आयकॉन आपल्या समोर येतात. या आयकॉनच्या मध्यभागी लाइव्ह हा विशेष आयकॉन असून त्याद्वारे आपण कॅमेरा, म्युझिक, सेटिंग पॅनल आदी पयार्याकडे सहज जाऊ शकतो. वापरकर्त्यांनी जाणून घ्यावी अशी यातील विशेष बाब म्हणजे ले-२ मध्ये स्नॅपड्रॅगन ६५२ क्वालाकॉम ऑक्टाकोर प्रोसेसर असून ३ जीबी रॅम व ३२ जीबी मेमरी देण्यात आली आहे. मात्र, सध्या बाजारात याहीपेक्षा जास्त रॅम असलेले मोबाईल आहेत. त्यामुळे कंपनीने ले-मॅक्स २ या मोबाईलमध्ये स्नॅपड्रॅगन ८२० क्वालाकॉम ऑक्टोकोर प्रोसेसर हा आधुनिक प्रोसेसर देण्यात आला असून यात दोन प्रकारचे मोबाइल आहेत. ४ जीबी रॅम व ३२ जीबी मेमरी आणि ६ जीबी रॅम व ६४ जीबी मेमरी देण्यात आली आहे. ६ जीबी रॅम व ६४ जीबी मेमरी या पर्यायामुळे हा मोबाइल आयफोन ६ प्लसला पुरून उरणार असल्याचा दावा केला आहे. तसेच, या दोनही मोबाइलमध्ये चार्जर, म्युझिक यांसाठी विशेष तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. यातील चार्जरमध्ये विशिष्ट चिप बसवण्यात आल्याने या मोबाइलचे फार कमी वेळात चार्जिग होत असून ९० मिनिटांत हा मोबाइल पूर्णत: चार्ज होतो.
काय आहे सीडीएल? – यातील म्युझिकसाठी ३.५ एमएमचे नेहमीचे इअरफोन नसून टाइप-सी हे विशेष इअरफोन दिले आहेत. कंपनीने ‘सीडीएलए’ (कन्टिन्युअल डिजिटल लॉसलेस ऑडिओ) हे नवे तंत्रज्ञान आणले आहे. या सी-टाइप इअरफोनमध्ये एक चिप असून त्याद्वारे दोषरहित व उत्तम दर्जाचे संगीत ऐकण्याचे नवे मापदंड रचण्यात आले आहेत. याचबरोबरीने या इअरफोन्समध्ये स्वतंत्र आयडी असून या आयडीद्वारे वापरकर्त्यांने संगीत निवडण्यासाठी प्रेफरन्सेस स्टोर होतात. जेणेकरून एकदा निवडलेले आवाजाचे, बास व अन्य पर्याय यात साठवले जातात. त्यामुळे हाय-फाय तंत्रज्ञानापेक्षा अधिक वेगळे तंत्रज्ञान या निमित्ताने वापरकणाऱ्यांना प्रथमच उपलब्ध झाले आहे.
विशेष कॅमेरा – ले-२ आणि ले-मॅक्स २ या दोहोंचे कॅमेरे अनुक्रमे १६ व २१ मेगापिक्सलचे असून त्यांचे फ्रंट कॅमेरे ८ मेगापिक्सलचे आहेत. त्यामुळे सेल्फीदेखील चांगल्या प्रतीचा मिळणार आहे. २.२ अॅपर्चरच्या लेन्स या कॅमेऱ्यांसाठी वापरल्याने छायाचित्रातील बारकावे यातून टिपता येणार आहेत. यासाठी पीडीएएफ व डय़ुअल एलईडी फ्लॅश वापरण्यात आला आहे. त्यामुळे अंधारातही छायाचित्रातील स्पष्टता कायम राहणार आहे.
संकेत सबनीस – sanket.sabnis@expressindia.com