देशात फोरजीचे युद्ध रंगले आणि आता ते काहीसे शांतही झाले आहे. पण या सर्वात ग्राहकांना दिवसाला एक ते तीन जीबी डेटा वापरावयास मिळू लागला आहे. यामुळे कोणत्या कंपनीला किती फायदा होईल यापेक्षाही ग्राहकांना मोठा फायदा होणार असून इंटरनेटआधारित सुविधांचा अधिक जलद वापर आता शक्य होणार आहे. यामुळे गेल्या दोन वर्षांपासून भारतीय बाजारात डोकावत असलेल्या अ‍ॅपआधारित वाहिन्यांच्या वापरांना वेग येणार आहे. कारण फोरजीसारख्या जलद इंटरनेट सेवेमुळे व्हिडीओ स्ट्रिमिंग ही संकल्पनाच बाद होणार असून इंटरनेधारित टीव्हीची नांदी देशात सुरू होणार आहे. यामुळेच आता इंटरनेटआधारित टीव्ही सेवा पुरविणाऱ्या नेटफ्लिक्ससारख्या अनेक परदेशी कंपन्याही भारतीय बाजारपेठेत शिरकाव करू लागल्या आहेत. यामुळे मनोरंजन हे पूर्णत: इंटरनेटशी जोडले जाणार आहे. काय आहे हा इंटरनेट टीव्ही त्यामध्ये नेमके कोणते पर्याय आहे हे पाहुयात.

देशात इंटरनेट सुरू झाले आणि त्या पर्यायाने अनेक उद्योगांना चालना मिळू लागली. आता इंटरनेट सुविधा अधिक प्रगत होऊ लागली आहे. केवळ संगणकावर वापरता येणारी ही सुविधा कालांतराने मोबाइलवर आली. नंतर स्मार्टफोनच्या क्रांतीमुळे तर इंटरनेट घराघरात पोहोचणे शक्य झाले. काळानुरूप इंटरनेटही बदलत राहिले. भारतात इंटरनेटचा प्रवास टूजीवरून फोरजीपर्यंत पोहोचला. लवकरच तो फाइव्हजीला गवसणी घालणार आहे. या तंत्रज्ञानामुळे केवळ संगणकावर वापरता येणाऱ्या अनेक इंटरनेट सुविधा आता मोबाइलवरही तितक्याच जलद आणि प्रभावीपणे वापरता येणार आहे. फोरजी इंटरनेटमुळे आता इंटरनेटवरील व्हिडीओ उद्योगाला चांगलीच चालना मिळणार आहे. कारण फोरजीमुळे स्ट्रिमिंग संपुष्टात येणार आहे. परिणामी मोबाइलवर व्हिडीओ अधिक जलद वेगाने पाहणे शक्य होणार आहे. स्ट्रिमिंग कालावधी कमी झाल्यामुळे ते पाहणाऱ्यांची संख्याही वाढणार आहे. यामुळे सध्या अंशत: इंटरनेटशी जोडलेले भारतीयांचे मनोरंजन येत्या काळात पूर्णत: इंटरनेटशी जोडले जाणार आहे.

इंटरनेटवर व्हिडीओ पाहणाऱ्यांची संख्या भारतात जगातील प्रगत देश ब्रिटन, अमेरिकेपेक्षाही खूप जास्त असल्याचे २०१५च्या ग्लोबल व्हिडीओ इनसायडी अहवालात नमूद करण्यात आले आहे. या अहवालानुसार ५५ टक्के भारतीय व्हिडीओ आपल्या संगणकावर आणि स्मार्टफोनवर पाहणे पसंत करतात. ही संख्या प्रगत देशांमध्ये ५० ते ५२ टक्के इतकी आहे. देशात दूरचित्रवाणी पाहणाऱ्यांची संख्या ८७ टक्के आहे तर प्रगत देशात हे प्रमाण ७२ टक्के इतके आहे. याचबरोबर भारतातील ३३ टक्के  स्मार्टफोनधारक टीव्हीवरील अनेक मालिका आणि चित्रपट मोबाइलवर पाहणे पसंत करत आहेत. याचबरोबर ३७ टक्केभारतीय व्हिडीओ ऑनलाइन पाहण्यापेक्षा डाऊनलोड करून पाहणे पसंत करतात. यामुळे देशात उपलब्ध असलेला ग्राहक मिळवण्यासाठी वाहिन्यांपासून परदेशी इंटरनेटआधारित मनोरंजन सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांमध्ये स्पर्धा रंगू लागली आहे. या स्पर्धेत ग्राहकांसमोर कोणते पर्याय आहेत हे पाहुयात.

अ‍ॅमेझॉन प्राइम

नेटफ्लिक्सनंतर भारतात अ‍ॅमेझॉन या परदेशी कंपनीने अ‍ॅमेझॉन प्राइम ही सेवा बाजारात आणून नेटकरांना मोबाइलवर चित्रपट, गाणी इतकेच काय तर विविध मालिकाही उपलब्ध करून दिल्या आहेत. या अ‍ॅपमध्ये नेटफ्लिक्सच्या तुलनेत भारतीय व्हिडीओज जास्त उपलब्ध आहेत. यामुळे हे अ‍ॅप लवकरच भारतीयांच्या पसंतीस उतरले आहे. या अ‍ॅपमध्ये स्थानिक भाषांमधील अनेक व्हिडीओज उपलब्ध आहेत. यामुळे स्थानिक भाषांमध्ये व्हिडीओज पाहणे पसंत करणारे प्रेक्षक या अ‍ॅपकडे आकर्षित होत आहे. या अ‍ॅपमध्ये तुम्ही महिन्याला पैसे भरून सुविधा घेऊ शकता किंवा जसे व्हिडीओ पाहाल तसे पैसे भरून तुम्ही हे अ‍ॅप वापरू शकता.

ओटीटी सेवा

ब्रॉडकास्टिंगमध्ये ओटीटी म्हणजे ‘ओव्हर द टॉप’ म्हणजे ऑडिओ आणि व्हिडीओ या दोन्ही सेवा इंटरनेटच्या अधारे पुरविणारे तंत्रज्ञान. यामुळे सेवा पुरवठादारांना व्हिडीओ ऑन डिमांडसारख्या सेवा पुरविणे शक्य झाले. सध्या सर्वत्र डीटीएच किंवा सेट टॉप बॉक्सच्या माध्यमातून दूरचित्रवाणी पाहिली जाते. यामध्ये अनेकदा आपण कधीही न पाहणाऱ्या वाहिन्यांचे पैसेही भरत असतो. यामुळे आपल्याला पाहिजे तेवढेच मनोरंजन करायचे आणि अगदी त्याचेच पैसे द्यायचे. सध्या आपण संदेशवहन प्रणाली अर्थात व्हॉट्सअ‍ॅपसारखे अ‍ॅप्स आणि व्हिडीओ कॉलिंग अर्थात स्काइपसारखे अ‍ॅप्स या सेवांसाठी ओटीटी तंत्रज्ञानाचा वापर करत आहोत. हेच तंत्रज्ञान ब्रॉडकास्टिंगमध्ये वापरले जाऊ लागले आहे. यामुळेच अ‍ॅपआधारित वाहिन्यांपासून ते ओटीटी तंत्रज्ञानावर आधारित सेवा उपलब्ध होण्यास सुरुवात झाली. यामुळे आपल्याला कमी पैशांत मनोरंजन मिळवणे शक्य होणार आहे.

डिट्टो टीव्ही

झी वाहिनीच्या एस्सल व्हिजन या समूहाचे हे अ‍ॅप असून झीच्या सर्व वाहिन्या पाहता येणे शक्य होणार आहे. यामध्ये सर्वाधिक मनोरंजन हे प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध असल्यामुळे या अ‍ॅपला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या अ‍ॅपमध्येही आपण काही मजकूर अगदी मोफत पाहू शकतो मात्र त्यामध्ये आपल्याला जाहिरातींचा अडथळा सहन करावा लागतो. मात्र जर आपण पैसे देऊन नोंदणी केली तर जाहिरातींचा अडथळा दूर होऊ शकतो.

नेटफ्लिक्स

या कंपनीने २००७ मध्ये अमेरिकेत व्हिडीओ ऑन डिमांड ही सेवा सुरू केली. आजमितीस या कंपनीचे एकतृतीयांश अमेरिकन ग्राहक असून कंपनीने १९० देशांमध्ये आपले अस्तित्व निर्माण केले आहे. यातील एक अर्थात भारत आहेच. आपल्या देशात कंपनीने याच वर्षांच्या मध्यात प्रवेश केला. अल्पावधीत कंपनीचे काही हजार ग्राहक झाले असून वर्षांअखेपर्यंत ही संख्या लाखभर ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा कंपनीचा मानस आहे. यामध्ये कंपनीचे स्वत:चे कंटेंट डिलिव्हरी नेटवर्क (सीडीएस) आहे. याशिवाय स्थानिक केंद्रे असून यामुळे अगदी कमी बॅण्डविड्थमध्ये अधिक चांगल्या दर्जाचे व्हिडीओ पाहणे आपल्याला शक्य होणार आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट, गाणी यांचा मुबलक खजिना उपलब्ध असून आपल्याला पाहिजे तो चित्रपट खरेदी करून आपण तो पाहू शकतो. नेटफ्लिक्सने आपले वितरण जाळे अधिक चांगले केले असून ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी अ‍ॅप बाजाराच्या माध्यमातून प्रयत्न करत आहेत. कंपनीचे भारतीय वाहिन्यांसोबत सहकार्य करार करण्याची प्रक्रिया सुरू असून लवकरच यामध्ये भारतीय वाहिन्याही दिसू लागणार आहे. जोपर्यंत यामध्ये हिंदी किंवा स्थानिक भाषांमधील कॉन्टेंट येत नाही तोपर्यंत भारतात नेटफ्लिक्स अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचणे अवघड असल्याचे बेस्ट मीडिया इन्फोचे अंशुल गुप्ता यांनी नमूद केले. याशिवाय हे जाहिरातमुक्त असल्यामुळे मनोरंजनात कोठेही अडथळा येत नसल्याचे निरीक्षण गुप्ता यांनी नेटफ्लिक्सचे वैशिष्टय़  सांगताना नोंदविले आहे.

यूप टीव्ही

ही एक अ‍ॅप आधारित वाहिनी असून यामध्ये भारतातील बहुतांश मनोरंजन वाहिन्या उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये हिंदी, बांगला, तमिळ, मल्ल्याळम आदी भाषांचा समावेश आहे. यामध्ये लहान मुलांच्या वाहिन्यांपासून ते चित्रपट वाहिन्या, क्रीडा, वृत्त, मनोरंजन वाहिन्यांचाही समावेश आहे. यातील आपल्याला पाहिजे त्या वाहिनीवरील पाहिजे तो कार्यक्रम आपण इंटरनेटच्या आधारे  पाहू शकतो.

हॉटस्टार

जर तुम्हाला तुमच्या आवडत्या मालिका, नवीन चित्रपट, क्रिकेटचे सामने, कबड्डीचे सामने पाहायची आवड असेल तर हे अ‍ॅप तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे. हे अ‍ॅप स्टार इंडिया प्रा. लि. या स्टारवाहिन्यांच्या कंपनीचे असून स्टारच्या सर्व वाहिन्या या अ‍ॅपवर उपलब्ध करून दिल्या आहेत. यातील बहुतांश वाहिन्या या भारतीय भाषांमधील आहेत. हे अ‍ॅप अ‍ॅण्ड्रॉइड प्ले स्टोअरवर मोफत उपलब्ध आहे. या अ‍ॅपमध्ये आपण काही मजकूर अगदी मोफत पाहू शकतो, मात्र त्यामध्ये आपल्याला जाहिरातींचा अडथळा सहन करावा लागतो. मात्र जर आपण पैसे देऊन नोंदणी केली तर जाहिरातींचा अडथळा दूर होऊ शकतो.

याशिवाय या बाजारात चित्रपटांसाठी स्पूल, बॉक्स टीव्ही यासारखे अ‍ॅप उपलब्ध आहेत. तर डीटीएच सेवा पुरविणाऱ्या टाटा स्कायचे टाटा स्काय मोबाइल, डीटूएचचे डायरेक्ट टू मोबाइल अशा वाहिन्याही उपलब्ध आहेत. याशिवाय मोबी टीव्ही, हॅलो टीव्ही, नेक्ट-जी टीव्ही असे थर्ड पार्टी अ‍ॅप्सही उपलब्ध आहेत.

प्रतिनिधी