स्मार्टफोन्समुळे आयुष्य अधिक सोपं झालंय हे तर जगजाहीर आहे. पण या स्मार्टफोनचा अधिक स्मार्ट वापर शक्य असल्याचं इंटरनेटवर अनेकदा वाचनात येतं. तसं बघायला गेलं तर इंटरनेटवर अनेक भूलथापाही उपलब्ध आहेत. पण खरं सांगायचं तर या सगळ्या फसव्या कल्पना असतात. मात्र अशाही काही ट्रिक्स आहेत ज्यांचा अवलंब केला तर तुम्ही खऱ्या अर्थाने स्मार्ट व्हाल.

टीव्ही चार्जिंग
आजकाल स्मार्टफोन्सचा चार्जर हा यूएसबी केबलसहित असतो. म्हणजे चार्जिंग प्लग काढला की त्याचा वापर यूएसबी केबलसारखा करता येतो. एखादी गोष्ट विसरणं हे कुणाच्याही बाबतीत कधीही कुठेही होऊ शकतं. आणि मोबाइलचा चार्जर विसरणं हे तर अगदीच कॉमन आहे. पण जर का तुमच्याकडे यूएसबी केबल असेल तर मोबाइल चाìजग शक्य आहे. कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपला यूएसबी लावून मोबाइल चार्ज करता येतो हे वेगळं सांगण्याची गरज नाही. पण अगदी टेलिव्हिजन सेटलाही यूएसबी केबल जोडून मोबाइल चार्जिंग शक्य आहे. आजकालच्या टीव्ही सेट तसंच सेटटॉप बॉक्सनाही यूएसबी पोर्ट असतं. वॉल चार्जर नसेल किंवा परदेशात गेला असता आउटलेट कन्व्हर्टर नसेल तर मोबाइल थेट टीव्हीला लावून चाìजग करता येऊ शकतं. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्याच्याकडे टीव्हीचा रिमोट आहे तो तुमच्या मोबाइल फोनमध्ये सेव्ह केलेल्या इमेजेस, व्हिडीओज बघू शकतो.
चार्जिंगच्याच बाबतीत आणखी एक ट्रिक म्हणजे फोन पटकन चार्ज करता येणं. फोन स्वीच ऑफ करून चाìजग केलं तर ते वेगाने होतं हे तर सगळ्यांनाच माहित्येय. पण एअरप्लेन मोडवर फोन असेल तरीसुद्धा चाìजगचा वेग हा जास्त असतो. सामान्य चाìजगपेक्षा २० टक्के वेगाने फोन चार्ज होतो.

पेल्याची कमाल
घरात काम करत असताना मोबाइल फोनमधून गाणी ऐकणं हा अनेकांचा आवडता टाइमपास. काम करायचा कंटाळा येत नाही म्हणे. पण या गाण्यांचा, संगीताचा आवाज फुल्ल असला तरी अनेकदा म्हणावा तसा मोठा नसतो. आता प्रत्येकालाच काही दर्जेदार म्युझिक सिस्टम घेणं परवडणारं नसतं. अशा वेळी मोबाइल काचेच्या ग्लासमध्ये ठेवा. बंद खोलीत आवाज जसा घुमतो तसा गाण्यांचा आवाजही अ‍ॅम्प्लिफाय होतो. टॉयलेट पेपरच्या संपलेल्या रोलला कापूनही अशाच प्रकारे आवाज अ‍ॅम्प्लिफाय करता येतो.

वॉटर फ्लॅश
हल्लीच्या स्मार्टफोन्सना फ्लॅश लाइट किंवा टॉर्च हा असतोच. त्यामुळे अंधारातही लख्ख प्रकाश पाडता येऊ शकतो. पण कधी ट्रेकिंगला गेलं असता किंवा फार्म हाऊसवर रात्री वीज गेल्यावर मेणबत्तीऐवजी जर का चांगला लाइट हवा असेल तर एक भारी काम करता येऊ शकतं. पाण्याची पारदर्शक बाटली घ्यायची. त्यात पाणी असलं पाहिजे. तर ही अशी बाटली मोबाइलच्या टॉर्चवर ठेवायची. याचा फायदा असा की टॉर्चमधून निघणारा प्रकाश खोलीभर व्यवस्थित पसरतो.

लोकेशन रिमाइंडर
रिमाइंडर हा विसरभोळ्यांसाठी मोठा आधार आहे. अमुक एका तारखेचा रिमाइंडर लावला की विसरण्याची शक्यता जवळपास नाहीच. विसरभोळा गोकूळ जसा गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी गाठी मारायचा तसेच हे रिमाइंडर्स म्हणजे डिजिटल गाठी आहेत. पण सांगायचा मुद्दा असा की टाइम रिमाइंडरसोबतच लोकेशन रिमाइंडर नावाचा एक पर्याय स्मार्टफोन्समध्ये असतो. अमुक एका ठिकाणी पोहोचल्यानंतर करून द्यायची आठवण हा त्याचा मूळ उद्देश. अनेकदा प्रवासात असताना डुलकी लागते. आणि डोळे उघडतात तेव्हा कळतं की आपला स्टॉप निघून गेला. अशा वेळी लोकेशन रिमाइंडर उपयोगी पडतो. यासाठी जीपीएस आणि लोकेशन सव्‍‌र्हिसेस ऑन असणं गरजेचं आहे.

या ट्रिक्समुळे स्मार्टफोनचा स्मार्ट वापर तर नक्कीच केला जाऊ शकतो. पण याशिवाय छोटय़ा छोटय़ा अशा अनेक ट्रिक्स आहेत ज्या नक्कीच अवलंबल्या जाऊ शकतात. उदाहरणार्थ अनेकदा मोबाइलची रेंज जाते. अशा वेळी मॅन्युअली नेटवर्क शोधण्याचा पर्याय तर आहेच. पण त्याऐवजी मोबाइल एअरप्लेन मोडवर ठेवून काही सेकंदांनी पुन्हा नॉर्मल मोडवर आणायचा. मोबाइल जेव्हा पुन्हा सुरू होतो तेव्हा तो आपोआप नजीकच्या मोबाइल टॉवरशी जोडला जातो. अनेकदा फोनची बॅटरी कमी असते आणि आपल्याला नेव्हिगेशनची गरज असते. अशा वेळी पटकन मॅप सुरू करून त्याचा स्क्रीनशॉट घेता येणं शक्य असतं. नवख्या ठिकाणी गेल्यावर रस्ते विसरणं हे तर साहजिकच आहे. अशा वेळी लँडमार्क्‍सचे फोटोज क्लिक करता येऊ शकतात. मोठय़ा पाìकग लॉटमध्ये गाडी किंवा बाईक पार्क करतानाही मोबाइलच्या कॅमेऱ्यातून फोटो काढता येऊ शकतो. फोनचा चार्जर किंवा इअरफोन्सच्या वायर्स सतत वाकल्यामुळे किंवा गुंडाळीमुळे तुटतात. ही अडचण अनेकजणांना येत असते. हे टाळण्यासाठी उत्तम उपाय म्हणजे या वायर्सना स्प्रिंग घालायची. स्प्रिंग घातल्याने दोन गोष्टी होतात-एक म्हणजे वायर वाकत नाही आणि दुसरं म्हणजे घर्षणही रोखलं जातं.
कुठल्याही मशीन किंवा तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करण्यासाठी प्रत्येकजण काही ना काहीतरी जुगाड करत असतोच. या जुगाडामधूनच नवीन इनोव्हेशन्स तयार होत असतात. सध्याच्या तापलेल्या वातावरणात यूएसबी फॅन हेसुद्धा असंच इनोव्हेशन आहे. तुम्हीसुद्धा तुमचं डोक लावून काही जुगाड नक्की कराल.
– पुष्कर सामंत