पूर्वी एक काळ होता, जेव्हा कमीत कमी आकाराचा मोबाइल ही बहुसंख्यांची मागणी असायची. खिशात आरामात बसणारा, हातात सहज मावणारा आणि तरीही सगळी वैशिष्टय़े असलेला मोबाइल ग्राहकाची पहिली पसंती ठरत असे. मात्र स्मार्टफोनचा जमाना सुरू झाल्यापासून हे चित्र हळूहळू उलटं होऊ लागलं आहे. वापरकर्त्यांना आपला स्मार्टफोन अधिकाधिक मोठा व्हावा, असे वाटू लागलं आहे. कंपन्याही ग्राहकांची ही ‘मोठे’पणाची ओढ समजून घेत स्मार्टफोनच्या स्क्रीनच्या आकारात वाढ करू लागल्या आहेत. सहा इंची स्क्रीन असलेला ‘ओप्पो’चा ‘आर सेव्हन प्लस’ हा अशाच मोठय़ा स्मार्टफोनमध्ये पडलेली नवी भर आहे. पण हा केवळ आकाराने किंवा स्क्रीनच्या बाबतीतच मोठा आहे, असं नाही तर, रॅम, इंटर्नल मेमरी, कॅमेरा, बॅटरी क्षमता अशा सर्वच वैशिष्टय़ांच्या बाबतीत या फोननं ‘बडा है तो बेहतर है’ असं दाखवून दिलं आहे.

अलीकडच्या काळात कमी किमतीचे स्मार्टफोन बनवून विकणाऱ्या ज्या कंपन्या नावारूपाला आल्या आहेत, त्यामध्ये जगभर गाजत असलेलं एक नाव ‘ओप्पो इलेक्ट्रॉनिक्स’ हे आहे. जवळपास आठ वर्षांपूर्वी स्मार्टफोनच्या निर्मितीक्षेत्रात उतरलेल्या ओप्पोने अल्पावधीत बाजारपेठेत आपले स्थान मिळवले आहे. याच कंपनीकडून आता ‘आर सेव्हन प्लस’ हा नवीन स्मार्टफोन बाजारात दाखल करण्यात आला आहे. पाहणाऱ्याचे डोळे मोठे करायला लावणाऱ्या या स्मार्टफोनमधील अनेक वैशिष्टय़े भुरळ पाडणारी आहेत. या सर्व वैशिष्टय़ांचा लेखाजोखा.
रंगरूप: ‘ओप्पो आर सेव्हन प्लस’ आकाराने मोठा असला तरी त्याचा फोनच्या जाडीवर फारसा परिणाम झालेला नाही. सात मिमी जाडीचा हा फोन वजनाने मात्र जवळपास दोनशे ग्रॅम इतका आहे. स्मार्टफोनचा दर्शनी भाग स्क्रीनने व्यापलेला आहे. केवळ वरच्या बाजूस कॅमेरा, स्पीकरसाठी आणि खालच्या बाजूस कंपनीच्या नावासाठी जागा सोडण्यात आलेली आहे. स्मार्टफोनची मागील बाजू धातूची असून सोनेरी रंगाच्या या ‘बॉडी’चे ‘फिनििशग’ अतिशय चकचकीत आहे. स्मार्टफोनच्या डाव्या बाजूस ‘व्हॉल्यूम’ची बटणे तर उजवीकडे ‘लॉक, पॉवरऑफ’ या गोष्टींसाठीचे एक बटण पुरवण्यात आले आहे. सिमकार्ड टाकण्यासाठी लॉक बटणाच्या वरच ‘स्लॉट’ देण्यात आला असून त्याच स्लॉटमध्ये मेमरी कार्डसाठीही जागा देण्यात आली आहे.
डिस्प्ले: ‘आर सेव्हन प्लस’ची स्क्रीन सहा इंच आकाराची असून तिचे रेझोल्युशन १०८० बाय १९२० पिक्सेल इतके आहे. डिस्प्ले मोठा आणि सुस्पष्ट असल्याने स्मार्टफोन अधिक आकर्षक वाटतो. मोठय़ा डिस्प्लेमुळे या स्मार्टफोनवर व्हिडीओ पाहण्याचा आनंद चांगला आहे. तसेच ‘एचडी’ डिस्प्ले असल्याने चित्रपट अधिक सुस्पष्ट दिसतात.
कार्यक्षमता: ओप्पोमध्ये क्वॉडकॉम १.५ गिगाहार्टझचा एक आणि १ गिगाहार्टझचा एक असे प्रोसेसर बसवण्यात आले आहेत. या प्रोसेसरला ३ जीबी रॅमची जोड मिळाल्याने स्मार्टफोन वेगाने सूचना पाळतो. शिवाय या स्मार्टफोनध्ये इंटर्नल मेमरी ३२ जीबी असून मेमरी कार्डच्या मदतीने साठवण क्षमता (स्टोअरेज) १२८ जीबीपर्यंत वाढवता येते. त्यामुळे कितीही मोठा व्हिडीओ किंवा गेम असला तरी ‘आर सेव्हन प्लस’ लवकर थकणार नाही.
कॅमेरा: ‘आर सेव्हन प्लस’मध्ये मागील बाजूस १३ मेगापिक्सेल आणि पुढील बाजूस पाच मेगापिक्सेलचा कॅमेरा पुरवण्यात आला आहे. या कॅमेऱ्यातून येणाऱ्या फोटोंचा दर्जा मात्र फार समाधानकारक नाही. विशेषत: मोठा स्मार्टफोन असल्याने वापरकर्त्यांना कॅमेराही चांगल्या दर्जाचा अपेक्षित असतो. मात्र, ‘ओप्पो आर सेव्हन प्लस’चा कॅमेरा त्या कसोटीवर पुरेसा सक्षम ठरत नाही. ‘झूम’ करून काढलेले फोटो अस्पष्ट येतात. त्या तुलनेत ‘झूम’ करता फोटो चांगले येत असल्याचे दिसून येते.
बॅटरी क्षमता: फोन जितका मोठा, त्याची साठवण क्षमता जितकी मोठी, तितकीच त्यातील बॅटरी लवकर ‘डिस्चार्ज’ होते. ही बाब ओळखून ‘ओप्पो’ने ‘आर सेव्हन प्लस’मध्ये ४१०० एमएएच क्षमतेची बॅटरी पुरवली आहे. विशेष म्हणजे, यामध्ये ‘अल्ट्रा चार्ज’ ही सुविधा असून पाच मिनिटे चार्जिग केल्यास बॅटरी दोन तासांपर्यंत चालू शकते, असा कंपनीचा दावा आहे.
ध्वनी: ‘आर सेव्हन प्लस’मधील सर्वात ठळक वैशिष्टय़ यातून उमटणारा ध्वनी आहे. या स्मार्टफोनच्या मागील बाजूस ‘स्पीकर’ पुरवण्यात आला आहे. मात्र, त्यातील आवाज लक्षणीयरीत्या सुस्पष्ट आणि तितकाच भारदस्त वाटतो. गाण्यातील प्रत्येक वाद्याचा आवाज अतिशय स्पष्ट ऐकू येतो. त्यामुळे आपण स्मार्टफोनवर गाणी ऐकतोय, असे जाणवत नाही.
सुरक्षितता: ‘आर सेव्हन प्लस’मध्ये फिंगरप्रिंट लॉकची सुविधा देण्यात आली आहे. फोनच्या मागील बाजूस कॅमेऱ्याखाली असलेल्या चिपवर फिंगरप्रिंट स्कॅन करून आपण स्मार्टफोन ‘लॉक’ किंवा ‘अनलॉक’ करू शकतो. याशिवाय काही विशिष्ट अ‍ॅप्सनाही फिंगरप्रिंटने ‘लॉक’ करण्याची सुविधा या फोनमध्ये आहे.
किंमत आणि मूल्य : ‘ओप्पो आर सेव्हन प्लस’ची किंमत २९९९० रुपये इतकी आहे. ही ‘हायर एन्ड’ किंवा ‘उच्च किंमत’ श्रेणीत हा स्मार्टफोन मोडतो. किमतीचा विचार केल्यास हा स्मार्टफोन महाग वाटू शकतो. मात्र, यातील वैशिष्टय़ांवर नजर टाकली तर ही किंमत रास्त वाटते.

‘आर सेव्हन प्लस’ची वैशिष्टय़े
डिस्प्ले : ६ इंची ‘अ‍ॅमोल्ड’ कॅपासिटीव्ह टचस्क्रीन
मेमरी: तीन जीबी रॅम
स्टोअरेज: इंटर्नल ३२ जीबी, मेमरी कार्डने १२८ जीबीपर्यंत वाढवण्याची सोय.
सिमकार्ड: डय़ूअल सिम,‘४जी’ कार्यान्वित.
प्लॅटफॉर्म: अँड्रॉइड लॉलिपॉप
कॅमेरा : मागील बाजूस १३ मेगापिक्सेल पुढील बाजूस पाच मेगापिक्सेल
किंमत: २९९९० रुपये.

आसिफ बागवान – asif.bagwan@expressindia.com