इंटरनेटचे महाजाल जितके प्रचंड तितकेच जोखमीचेही आहे. येथे संचार करताना पुरेशी खबरदारी न घेतल्यास वापरकर्त्यांना वेगवेगळय़ा मार्गाने नुकसान होऊ शकते. कधी आर्थिक फसवणूक तर कधी व्हायरसचा धोका अशा अनेक मार्गानी वापरकर्त्यांना सतावण्याचा आणि त्यांच्या अजाणतेपणाचा गैरफायदा सायबर गुन्हेविश्वातील मंडळी घेत आहेत. असाच काहीसा प्रकार अलीकडे सेलिब्रिटींच्या चाहत्यांच्याबाबतीत घडू लागला आहे. केवळ हॉलीवूड किंवा बॉलीवूडच नव्हे तर मराठी चित्रपटसृष्टी तसेच मालिकांमधील कलाकारांच्या चाहत्यांनाही सायबर गुन्हेगार व हॅकर्स गंडा घालू लागले आहेत.

‘मॅककॅफे’ या आघाडीच्या अँटिव्हायरस सॉफ्टवेअर निर्मात्या कंपनीने सेलिब्रिटींच्या चाहत्यांना कशा प्रकारे गंडवण्यात येते, याचे सर्वेक्षण केले आहे. गेल्या काही वर्षांपासून नियमितपणे होणाऱ्या या सर्वेक्षणाच्या यंदाच्या आवृत्तीत ‘मोस्ट सेन्सेशनल सेलिब्रिटिज’ या वर्गातील मराठी कलाकारांमध्ये ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे नाव आघाडीवर आहे. वापरकर्ते आपल्या आवडत्या कलाकारासंदर्भातील माहिती, वृत्त, छायाचित्रे, व्हिडीओज, चित्रपट इंटरनेटवर ‘सर्च’ करतात, त्या वेळी अजाणतेपणी ते सायबर हॅकर्सच्या जाळय़ात ओढले जातात, असे ‘मॅककॅफे’चे निरीक्षण आहे.

ब्रॉडबँडचा प्रसार वाढत असताना पुरस्कार, टीव्ही शोज, अल्बम, रिलीज चित्रपटांचे प्रिमियर, सेलिब्रिटी ब्रेकअप्स आदींबाबतची माहिती मिळवण्यासाठी ग्राहक इंटरनेटवर अवलंबून असतात. ग्राहकांच्या या आवडीचा फायदा हॅकर्स कसा उठवतात व वापरकर्त्यांना मालवेअरयुक्त साइटसवर भेट देण्यास प्रवृत्त करून त्यांचा पासवर्ड व वैयक्तिक माहिती कशी चोरतात, हे इंटेल सिक्युरिटीच्या अभ्यासात अधोरेखित करण्यात आले असून ग्राहकांच्या ऑनलाइन वापरातील जोखमी, तसेच संभाव्य धोक्यांपासून त्यांनी कसे सुरक्षित राहावे, यांवर भर देण्यात आला आहे. भारतीय ग्राहकांना चित्रपटविश्व व सेलिब्रिटी कल्चरबाबत उत्सुकता असते. जे वापरकत्रे संभाव्य ऑनलाइन जोखमींचा विचार न करता माहिती मिळविण्याचा प्रयत्न करतात त्यांना सायबर गुन्हेगार आपले लक्ष्य बनवतात. इंटेल सिक्युरिटीमध्ये आम्ही ग्राहकांना याबाबत जागृत करून एक सकारात्मक ऑनलाइन अनुभव देण्यासाठी कटिबद्ध आहोत, असे मत ‘इंटेल सिक्युरिटी’च्या इंडिया डेव्हलपमेंट सेंटरमधील संशोधन व विकास विभागाचे प्रमुख वेंकट कृष्णापुर यांनी व्यक्त केले.

यंदाच्या यादीत नाना पाटेकर यांच्यासह राधिका आपटे (क्रमांक २), आकाश ठोसर (क्रमांक ४) व रिंकू राजगुरू (क्रमांक ७) यांची नावे आघाडीवर आहेत. याशिवाय या यादीत अतुल कुलकर्णी, नेहा पेंडसे व सई ताम्हणकर यांचीही नावे आहेत. या कलाकारांचा या संपूर्ण प्रकरणाशी अजिबात संबंध नाही. मात्र, त्यांच्याविषयीची उत्सुकता ग्राहकांना अनावश्यक किंवा अयोग्य वेबसाइटकडे खेचून नेते आणि मग हॅकर्स त्यांचा गैरफायदा घेतात, असे या अहवालात म्हटले आहे.

सुरक्षितपणे ‘सर्च’ कसे करावे?

* क्लिक करताना विचार करा : थर्ड पार्टी लिंकवर क्लिक करू नका. त्यापेक्षा माहिती किंवा मजकूर कंपनीच्या वेबसाइटवरून किंवा मूळ स्रोतातूनच मिळवा. त्यामुळे तुम्ही कुठल्याही द्वेषयुक्त साइटवर क्लिक करण्याची शक्यता कमी असते.

*‘टोरंट’ सर्च करताना सावध राहा : ‘torrent’ हा शब्द सर्वात जोखमीचा आहे. सायबर गुन्हेगार टोरंट्सचा वापर करून खऱ्या फाइल्ससोबत मालवेअर जोडतात व ग्राहकांच्या नकळत हे मालवेअर त्यांच्या संगणकात प्रवेश करतात.

*वैयक्तिक माहिती गोपनीय ठेवा : तुमची वैयक्तिक माहिती सायबर गुन्हेगार नेहमी चोरण्याचा प्रयत्न करतात. तुमचे क्रेडिट कार्ड, ईमेल, घरचा पत्ता किंवा सोशल मीडिया लॉगइन विचारणारी विनंती आल्यास विचार न करता माहिती देऊ नका. त्याचा अभ्यास करून तुमची माहिती चोरण्यासाठीचा प्रयत्न तर नाही ना, याचा विचार करा.

*‘क्रॉस डिव्हाइस’ संरक्षणाचा अवलंब करा : आपल्या डिजिटल जीवनातले सगळे पलू सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे. तुम्ही कुठे आहात, कुठला डिव्हाइस वापरता, तुमची वैयक्तिक माहिती कुठे साठवून ठेवता,  याची पर्वा न करता ही सुरक्षितता बाळगणे गरजेचे आहे.  मालवेअर हॅकिंग व फििशग अशा धोक्यांपासून संरक्षण म्हणून तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर काम करतील अशी सोल्यूशन्स असणे गरजेचे आहे.